esakal | वसई-विरार शहरातील पाणीप्रश्न गंभीर! गळती थांबेना; हजारो लिटर पाणी वाया
sakal

बोलून बातमी शोधा

वसई-विरार शहरातील पाणीप्रश्न गंभीर! गळती थांबेना; हजारो लिटर पाणी वाया

वसई विरार शहरातील पाणीप्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहरातील वाढती लोकसंख्या पाहता भविष्यात शहराला पाणी पुरेल का, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

वसई-विरार शहरातील पाणीप्रश्न गंभीर! गळती थांबेना; हजारो लिटर पाणी वाया

sakal_logo
By
प्रसाद जोशी

वसई ः वसई विरार शहरातील पाणीप्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहरातील वाढती लोकसंख्या पाहता भविष्यात शहराला पाणी पुरेल का, असा प्रश्‍न विचारला जात आहे. दरम्यान शहराला सध्या जो पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहीनीतून ठिकठिकाणी गळती होत आहे. या गळतीमुळे दिवसाला हजारो लिटर पाणी वाया जात असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या गळतीकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. 

हेही वाचा - ठाण्याला मिळणार आणखी दोन नगररचनाकार; क्लस्टर योजनेला बुस्टर देण्यासाठी तयारी

सातिवली, वसई, सोपारा परिसर, धानीवबाग, संतोष भुवन, पेल्हार, श्रीरामनगर, नवजीवन, साईनगर, शंभर फूट नायगाव महामार्ग यासह अनेक ठिकाणी पाण्याची गळती होत असून झडपांतून पाणी थेट रस्त्यावर गटारात जात आहे. त्यामुळे परिसर चिखलमय होणे, दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य पसरत आहे आणि यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

सूर्या योजनेच्या धामणी धरणातून 200, उसगाव 20 व पेल्हार 10 असे एकूण 230 दशलक्ष लिटर पाणी शहराला मिळते; परंतु सूर्या योजनेच्या ठिकाणी असणाऱ्या फिल्टर प्लांट, प्रेशर एअर वॉल या ठिकाणी बिघाड होणे, वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत असतो. कधी कधी जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाला 6 ते 7 तास किंवा पूर्ण दिवसदेखील लागतो. याचदरम्यान पाणीपुरवठा बंद केला जातो व पुढे अनियमित व कमी दाबाने पाणी सोडले जात असते. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा प्रश्‍न सतत सतावात असतो. त्यात शहरातील जलवाहिनीतून जी पाणीगळती होत आहे, त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. 

हेही वाचा - बेशरम ठाकरे सरकारला हजार व्होल्टेजचा झटका देण्याची गरज; वीजबिलप्रकरणी भाजप नेत्याचा घणाघात

वसई विरार शहर महापालिकेची लोकसंख्या 20 लाखाच्या आसपास आहे. पाणी नागरिकांना मुबलक प्रमाणात मिळावे म्हणून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी करोडो रुपये खर्चकेले आहेत. त्यातच मागेल त्याला पाणी या योजनेतून नळजोडण्यादेखील देण्यात आल्या आहेत. नवीन नळजोडण्या दिल्याने पाण्याचा वापर अधिक होणार आहे. 69 गाव योजनेतील जी गावे महापालिकेत आहेत त्यांनादेखील पाणी मिळावे म्हणून काम केले जात आहे; परंतु पाण्याची गळती काही थांबत नाही. याचा परिणाम भविष्यात होण्याची शक्‍यता आहे. 

वसई विरार शहरात जलवाहिनी दुरुस्तीचे काम, कंडक्‍टर देखभाल, एअर व्हॉल्व्ह तपासणी झडपांतून येणारे पाणी रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी पथक नेमण्यात आले आहे. पाणीपुरवठा विभागाकडून आढावा घेतला जात आहे. जर कुठे पाण्याची गळती होत असेल, तर पाहणी करून गळती रोखण्यासाठी प्रभाग समितीला सूचना करण्यात येतील. 
- राजेंद्र लाड,
शहर अभियंता, महापालिका 

चार महिन्यांपासून श्रीराम नगर येथे पाणी रस्त्यावर वाहत आहे. हा मुख्य मार्ग असल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलावर्गाला गैरसोईचा सामना करावा लागत आहे. आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण होऊ शकतो. वारंवार पालिकेकडे पाठपुरावा करूनही दखल घेण्यात आली नाही. 
- प्रदीप सिंग,
कार्याध्यक्ष, उत्तर भारतीय महासंघ 

Water crisis in Vasai Virar cityWaste thousands of liters of water 

-------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )