esakal | विरार ATM लूट प्रकरणः सव्वा चार कोटी लंपास करणारे चोरटे अखेर ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

विरार ATM लूट प्रकरणः सव्वा चार कोटी लंपास करणारे चोरटे अखेर ताब्यात

दिवाळीच्या पूर्व संध्येला विरारमधील एटीएम कॅश लूट प्रकरणात मुख्य आरोपीसह अन्य 2 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.  4 कोटी 25 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन व्हॅनसह आरोपी फरार झाला होता. पळवलेल्या रकमेपैकी 4 कोटी 23 लाख 29 हजार 100 रुपयांची कॅश जप्त करण्यात ही पोलिसांना यश आले आहे.

विरार ATM लूट प्रकरणः सव्वा चार कोटी लंपास करणारे चोरटे अखेर ताब्यात

sakal_logo
By
विजय गायकवाड

मुंबईः दिवाळीच्या पूर्व संध्येला विरारमधील एटीएम कॅश लूट प्रकरणात मुख्य आरोपीसह अन्य 2 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.  4 कोटी 25 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन व्हॅनसह आरोपी फरार झाला होता. पळवलेल्या रकमेपैकी 4 कोटी 23 लाख 29 हजार 100 रुपयांची कॅश जप्त करण्यात ही पोलिसांना यश आले आहे. रायडर्स बिझनेस लि कंपनीच्या चालकानेच रोख रकमेसह ही व्हॅन पळवली होती. मीरा-भाईंदर, वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करून हा गुन्हा उघड केला असल्याची माहिती मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालय झोन 3 चे उपयुक्त संजय पाटील यांनी दिली आहे.

रोहित बबन आरु (वय 26), अक्षय प्रकाश मोहिते (वय 24), चंद्रकांत उर्फ बाबूशा गुलाब गायकवाड (वय 41) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहेत. यातील रोहित हा मुख्य आरोपी असून चंद्रकांत गायकवाड हा सराईत गुन्हेगार आहे. रोहित हा नवी मुंबईतील नेरुळ येथील रहिवासी आहे. अक्षय मोहिते हा खारघर बेलपाडा येथील तर चंद्रकांत गायकवाड हा बीड जिल्ह्यातील आष्टी ताल्युक्यातील नांदूर गावाचा रहिवाशी आहे. 

मागच्या आठवड्यात दिवाळीच्या पूर्व संध्येला 12 नोव्हेंबर गुरुवारी रायडर्स बिझनेस लि कंपनीची व्हॅन विरार पश्चिमेकडील बोळीज भागात असलेल्या कोटक महिंद्रा बँकेत पैसे भरण्यासाठी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास आली होती. रायडर कंपनीचे कंत्राट असलेल्या कॅश व्हॅनमध्ये 4 कोटी 58 लाख रुपयांची रोख रक्कम होती. त्यातील आजूबाजूच्या तीन एटीएममध्ये 28 लाख रुपये भरण्यात आले होते.  सव्वा चार कोटी रुपये गाडीत होते. संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी कॅशव्हॅन आली. 

गाडीतील मॅनेजर, लोडर आणि बॉडीगार्ड उतरल्यावर गाडी पार्किंग करण्याच्या बहाण्याने ड्रायव्हर आरोपी कॅश व्हॅनसह पळून गेला होता. त्याला फोन लावण्याचा प्रयत्न केला पण तो उडवा उडावीचे उत्तर देत होता आणि नंतर त्याने चक्क आपला फोन बंद करून ठेवला होता. चालकाचा फोन बंद होताच व्हॅन मधील इतर कर्मचारी यांनी तात्काळ विरार पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांनी आयुक्तालयाशी संपर्क साधून पालघर, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, मुंबई शहर, तसेच महाराष्ट्र राज्य डिजी कंट्रोल ला फोन करून सर्व ठिकाणी नाकाबंदी सुरू केली होती. पण चालकाने भिवंडी परिसरात कल्याण नाका परिसरात बेवारस अवस्थेत व्हॅन सोडून जेवढी जमेल तेवढी रक्कम घेऊन फरार झाला होता.  शुक्रवारी सकाळी एम एच 43 बीपी 4976 ह्या नंबरची कॅशव्हॅन भिवंडी कल्याण बायपास रोडच्या बाजूला असल्याची माहिती सुत्रांनी ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार प्रकाश साईल, संतोष सुर्व्हे यांना दिली. त्यांनी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे यांना कळवून कॅशव्हॅनच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी अर्नाळा पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. कॅश व्हॅन ही सेन्सरने लॉक असल्याने बँकेचे अधिकारी आणि अर्नाळा पोलिस पोहोचले. चोरी झालेल्या 4 कोटी 25 लाखांपैकी 2 कोटी 33 लाख 60 हजारांच्या पाचशे, दोनशे आणि शंभरच्या नोटांची रक्कम असलेले बंडल सापडले. 1 कोटी 91 लाख 40 हजारांचे दोन आणि पाचशेच्या नोटांचे बंडल घेऊन आरोपी ड्रायव्हर पळाला होता. पोलिसांनी शल्लक कॅशसह व्हॅन ताब्यात घेऊन आरोपींचा शोध सुरू केला होता.

अधिक वाचा-  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मुंबई पालिका सज्ज

गुन्ह्यांच्या अनुषंगाने अर्नाळा, विरार, गुन्हे शाखा 1 आणि 2, मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयाचे विशेष पथक तात्काळ रवाना झाले होते. गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून मुख्य आरोपी रोहित सुरू याचा मित्र अक्षय मोहिते याला नवी मुंबई खारघर मधून प्रथम अटक करण्यात यश मिळविले. यांच्याकडे चौकशी केली असता मुख्य आरोपी हा  बीड जिल्ह्यातील आष्टी ताल्युक्यातील नांदूर या गावाच्या चंद्रकांत गायकवाड यांच्याकडे गेला असल्याची माहिती मिळाली. अर्नाळा आणि गुन्हे शाखेचे एक पथक तात्काळ त्या ठिकाणी रवाना होऊन सापळा रचून मुख्य आरोपी रोहित बबन आरु, त्याचा मित्र चंद्रकांत उर्फ बाबूशा गुलाब गायकवाड या दोघांनाही अटक करण्यात यश मिळविले आहे. 

दोन्ही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून घटनास्थळावर 1 कोटी 88 लाख 19 हजार 100 रुपयांची रोख, याच पैशातून विकत घेतलेली 1 लाख 40 हजार रुपये किंमतीची रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट आणि 10 हजाराचा मोबाईल जप्त करण्यात ही पोलिसांना यश आले असल्याची माहिती मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालय झोन 3 चे उपयुक्त संजय पाटील यांनी दिली आहे.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दिवाळीच्या काळात एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी रायडर्स बिझनेस ली कंपनीला वाहनांची गरज असल्याने त्यांनी अप्सरा टूर्स अँड कंपनी कडून गाडी हायर केली होती. त्या गाडीवरचा यातील मुख्य आरोपी चालक होता. याचीच संधी साधून या चालकाने हे कृत्य केल्याचं उघड झाले आहे.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Virar ATM robbery case Thieves arrested with 4 25crore in cash and van