esakal | Virar Fire: ...तर त्या 15 जणांचा जीव वाचला असता!

बोलून बातमी शोधा

 fire at COVID hospital in Virar

विरार कोविड हॉस्पिटल दुर्घटना प्रकरणी रूग्णालयाचे CEO दिलीप शहांसह दोघांना अटक

Virar Fire: ...तर त्या 15 जणांचा जीव वाचला असता!
sakal_logo
By
संदीप पंडित

विरार (मुंबई): विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाच्या दुर्घटना प्रकरणी 2 जणांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली. रुग्णालयाने नियमानुसार अग्नी प्रतिबंधक ना हरकत प्रमाणपत्र घेतले नसल्याचे चौकशीत उघड झाले. तसेच रुग्णालयाचे फायर ऑडिट झालेले नसल्याचेही पोलीस तपासात निष्पन्न झाले. हे सर्व जाणीवपूर्वक टाळले असल्याचा आरोप ठेवत रुग्णालयाचे सीईओ दिलीप शहा आणि डॉ. शैलेश पाठक या दोघांना अटक करण्यात आली. जर फायर ऑडिट झाले असते, तर त्या 15 जणांचे जीव वाचले असते, अशी भावना आता सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येत आहे. दुर्घटना झाल्यावर या रुग्णालयाचे फायर ऑडिट झाल्याचे प्रभारी अग्निशमन अधिकारी दिलीप पालव यांनी सांगितले होते, पण तपासात वेगळीच माहिती समोर आली. अशा परिस्थितीत शासनाने नेमलेल्या चौकशी समितीत याच अधिकाऱ्याला समाविष्ट करण्यात आल्याने आता प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

हेही वाचा: Virar Hospital Fire: "ती कोरोनातून बरी झाली होती पण..."

या दुर्घटनेनंतर अर्नाळा पोलीस ठाण्यात हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉ. दिलीप शहा, डॉ. बस्तीमल शहा, डॉ. शैलेश पाठक तसेच हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचारी यांच्यासह डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर वेगवेगळ्या कलमान्वये मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या घटनेची चौकशी आणि तपास करणारे गुन्हे शाखा तीनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली. गुन्हे शाखेच्या टीमने हॉस्पिटलमधून डॉ. दिलीप बस्तीमल शहा (56) आणि डॉ. शैलेश धर्मदेव पाठक (47) या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. नालासोपाऱ्याच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या कार्यालयात त्यांना आणले. चौकशीअंती शनिवारी रात्री दोघांना पोलिसांनी अटक केली.

हेही वाचा: Virar Hospital Fire - मृतांच्या नातेवाईकांनी मंत्री एकनाथ शिंदेंना घेरलं

आरोपींना एका दिवसाची पोलिस कोठडी

रूग्णांना भली मोठी बिलं दिली जातात तर त्या स्तराच्या सुविधा रूग्णांना पुरवण्यात आल्या पाहिजेत. पण या रूग्णालयात झालं नसल्याने आग लागून दुर्घटनेत लोकांचा जीव गेला. याला हॉस्पिटल प्रशासन जबाबदार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. अटक करण्यात आलेल्या दोघांना वसई न्यायालयात आज सुट्टीच्या कोर्टात हजर केले असता त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. उद्या 2 वाजता पुन्हा वसई न्यायालयात त्यांना हजर केले जाणार आहे.

(संपादन- विराज भागवत)