8 सप्टेंबरपासून नेस्को कोविड वॉर्डमधील रुग्णांवर होणार आवाजाची चाचणी

भाग्यश्री भुवड
Friday, 4 September 2020

आवाजावरून 30 सेकंदांत कोरोनाचे निदान करणाऱ्या प्रायोगिक चाचणीला गोरेगावच्या नेस्को कोरोना सेंटरमध्ये येत्या 8 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. आतापर्यंत या चाचणीवर ट्रायल सुरु आहे. 

मुंबई: आवाजावरून 30 सेकंदांत कोरोनाचे निदान करणाऱ्या प्रायोगिक चाचणीला गोरेगावच्या नेस्को कोरोना सेंटरमध्ये येत्या 8 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. आतापर्यंत या चाचणीवर ट्रायल सुरु असून याबाबतचे प्रशिक्षण इथल्या डॉक्टरांना देण्यात आल्याची माहिती नेस्कोच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली आहे. 

नेस्को कोविड सेंटरच्या कंट्रोल रूममध्ये सध्या यावर काम सुरु असून या अॅपमध्ये कसे काम करायचे याबाबतचे ट्रेनिंग पुर्ण झाले आहे. सध्या 6 जणांची टिम या मोबाईल ऍपवर काम करतेय. यातील दोन डॉक्टर वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांची सर्व माहिती घेतील आणि बाकीचे सर्व डॉक्टर्स कंट्रोल रुममधून त्यांना मॉनिटर करतील. 

सध्या त्यासाठी मोबाईल ऍपच्या स्वरूपातील दोन उपकरणांचा वापर केला जाणार आहे. या पद्धतीने कोरोनाची 80 टक्के अचूक चाचणी करता येते, असा दावा हे उपकरण बनवणाऱ्या 'व्होकोलिस हेल्थ' या इस्रायली कंपनीने केला आहे. 500 कोरोना रुग्णांवर होणारा देशातील हा अशा प्रकारचा पहिला प्रयोग आहे.

हेही वाचाः प्लाझ्मा दानासाठी महिलाही घेताहेत पुढाकार; अनेक महिलांनी व्यक्त केली प्लाझ्मादानाची इच्छा

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका अहोरात्र मेहनत घेत आहे. कोरोनाच्या 'आरटी-पीसीआर' चाचणीसह अर्ध्या तासात निदान होणाऱ्या अँटिजेन चाचण्यांची संख्याही वाढवली गेली आहे. मात्र, आता अँटिजेनपेक्षाही अधिक वेगाने कोरोनाचे निदान करण्यासाठी 'व्हाईस बायो मार्कर आर्टिफिशियल इंटिलीजन्स' म्हणजे आवाजावरून कोरोनाचे निदान करण्याची पद्धत इस्रायलने विकसित केली असून त्यामुळे 30 सेकंदांत कोरोनाचे निदान होणार आहे.

अधिक वाचाः  संजय राऊत मला उघडपणे धमकी देतायत, कंगना राणावतचं नवं ट्विट

ही पद्धत खात्रीशीर असल्याचे प्रयोगात सिद्ध झाले तर त्याचा वापर मुंबईत कोरोना चाचणीसाठी केला जाणार आहे. मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी भाषेत आवाजाचे नमुने गोळा केले जाणार आहेत, अशी माहिती नेस्कोच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली.

(संपादनः पूजा विचारे)

Voice testing will be conducted on patients in the Nesco Covid ward from September 8


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voice testing will be conducted on patients in the Nesco Covid ward from September 8