esakal | VirarFire: "माझी जबाबदारी आहे हे मी नाकारत नाही, पण..."

बोलून बातमी शोधा

VirarFire: "माझी जबाबदारी आहे हे मी नाकारत नाही, पण..."
VirarFire: "माझी जबाबदारी आहे हे मी नाकारत नाही, पण..."
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: राज्यात वैद्यकीय स्तरावर अपघाताचे प्रकार गेल्या काही महिन्यात वाढताना दिसत आहेत. भंडाऱ्याचं बालमृत्यू प्रकरण, भांडुपच्या कोविड हॉस्पिटलचं प्रकरण, नाशिकच्या ऑक्सिजन गळतीचं प्रकरण या घटनांतून राज्य सावरत असताना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागली. आतापर्यंत या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ही घटना घडल्यानंतर पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी प्रतिक्रियादेखील दिली.

हेही वाचा: विरार हॉस्पिटल अग्नितांडव नॅशनल न्यूज नाही - राजेश टोपे

"माझी जबाबदारी आहेच. मी ही जबाबदारी नाकारत नाही. पण सध्या या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यातून सत्य समोर येईल. सध्याच्या घडीला रूग्णांना इतर रूग्णालयात हलविण्यात येत आहे. ज्या-ज्या रूग्णालयात जशा जागा उपलब्ध आहेत, त्यानुसार रूग्णांना येथून हलवून त्या त्या रूग्णालयात दाखल केलं जात आहे. ही जी घटना घडली त्या घटनेत चूक कोणाची हे आताच सांगणं शक्य नाही. कारण भंडाऱ्यात बालमृत्यू प्रकरण घडलं त्यानंतर राज्यातील रूग्णालयाचं फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. या रूग्णालयाचं ऑडिट झालंय की नाही हे चौकशीतून स्पष्ट होईल. जो कोणी दोषी असेल त्यावर कठोर कारवाई केली जाईल", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा: राजेश टोपेंना घरी बसवा..!! भाजप नेत्याची संतप्त प्रतिक्रिया

"गेल्या काही दिवसांपासून आम्ही विविध रुग्णालयांचा आढावा घेत आहोत आणि काही नव्या रूग्णालयांचे उद्घाटनही करत आहोत. काही प्रस्तावित रूग्णालयेही आहेत, जी आठ दिवसात रूग्णसेवेत दाखल होणार आहेत", असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, सध्या राज्यातील अशा घटनांमुळे रूग्ण दगावल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. या प्रकरणी जबाबादारी स्वीकारून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पदमुक्त करायला हवं अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. तर, आता घडलेली घटना हा राष्ट्रीय मुद्दा नाही असं म्हणणाऱ्या राजेश टोपेंवर विविध स्तरांतून टीका केली जात आहे.