या नागरिकांची भागणार तहान

प्रमाेद जाधव : सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

झिराड व आजूबाजूच्या गावांचा पाणीप्रश्‍न कायमचा मार्गी लावण्यासाठी जलसंधारण महामंडळ औरंगाबाद योजनेंतर्गत पाझर तलाव बांधणार आहे. या तलावातील पाणी पिण्यासह शेती व अन्य कामांसाठी वापरले जाईल. झिराड परिसरातील पाच-सहा गावांना लाभ मिळणाऱ्या या तलावातून सुमारे ३० हजार ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. 

अलिबाग : झिराड व आजूबाजूच्या गावांचा पाणीप्रश्‍न कायमचा मार्गी लावण्यासाठी जलसंधारण महामंडळ औरंगाबाद योजनेंतर्गत पाझर तलाव बांधणार आहे. या तलावातील पाणी पिण्यासह शेती व अन्य कामांसाठी वापरले जाईल. झिराड परिसरातील पाच-सहा गावांना लाभ मिळणाऱ्या या तलावातून सुमारे ३० हजार ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. 

झिराड गावापासून काही अंतरावर डोंगरानजीक गट क्र. ८५ व ८७ येथे गुरचरण व राज्य सरकारच्या मालकीची सुमारे ३० एकर जमीन आहे. पाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी या क्षेत्रातील काही भागात पाझर तलाव बांधण्याची संकल्पना रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी मांडली. त्यासाठी त्यांनी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. आमदार पाटील यांनी जलसंधारण महामंडळाच्या औरंगाबाद योजनेतून पाझर तलावासाठी एक कोटी ७६ लाख ३४ हजार ४८७ रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. 

सिंहगडापासून शिवरायांचा जयघोष... का ते वाचा

या पाझर तलावामुळे परिसरातील हजारो ग्रामस्थांचा पाणीप्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. भातशेतीसह अन्य पिके घेण्यासाठी या तलावाचा फायदा होईल. या पाझर तलावातील पाणी शेतीबरोबरच अन्य कामे व पिण्यासाठी स्थानिकांना पुरवले जाणार आहे. भविष्यात या पाझर तलावात फिल्टर प्लांट बसवून पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवण्याचा प्रयत्न आहे. या तलावाचे काम ठाणे येथील मृद व जलसंधारण विभागामार्फत केले जाणार आहे. हे काम जूनच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे कंत्राटदार श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्‍शन्स (सोलापूर) यांनी सांगितले. 

अबब... हाजी अली दर्ग्याला ‘बुलंद दरवाजा’ उभारणार

दृष्टिक्षेपात... 
एकूण पाणीसाठा : ९९.८५ स.घ.मी 
सिंचनासाठी पाणीसाठा : ८४.९४ स.घ.मी. 
धरणाची लांबी : १४० मीटर 
धरणाची उंची : १२.९२ मीटर 
सांडव्याची लांबी : ६ मीटर 
पुच्छ कालवा लांबी : १३५ मीटर 
योजनेची अंदाजपत्रकीय रक्कम : एक कोटी ७६ लाख ३४ हजार ४८७

झिराड व अन्य गावांमधील ३० हजारांहून अधिक ग्रामस्थांना या तलावातील पाण्याचा उपयोग होईल. पाझर तलाव प्रत्यक्षात होणार असल्याने पाणीप्रश्‍न कायमचा सुटेल. या तलावामुळे परिसराचा कायापालट होणार आहे. 
- दिलीप भोईर, समाजकल्याण सभापती, रायगड जिल्हा परिषद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Problem will soon solve