"माझ्या भावांनो...' साद ऐकताच मोर्चेकरी शांत; विश्वास नांगरे पाटील यांनी कौशल्याने हाताळला मोर्चातील तणाव

कृष्ण जोशी
Sunday, 8 November 2020

शनिवारी रात्रीपर्यंत उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा मोर्चा सुरू असूनही मुख्यमंत्री भेटत नाहीत वा कोणीही जबाबदार मंत्री चर्चेसाठी येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने मोर्चेकऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण होते.

मुंबई ः शनिवारी रात्रीपर्यंत उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा मोर्चा सुरू असूनही मुख्यमंत्री भेटत नाहीत वा कोणीही जबाबदार मंत्री चर्चेसाठी येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने मोर्चेकऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण होते. मात्र, वरिष्ठ पोलिस अधिकारी विश्‍वास नांगरे पाटील यांनी, "माझ्या बहिणींनो आणि भावांनो...' अशी साद घालून कौशल्याने वातावरण शांत केले. 

हेही वाचा - मुंबईतील फटाका व्यवसायाला सव्वाशे कोटींचा फटका; केवळ दोन टक्के विक्री

मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचे, असा मोर्चेकऱ्यांचा आधीपासूनच उद्देश होता. "मातोश्री'वर मोर्चा न नेता केवळ शिष्टमंडळ न्यावे, असे त्यांना सांगण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी "मातोश्री'वर शिष्टमंडळही पाठवू नका, असा निरोप गेल्याने मोर्चेकरी संतप्त झाले. "मातोश्री'वरच मोर्चा नेण्याची तयारी त्यांनी सुरू केली. मात्र, पोलिसांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंबेडकर उद्यानातच बसण्यास सांगितले. विनायक मेटे तसेच समन्वयक राजन घाग व अन्य ज्येष्ठ मंडळी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, अशा वेळी विश्‍वास नांगरे पाटील यांनीच मोर्चाच्या ठिकाणी रात्री आठ वाजल्यानंतर येऊन परिस्थितीतील तणाव पाहून कौशल्याने सर्वांना शांत केले.

हेही वाचा - "लॉकडाऊन'मध्ये हवीशी "अनलॉक'नंतर नकोशी; बियरपाठोपाठ देशी-विदेशी मद्यविक्रीत घट

"माझ्या भावांनो आणि बहिणींनो...' अशी साद घालून त्यांनी पहिल्याच वाक्‍यात सर्वांना जिंकले. "मी देखील तुमच्याबरोबरच आहे. सरकारही तुमच्याच बाजूने आहे' अशी सुरुवात करून, त्यांनी सर्वांना विश्‍वासात घेतले. "आपल्याला शांततेत घरी जायचे आहे. लढा असा एका दिवसात संपत नाही,' असे सांगून त्यांनी आंदोलकांना आपलेसे केले. त्यांनी आणि मेटे यांनीही मध्यस्थीचे प्रयत्न सुरूच ठेवले होते. हो-नाही करता करता शेवटी परिवहनमंत्री अनिल परब मोर्चासमोर येण्यास तयार झाले आणि परिस्थिती निवळली. 
रात्री दहाच्या सुमारास अनिल परब आल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयातील कॉन्फरन्स रूममध्ये चर्चा सुरू झाली. आरक्षण प्रश्‍नावरील उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांना बदलून एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांना नेमण्याची मागणी आंदोलकांनी केली. त्यावर त्यासंदर्भात मंत्रिमंडळ चर्चा करील, असे परब म्हणाले. 

हेही वाचा - मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्णांत घट; दादर, माहीम, धारावी हे हॉटस्पॉट पूर्ण नियंत्रणात

सवलतीबाबत दोन दिवसांत निर्णय 
मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण नसले तरीही सवलती देण्याची मागणी करण्यात आली. 15 नोव्हेंबरपर्यंत त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्याचाही आग्रह शिष्टमंडळाने धरला. त्यावर मुख्यमंत्री संबंधित अधिकाऱ्यांशी दोन दिवसांत बैठक घेऊन निर्णय देतील, असे अनिल परब म्हणाले. समन्वयकांची मुख्यमंत्र्यांशी दोन दिवसांत गाठ घालून देऊ, अशीही हमी परब यांनी दिल्याचे समन्वयक राजन घाग यांनी सांगितले. अकराच्या सुमारास बैठक संपली. 
----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vishwas Nangre Patil skillfully handled the tension in maratha morcha

टॉपिकस