
मविआ-फडणवीस बैठक आणि निवडणुका पुढे ढकलण्याचे संकेत; वडेट्टीवार म्हणाले...
राज्याला सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह विविध निवडणुकांचे वेध लागले आहेत. राज्यसभा निवडणुकीसाठीही खलबतं सुरू आहेत. मात्र यासोबतच राज्यातला कोरोना प्रादुर्भावही अचानक वाढू लागला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी निवडणुकांबद्दल महत्त्वाचे संकेत दिले आहेत. (Vijay Vadettiwar on Elections in Maharashtra)
राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्र्यांनी कोविड टास्क फोर्ससोबत (CM Uddhav Thackeray Meeting with State Covid Task force) बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेला निर्बंध नको असतील, तर मास्क वापरा असं आवाहनही केलं आहे. या संदर्भातच बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, पुढील ८ ते १० दिवस महत्त्वाचे आहेत. या दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या किती वाढतेय याचा आढावा घेतला जाईल. काय परिस्थिती निर्माण होईल, त्यावर निर्णय घेतला जाईल. येणाऱ्या निवडणुकीला बराच वेळ आहे. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कार्यक्रम ठरेल. पण कोरोना परिस्थिती गंभीर झाली झाली तर निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला करावी लागेल.
हेही वाचा: महाविकास आघाडीच्या प्रस्तावावर फडणवीसांची 'ऑफर', थेट दिल्लीला फोन
निवडणुकीच्या माध्यमातून लोकांची गर्दी होईल, त्यामुळे पुन्हा संसर्ग वाढेल. यामुळे निवडणुका टाळता येईल का याचा विचार होईल. आम्ही आमच्या बाजूने विनंती करू पण निवडणुका घ्यायच्या की नाही, हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत. त्यामुळे आता राज्यातल्या निवडणुका वेळेवर होणार का? अशी शंका उपस्थित होत आहे.
हेही वाचा: कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिका ‘अलर्ट’ मोडवर
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही आता सर्वच पक्षांमध्ये खलबतं सुरू आहेत. आजच महाविकास आघाडीचं एक शिष्टमंडळ भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांना भेटलं. या बैठकीत राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले. त्या बदल्यात विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याची ऑफरही देण्यात आली.
Web Title: Vijay Vadettivar On Elections Covid 19 Situation In Maharashtra Mahavikas Aghadi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..