मंत्रिमंडळाच्या सरकारी निवासस्थानांची पाणीपट्टी थकली, पालिकेकडून बंगले डिफॉल्ट यादीत

समीर सुर्वे
Monday, 14 December 2020

मुख्यमंत्र्यांसह राज्यांच्या जवळ जवळ संपूर्ण मंत्रिमंडळाच्या शासकीय निवासस्थानांची पाणीपट्टी थकल्याने महानगर पालिकेने हे बंगले डिफॉल्टर यादीत टाकले आहेत.

मुंबईः  मुख्यमंत्र्यांसह राज्यांच्या जवळ जवळ संपूर्ण मंत्रिमंडळाच्या शासकीय निवासस्थानांची पाणीपट्टी थकल्याने महानगर पालिकेने हे बंगले डिफॉल्टर यादीत टाकले आहेत. यात विरोधीपक्षनेते, विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांच्या शासकीय निवासस्थानांचाही समावेश असून तब्बल 24 लाख 56 हजारांची थकाबाकी आहे.

वर्षापेक्षा जास्त काळापासून पाणीपट्टी न भरणाऱ्या ग्राहकांना पालिकेने डिफॉल्टर यादीत टाकते. डी प्रभागात तब्बल 4 हजारहून अधिक डिफॉल्टर आहेत. यात  बिल्डर, व्यापारी काही सार्वजनिक बँकाचाही समावेश आहे. ग्रान्टरोड, ताडदेव, मलबार हिल हा परिसर या प्रभागात येतो. शकील अहमद यांनी माहितीच्या अधिकारा अंतर्गत ही माहिती मिळवली आहे.

कोविड लॉकडाऊनमुळे महानगर पालिकेचे उत्पन्न घटलेले असल्याने पालिकेने यंदा कर वसुलीसाठीच आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र डी प्रभागातील डिफॉल्टर यादीतून बहुसंख्या व्यापारी, शासकीय आणि बिल्डरांचीच थकबाकी असल्याचे लक्षात येते.

मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रणात! 13 दिवसांत 105 दिवसांनी रुग्ण दुपटीत वाढ

 कोस्टल रोडचीही थकबाकी

महापालिका नरिमन पॉईंट ते वरळीपर्यंत सागरी किनारा मार्ग बांधत आहे. यातील प्रियदर्शनी पार्क ते नरिमन पॉईंटपर्यंतच्या टप्प्याचे काम लार्सन ॲन्ड ट्यूब्रो या कंपनीला देण्यात आले आहे. या कोस्टल रोडसाठी कंपनीने उभारलेल्या कार्यालयाचीही 1 लाखाच्यावर थकबाकी आहे. हे कार्यालयही पालिकेने डिफॉल्टर यादीत टाकले आहे.
 
मंत्रिमंडळाची थकबाकी

 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे( वर्षा) - 13275
 • उपमुख्यमंत्री अजित पवार (देवगिरी) -84224
 • विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (चित्रकुट )-83514
 • विधानपरिषद सभापती रामराजे निबांळकर (अजंटा)128797
 • विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (सागर)- 111550
 • महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (रॉयलस्टोन ) - 12809
 • जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास जयंत पाटील (सेवासदन)-  115288
 • ऊर्जामंत्री नितीन राऊत (पर्णकुटी ) 115288
 • उद्योगमंत्री सुभाष देसाई (पुरातन ) -50120
 • सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (मेघदूत) -111005
 • उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील (शिवगीरी) -5756
 • नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (नंदनवन)-119524
 • सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे (जेतवन )-6703
 • अन्न आणि औषध औषध प्रशासन राजेंद्र शिंगणे (सातपुडा) -23746
 • अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (मुक्तागिरी )-30102
 • अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (रामटेक) - 39939
 • सह्याद्री अतिथीगृह - 640523

वर्षा शासकीय निवासस्थानाचे पाणी बिल थकीत नाही- मुंबई महापालिकेचा अहवाल

मुख्यमंत्र्यांचे  शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' या बंगल्याची पाणी बिलापोटी कोणतीही थकबाकी नाही.  बृहन्मुंबई महानगरपालिकेकडेने दिलेल्या अहवालानुसार वर्षा आणि तोरणा या दोन्ही बंगल्यांची थकबाकी 'निरंक' आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान म्हणून मलबार हिलस्थित 'वर्षा' आणि त्याच्याशी संलग्न 'तोरणा'या बंगल्यांचा समावेश आहे. या बंगल्यांचे पाणी बिल थकीत असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलकामे विभागाच्या कार्यालयाने याबाबत थकबाकी अहवाल दिला आहे. त्यामध्ये या दोन्ही बंगल्यांची थकबाकी निरंक असल्याची वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे.

-------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Water bill pending government minister residences bmc put bungalows default list


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water bill pending government minister residences bmc put bungalows default list