मुंबईत उद्या या परिसरात पाणीपुरवठा बंद; जलवाहिनी कामामुळे BMC चा निर्णय

समीर सुर्वे
Thursday, 10 September 2020

मुंबई महापालिका भायखळा येथील जकेरीया बंदरजवळील 100 वर्ष जुनी 1450 मिमी व्यासाची जलवाहीनी बदलत असून या ठिकाणी 1500 मि.मी व्यासाची जलवाहीनी टाकण्याचे काम शुक्रवारी (ता.11) सकाळी सुरु होणार आहे.

मुंबई : मुंबई महापालिका भायखळा येथील जकेरीया बंदरजवळील 100 वर्ष जुनी 1450 मिमी व्यासाची जलवाहीनी बदलत असून या ठिकाणी 1500 मि.मी व्यासाची जलवाहीनी टाकण्याचे काम शुक्रवारी (ता.11) सकाळी सुरु होणार आहे. त्यामुळे परळ, शिवडी, नायगाव या भागात शुक्रवारपासून शनिवार सकाळपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या भागात केईएम, टाटा, वाडीया तसेच काही रुग्णालयात पाणी पुरवठा होणार नाही. खबरदारीचा उपाय म्हणून या रुग्णालयांना टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. जलवाहीनी बदलण्याचे काम शनिवारी सकाळी 10 वाजे पर्यंत सुरु राहाणार आहे.
या काळात शिवडी पुर्व पश्‍चिम,परेल गाव परीसर, नायगाव, शिवडी तसेच घोडपदेव परीसरात पाणी पुरवठा होणार नाही. तर, दादर, हिंदमाता, लालबाग, तसेच भायखळ्यातील काही भागांत कमी पाणी पुरवठा होणार आहे. या भागातील नागरिकांनी पुरेसे पाणी साठवून ठेवावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. परळ विभागात मुंबईतील महत्वाची रुग्णालये आहे. टाटा रुग्णालयाने कर्करोगग्रस्त, कोव्हिड रुग्णांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. तसेच, केईएम आणि वाडिया रुग्णालयावरही अतिरीक्त ताण आहे. तुर्तास या रुग्णालयातील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र, पालिकेकडून या रुग्णालयांना टॅंकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water supply to Mumbai today BMCs decision due to naval work