आमच्या प्रयत्नांवर पाणी फेरले; आघाडी सरकारवर फडणवीस यांची टीका

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 9 September 2020

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे या समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी आमच्या सरकारने केलेल्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई : मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे या समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी आमच्या सरकारने केलेल्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. सर्वांना विश्वासात घेऊन राज्य सरकारने योग्य कारवाई केली असती तर, या सरकारला आरक्षण कायम राखता आले असते. पण, हे सरकार प्रारंभीपासूनच आरक्षणाच्या प्रश्नात गंभीर नव्हते, असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.   

मुंबई विद्यापीठाकडून अंतिम वर्षाचे वेळापत्रक जाहीर; 1 ते 17 ऑक्टोबरदरम्यान परीक्षा; जाणून घ्या परीक्षेचे स्वरूप

आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दिवस-रात्र एक करून परिश्रम घेतले. केवळ विधिमंडळात कायदे करून ते टिकविता आले नसते, हे लक्षात घेऊन राज्य मागासवर्ग आयोग गठीत केला. आरक्षणाच्या संपूर्ण राज्यभर झालेल्या लढ्याला कायदेशीर आधार दिला. उच्च न्यायालयात प्रयत्नांची शर्थ करून आरक्षण टिकविले. आज, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आपण व्यथित झालो असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. 
राज्य सरकारने दाखविलेल्या बेपर्वाईचा, असंवेदनशील हाताळणीचा हा परिपाक आहे. प्रारंभीपासूनच न्यायालयाशी संबंधित प्रत्येक बाबतीत या सरकारने दुर्लक्ष केले. कधी वकिल हजर झाले नाही. तर कधी वेळेत आवश्यक परिपूर्ती केली गेली नाही. मागासवर्ग आयोग 7 महिन्यांपासून गठीत केलेला नाही. यासाठी आपण पत्रव्यवहार सुद्धा केला. पण, सरकारने त्यालाही दाद दिली नाही, अशीही टीका फडणवीस यांनी केली. यापुढे मराठा समाजाच्या प्रत्येक लढ्यात आपण त्यांच्यासोबत आहोत. या लढ्यात समाज एकटा  नाही. भारतीय जनता पक्ष त्यांच्यासोबत आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

कंगनाच्या बंगल्यावरील कारवाई सुडबुद्धीने! आशिष शेलार यांची पालिका, राज्य सरकारवर टीका

हा काळा दिवस : चंद्रकांत पाटिल
सध्याचे सरकार महाभकास आघाडी सरकार असून मराठा समाजाच्या आशा, आकांक्षांवर पाणी फेरण्याचा प्रकार सरकारने केल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे. पिचलेल्या समाजाला नोकरीत आणि शिक्षणात जे आरक्षण मिळाले होते ते आता मिळणार नाही. त्यामुळे हा काळा दिवस असल्याचे पाटील म्हणाले आहेत.

-------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The water turned on our efforts; Fadnavis criticizes the alliance government