जलयुक्त शिवार शेतकर्‍यांसाठी संजीवनीच! कॅगच्या अहवालावर आमदार आशिष शेलार यांचे प्रश्नचिन्ह

विनोद राऊत
Thursday, 10 September 2020

राज्यात जलयुक्त शिवारची केवळ 0.17 टक्के कामे आणि तीदेखील ठराविक भागात अभ्यासून संपूर्ण राज्यात यशस्वी  आणि शेतकर्‍यांसाठी संजीवनी ठरलेल्या या योजनेचे मूल्यमापन करणे चुकीचे आहे

मुंबई : राज्यात जलयुक्त शिवारची केवळ 0.17 टक्के कामे आणि तीदेखील ठराविक भागात अभ्यासून संपूर्ण राज्यात यशस्वी  आणि शेतकर्‍यांसाठी संजीवनी ठरलेल्या या योजनेचे मूल्यमापन करणे चुकीचे आहे. त्यामुळे या योजनेच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येऊ शकत नाही, असे म्हणत भाजप नेते अॅड आशीष शेलार यांनी कॅगच्या अहवालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मराठा आरक्षणाबाबत नारायण राणे यांचा सरकारवर हल्ला; नात्यातले दोन वकील नेमल्याचा आरोप

राज्यात जलयुक्त शिवारची एकूण 6,41,560 कामे झाली. त्यापैकी कॅगने तपासलेली कामे केवळ 1128 आहेत. म्हणजेच केवळ 0.17 टक्के कामांवरून संपूर्ण जलयुक्त शिवारचे मूल्यमापन विश्वासार्ह कसे ठरेल, असा सवाल शेलार यांनी केला आहे.  याचाच अर्थ 99.83 टक्के कामे तपासलीच नाहीत. 22,589 गावांमध्ये हि कामे झाली. कॅगने केवळ 120 गावांमधील कामे तपासली. याचा अर्थ केवळ 0.53 टक्के गावेच तपासली. 99.47 टक्के गावांमध्ये न जाताच तयार केलेला अहवाल वस्तुस्थितीदर्शक कसा मानायचा, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
कॅगच्या अहवालात जलयुक्त शिवार योजनेमुळे कमी साठवण क्षमता तयार झाल्याचे म्हटले आहे. मुळात वाहून जाणारे सर्व पाणी अडवणे हा उद्देश नव्हता. तर त्या गावाची पाण्याची आवश्यक गरज भागवणे आणि ती गाव जलपरिपूर्ण करणे हा उद्देश होता, असे शेलार यांनी म्हटले आहे.  अहवालात 83 पैकी 37 गावांमध्ये नियोजनापेक्षा कमी साठवण क्षमता निर्माण झाल्याचे म्हटले आहे. पण, 83पैकी केवळ 17 गावांमध्येच टँकर्सची गरज भासली. याचा अर्थ अभियानामुळे 80 टक्के गावांमध्ये टँकर्सची गरज भासली नाही, हे सिद्ध होत असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे. 

कंगनाच्या बंगल्यावरील कारवाई सुडबुद्धीने! आशिष शेलार यांची पालिका, राज्य सरकारवर टीका

भ्रष्टाचाराचा आरोप नाही!
कॅगच्या अहवालात भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. कामे 98 टक्के पूर्ण झाल्याचे मान्य करण्यात आले आहे. उलट या योजनेमुळे पिकांची लागवड आणि क्षेत्र वाढले. हे या अभियानाचेच यश आहे. कॅगच्या अनेक शिफारसी  सुधारणात्मक आहे. याचाच अर्थ हे अभियान यापुढेही सुरू रहावे, अशी कॅगची इच्छा आहे. ठाकरे सरकारने विकासाच्या योजनांना स्थगिती देण्याऐवजी या शिफारसी अंमलात आणाव्यात, असेही आशीष शेलार यांनी म्हटले आहे.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water-rich Shivar is a lifeline for farmers MLA Ashish Shelar questions CAG report