
चोरी करायला गेला आणि जीव गमावून बसला
डोंबिवली - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची भोईरवाडी येथील वसाहतीत सोमवारी रात्री दोन चोरटे चोरी करायला गेले. मात्र तेथील सुरक्षा रक्षकाच्या ही बाब लक्षात आल्याने, दोघांनी पळून जायचा प्रयत्न केला. इमारतीच्या ड्रेनेज पाईपच्या सहाय्याने आठव्या मजल्यावरून खाली उतरत असताना यातील एक चोरटा मोहम्मद स्लिम भाटकर (वय २४) याचा पहिल्या मजल्यावरील स्लॅपवर पडून मृत्यू झाला आहे. तर अरफाह हा जखमी झाला आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसरा चोरटा अरफाह मुस्तफा पिणारी (वय २२) याला पोलिसांनी अटक केली आहे. सराईत गुन्हेगार असलेल्या मोहम्मदला या चोरीच्या घटनेत आपला जीव गमवावा लागला आहे. केडीएमसीचे बीएसयुपी योजनेअंतर्गत अनेक गृह प्रकल्प तयार आहेत, मात्र तेथे कोणी रहावयास न आल्याने आज ते धूळखात पडून आहेत. हे चोरांच्या पथ्यी पडत असून येथील भंगार, लोखंडाचे सामानच नाही तर लिफ्ट देखील चोरांनी चोरून नेल्याची घटना यापूर्वी घडली आहे.
डोंबिवली पूर्वेतील भोईरवाडी परिसरातील केडीएमसी वसाहतीतील बिल्डिंग क्रमांक ४ मध्ये हि घटना घडली आहे. न्यू गोविंदवाडी परिसरात अरफाह व मोहम्मद रहाण्यास असून मयत मोहम्मद हा येथील पालिकेच्या बीएसयुपी बिल्डिंग मध्येच रहात आहे. सोमवारी रात्री १२ च्या सुमारास दोघे भोईरवाडी येथील केडीएमसीच्या रिकाम्या वसाहतीत इलेक्ट्रिक वायर चोरी करण्यासाठी गेले होते. मात्र तेथील सुरक्षा रक्षकाच्या हि बाब लक्षात आली. त्याने या दोघांना हटकले, तो त्यांना वर बघायला गेला असता दोघांनी पळण्याचा प्रयत्न केला. ड्रेनेज पाईप लाईनच्या सहाय्याने आठव्या मजल्यावरून खाली उतरत असताना मोहम्मद याचा पहिल्या मजल्यावरील स्लॅप वर पडून मृत्यू झाला. तर अरफाह हा जखमी झाला आहे. सुरक्षा रक्षकाने तत्काळ टिळकनगर पोलिसांना संपर्क साधत याची माहिती दिली असता टिळ्कनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. एन. करौती यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देत आरोपी अरफाह याला अटक केली आहे, तर मोहम्मद याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पालिकेच्या रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मोहम्मद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर यापूर्वी देखील अनेक गुन्हे नोंद असल्याची माहिती डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांनी दिली.
Web Title: Went To Steal And Lost His Life Thieves Continue To Axing In Kdmc Colony
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..