"जीवन संकट' @ मुंबई 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जून 2019

रहिवाशांना गेल्या काही दिवसांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने त्यांना अनेक ठिकाणी वणवण करावी लागत आहे. गढूळ पाणी पिण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे. महापालिका सी विभाग अधिकाऱ्यांच्या निदर्शनास पाणीसमस्या आणूनही गंभीर विषयाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रहिवासी करीत आहेत. 

वडाळा  - दक्षिण मुंबईत "सी' विभागातील म्हणजेच कुलाब्यातील चिराबाजार, धोबी तलाव, भुलेश्‍वर, भोईवाडा, काळबादेवी, मुंबादेवी, निजाम स्ट्रीट आदी अनेक परिसरात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. आधीच कपात असल्याने कमी दाबाने येणारे पाणीही गढूळ असल्याने त्यांना वणवण करावी लागत आहे. 

रहिवाशांना गेल्या काही दिवसांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने त्यांना अनेक ठिकाणी वणवण करावी लागत आहे. गढूळ पाणी पिण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे. महापालिका सी विभाग अधिकाऱ्यांच्या निदर्शनास पाणीसमस्या आणूनही गंभीर विषयाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रहिवासी करीत आहेत. 

दोन महिन्यांपूर्वी पाण्याची समस्या भेडसावू नये म्हणून सी विभागातील सर्व अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकाच्या वेळी मुबलक पाणी येत होते. सध्या मात्र चिराबाजार, धोबी तलाव, भुलेश्‍वर, भोईवाडा, काळबादेवी, मुंबादेवी, निजाम स्ट्रीट आदी भागांत गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. अनेक नागरिक पर्याय म्हणून टॅंकर वा बाटलीबंद पाण्याचा वापर करीत आहेत; मात्र सर्वांनाच पाणी विकत घेणे परवडत नसल्याने काही रहिवासी दूरदूरच्या वस्त्यांमधून पाणी मिळवण्यासाठी वणवण करीत आहेत. काही ठिकाणी दोन ते तीन दिवसांनी कमी दाबाने आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने आरोग्याचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे. पाण्याच्या वाढत्या समस्येमुळे पाणीमाफियांचा व्यवसायही तेजीत सुरू आहे. 

अनेक ठिकाणी रस्त्यावरील जलवाहिन्या तुटल्या आहेत. परिणामी शाळा-महाविद्यालये आणि सरकारी रुग्णालयातदेखील गढूळ पाणीपुरवठा होत आहे. तुटलेल्या जलवाहिन्यांतून रोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. तरी महापालिकेचे अधिकारी गप्प का, असा सवाल नागरिक करीत आहेत. पाणीसमस्या त्वरित सोडवली नाही, तर सी विभाग महापालिका कार्यालयासमोर येत्या आठवड्यात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी पालिकेला दिला आहे. 

नागरिकांच्या प्रतिक्रिया 
दैनंदिन कामासाठी पाणी अत्यावश्‍यक आहे. काही महिन्यांपासून कमी दाबाने व गढूळ पाणी येत आहे. गढूळ पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. मोठ्यांसह मुलेही पाण्यासाठी पायपीट करीत आहे. पालिका अधिकारी त्याला जबाबदार आहेत. 
- सुमन माने, रहिवासी 

निवडणुकीपूर्वी स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात येत होते. सध्या दोनतीन दिवसाआड पाणी येते आणि तेही गढूळ. अनेक ठिकाणी जलवाहिन्या तुटल्याने गढूळ पाणी येत आहे. 
- प्रकाश हेगिष्टे, रहिवासी 

रीतसर शुल्क आकारूनही नागरिकांना प्रत्येक कामासाठी लागणारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे पाणीमाफियांचा व्यवसाय तेजीत सुरू आहे. 
- मंगल मयेकर, रहिवासी 

आंदोलनाचा इशारा 
पाणी समस्येबाबत स्थानिक नगरसेवक व प्रभाग समिती अध्यक्ष आकाश राज पुरोहित यांच्याशी सपर्क साधला असता ते म्हणाले, की कुलाबा मतदारसंघातील ए, बी आणि सी विभागात होणाऱ्या अनियमित व अस्वच्छ पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याबाबत संबंधित पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आलेली आहे. इथे नळ योजना राबवण्याची गरज आहे. काही परिसरात नळ योजना राबवण्यात आल्या आहेत; परंतु पाणीपुरवठा अद्याप उपलब्ध झालेला नाही. समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पालिकेच्या कारभाराविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water crisis on Mumbai