...म्हणून महागली कलिंगडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

यंदा पाऊस खूप लांबला. त्यानंतर अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे कलिंगडाची लागवड खूप उशिराने झाली. काहींनी तर या फळशेतीकडे पाठ फिरवली.

पाली : पावसाळा लांबल्याने रायगड जिल्ह्यात यंदा कलिंगडाची लागवड उशिरा झाली आहे. त्यामुळे हे फळ बाजारातही उशिरा दाखल झाले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 ते 30 टक्‍क्‍यांनी भाववाढ झाली आहे. 

यंदा पाऊस खूप लांबला. त्यानंतर अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे कलिंगडाची लागवड खूप उशिराने झाली. काहींनी तर या फळशेतीकडे पाठ फिरवली. त्यामुळे त्याचे क्षेत्र घटले. त्याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे. गेल्या वर्षी 8 हजार रुपये टन या घाऊक भावाने मिळणारे हे फळ तब्बल 11 ते 12 हजार रुपये टन भावाने विकण्यात येत आहे. किरकोळ बाजारातही ते महागले आहे. किरकोळ बाजारात 50 ते 60 रुपयांना मिळणारे मध्यम आकाराचे कलिंगड आता 80 ते 90 रुपयांना विकण्यात येत आहे.
 
धक्कादायक : अन्‌ स्कायवॉकवरून तिने मारली उडी..

उष्म्यामुळे पसंती 
यंदा रायगड जिल्ह्यात विशेष थंडी जाणवली नाही. आता तर उष्मा जाणवत आहे. त्यामुळे थंडाव्यासाठी नागरिक कलिंगडाला पसंती देत आहेत. त्यामुळे किमती वाढल्या आहेत. 

यंदा पावसाळा लांबल्याने पिकांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे कलिंगडाचीदेखील उशिराने लागवड झाली आहे. उत्पादनही उशिरा आले आहे. जिल्ह्याव्यतिरिक्त इतरही ठिकाणची कलिंगडे बाजारात दाखल झाली असून त्यांच्या किमती आवाक्‍यात येतील. 
- पांडुरंग शेळके, जिल्हा कृषी अधीक्षक, रायगड 

अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. खराब हवामानाचा फटका कडधान्य, कलिंगड आणि इतर पिकांना बसला आहे. सरकारच्या पीककर्ज माफीबद्दल अजूनही साशंकता आहे. या सर्वांमुळे येथील शेतकरी भरडला गेला आहे. 
- शरद गोळे, सचिव, सुधागड कृषिमित्र संघटना, पाली 

यंदा जिल्ह्यात कलिंगडाचे उत्पादन खूप कमी झाले आहे. त्यामुळे घाऊक किमती खूप वाढल्या आहेत. किरकोळ बाजारातही भाववाढ आहे. मात्र खवय्ये आवर्जून खरेदी करतात. 
- उमेश मढवी, कलिंगड विक्रेता, पाली 

खराब हवामानामुळे कलिंगडाला फटका बसला आहे. त्यामुळे यंदा कलिंगडाची शेती केली नाही. यंदा जिल्ह्यात कलिंगडाचे उत्पादन घटण्याची शक्‍यता आहे. 
- तुषार केळकर, प्रयोगशील-तरुण शेतकरी, उद्धर, सुधागड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Watermelon prices have gone up