esakal | पनवेलमध्‍ये ‘मोरया’चा जयघोष... ढोल-ताशांचा गजर!
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेल ः गणरायाचे धुमधडाक्‍यात स्‍वागत.

रविवारी सकाळपासूनच पनवेल शहरांतील मुख्य बाजारपेठेसोबत पालिका हद्दीतील कळंबोली, खारघर; तसेच नवीन पनवेल परिसरातील गणपती बाप्पांचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्‍त सज्ज झाले होते.

पनवेलमध्‍ये ‘मोरया’चा जयघोष... ढोल-ताशांचा गजर!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पनवेल : कुठे ढोल-ताशांचा दणदणाट; तर कुठे पारंपरिक वाद्याच्या गजरात सकाळपासूनच लाडक्‍या देवबाप्पाला मंडपात आणण्याची लगबग सुरू झाली. रविवारी सकाळपासूनच पनवेल शहरांतील मुख्य बाजारपेठेसोबत पालिका हद्दीतील कळंबोली, खारघर; तसेच नवीन पनवेल परिसरातील गणपती बाप्पांचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्‍त सज्ज झाले होते. अनेक भागात अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती; तर रविवारच्या हक्काच्या सुट्टीनंतर दुसऱ्या दिवशीही गणेश चतुर्थीची सुट्टी मिळाल्याने दोन दिवस गावी जाणाऱ्यांची गर्दी सर्वच प्रमुख महामार्गांसह रेल्वेस्थानकात झाली होती.

काही दिवसांपासून उत्सवाच्या तयारीचे वेध लागल्याने सजावटीसाठी लागणारे साहित्य; तसेच छोट्या-मोठ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांची देखाव्यासाठी सुरू असणारी लगबग सर्वत्र पाहायला मिळत आहे. आज अखेर बाप्पांचे आगमन होणार असल्याने सगळीकडे जय्यत तयारी करण्यात आली आहे. घरातील गणपतींबरोबर शहरातील प्रमुख गणेश मंडळाच्या श्रींची प्रतिष्ठापनासुद्धा सकाळच्या वेळात होणार आहे.

गणरायाच्या आगमनाची धूम ही बाजारपेठेतसुद्धा दिसून येत आहे. गणरायाच्या पूर्वसंध्येला फळे, फुले; तसेच पूजेचे साहित्य घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. अनेक ठिकाणी फुलांचे दरही वाढवण्यात आल्याने ग्राहकांमध्ये थोडी नाराजी दिसून आली.  मातीची अथवा शाडूच्या मूर्ती प्रतिष्ठापित करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात यावा, असे आवाहनही अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आले. 

रविवारी गणरायाचे धुमधडाक्‍यात आगमन
परिसरातील सर्वच प्रमुख मंडळांच्या बाप्पांचे आगमन दरवर्षीप्रमाणे गणेश चतुर्थीच्या एक दिवस अगोदरच झाले. गणेशमूर्ती मंडपात आणल्यानंतर राहिलेल्या सजावटीवर शेवटचा हात फिरवता यावा याकरिता ही तजवीज दरवर्षी केली जाते. रविवारीदेखील मध्यरात्रीपासूनच अनेक मंडळांनी गणेशमूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांच्या कार्यशाळेतून मूर्ती मंडपाकडे घेऊन जाण्यास सुरुवात केली होती.  

द्रुतगती मार्गांवर गर्दी 
द्रुतगतीमार्गे राज्यात व राज्याबाहेर जाणाऱ्या वाहनांना शीव-पनवेल महामार्गावर कळंबोली मॅक्‌डोनल्ड येथे शेवटचा थांबा असल्याने या ठिकाणी गणेशोत्सवानिमित्त गावाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांनी तुफान गर्दी केली होती. प्रवाशांच्या गर्दीमुळे या भागातील रस्त्याचा जवळपास अर्धा भाग वाहतुकीकरिता पूर्णपणे बंद झाला होता. 

फलाट बदलामुळे प्रवाशांची कसरत 
कोकणात जाणाऱ्या भक्तांकरिता पनवेल रेल्वेस्थानकातून विशेष रेल्वे सोडण्यात येत आल्‍या आहेत. याशिवाय, जवळपास सर्वच रेल्वे गाड्यांना पनवेलमध्ये थांबा असल्याने रेल्वेस्थानकावर रात्रीपासूनच मोठी गर्दी झाली होती. फलाट क्रमांक ७ वरून सुटणारी पनवेल-सावंतवाडी विशेष रेल्वे अचानकपणे फलाट क्र. ७ ऐवजी ५ नंबर फलाटावरून सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने ऐन वेळी जाहीर केल्याने ५ क्रमांकाचा फलाट गाठण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागली.

मिठाईच्या दुकानात गर्दी
लाडक्‍या बाप्पाला नेवैद्य दाखवण्याकरिता मोदकांना पसंती दिली जात असल्याने मिठाईच्या दुकानातून माव्यापासून तयार करण्यात आलेले मोदक खरेदीकरिता ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. दुकानदारांकडे पाव किलोपासून एक किलोच्या 
मोदकाची ४०० रुपये किलोने विक्री करण्यात आली.

loading image
go to top