
2000 नंतरच्या झोपड्यांनाही पाणी
मुंबई : महापालिका निवडणूक तोंडावर आल्याने शहरातील सर्व झोपड्यांमध्ये पाणी पोहचणार आहे. 2000 नंतरच्या झोपड्यांना पाणी देण्याचा निर्णय सोमवारी (ता. 28) महापालिका सभागृहात घेण्यात आला. पाण्यासाठी झोपडीवासीयांचा महापालिका मुख्यालयावर मोर्चा आला असतानाच शिवसेनेने हा प्रस्ताव मंजूर केला.
महापालिका सध्या 2000 पर्यंतच्या झोपड्यांना पाणीपुरवठा करते. मात्र, सर्व झोपड्यांना पाणी देण्यासाठी पाणी हक्क परिषदेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने पालिका प्रशासनाला धोरण तयार करण्याचे आदेश दिले होते. धोरण तयार करून प्रशासनाने ते महासभेत मांडले होते. मात्र, शिवसेना विविध कारणांमुळे त्याला विरोध करत होती. अखेरीस निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला सर्व झोपड्यांना पाणी देण्याचा निर्णय घ्यावा लागला.
पदपथ व रस्त्यावरील झोपड्या, खासगी जमिनींवरील झोपड्या, समुद्रकिनारपट्टीवरील गावठाणे, तसेच राज्य आणि पालिकेच्या प्रस्तावित प्रकल्पांच्या जागेवरील झोपड्यांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
झोपड्यांना पाणी पुरवण्याच्या मागणीसाठी शहरातील विविध झोपडपट्ट्यांमधील शेकडो नागरिकांनी सोमवारी दुपारी पालिका मुख्यालयाबाहेर पाण्याच्या बाटल्या घेऊन आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी उपायुक्त रमेश पवार यांची भेट घेऊन तत्काळ पाणीपुरवठा सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. हे आंदोलन सुरू असतानाच 2000 नंतरच्या झोपड्यांना पाणी देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
आवश्यक कागदपत्रे
2000 किंवा त्यापूर्वी दिलेला फोटोपास, पालिकेच्या कराची पावती, 2000 किंवा त्यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत नाव असल्याचा पुरावा, मतदार ओळखपत्र
निवासी पत्त्यावरील रेशन कार्ड व आधार कार्ड.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर का होईना पालिकेने झोपडीवासीयांना पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल आभार. पाणी हक्क देणे हा संविधानाचा आदर असल्याने तातडीने त्याची अंमलबजावणी व्हावी.
- सीताराम शेलार, पाणी हक्क समिती