
पश्चिम रेल्वेचे मिशन मान्सून
मुंबई : पावसाळ्यात पश्चिम रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकांमध्ये रेल्वेरुळावर पाणी साचून लोकलचा खोळंबा होतो. त्यामुळे या वर्षी प्रशासनाद्वारे मान्सूनपूर्वची जोरदार तयारी सुरू केली आहे. नालेसफाई, पाणी उपसण्यासाठी पंपांची व्यवस्था, रेल्वेरूळ मार्ग सफाई, ओव्हरहेड वायरची देखभाल, फांद्यांची छाटणी अशी कामे प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. यासह यांत्रिक, सिग्नलिंग, इलेक्ट्रिकल मालमत्ता आणि उपकरणांची देखभाल आणि दुरुस्ती सुरू आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यात आला. ज्या ठिकाणी अधिक आणि वारंवार पाणी तुंबते तेथे जास्त पंप बसविण्यात येणार आहेत. ग्रँट रोड, प्रभादेवी, दादर, माटुंगा रोड, माहीम यार्ड, वांद्रे, खार, अंधेरी, जोगेश्वरी आणि वसई-विरार या भागात पाणी तुंबण्याच्या घटना सातत्याने घडतात. परिणामी, रेल्वे वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे या स्थानक परिसरामध्ये रेल्वे प्रशासनाने विशेष लक्ष ठेऊन मान्सूनपूर्वची कामे हाती घेतली आहेत.
रेल्वेने मुंबईत १० स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रे बसवली आहेत. त्यामुळे पर्जन्यमान आणि पाण्याच्या पातळीच्या डेटाचे रिअल टाइम आधारावर निरीक्षण केले जाईल आणि त्यानुसार प्रतिबंधात्मक कारवाई सुरू होईल.
ड्रोनद्वारे सर्वेक्षण
पश्चिम रेल्वे मार्गावरील नायगाव ते विरार पट्ट्यातही पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे बोरिवली-विरार आणि वसई-विरार विभागातील नाल्यांच्या कामांची पाहणी, स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी रेल्वेतर्फे ड्रोनद्वारे सर्वेक्षणही करण्यात आले आहे.
...अशी आहे सज्जता
रेल्वे कॉलनी, रेल्वे रुळांशेजारी, रेल्वे परिसरातील झाडांची छाटणी पूर्ण.
मुंबई विभागातील ३६ पाणी तुंबण्याच्या ठिकाणी पूरमापक उपकरणे
पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी नवीन मॅनहोल आणि नालेबांधणी
पाण्याचा जलद निचरा होण्यासाठी नाल्यांचे अपग्रेडेशन आणि रि-ग्रेडिंग
सफाईच्या दोन फेऱ्या
पश्चिम रेल्वेने मुंबई विभागातील १८ किलोमीटर नाल्यांची सफाई केली आहे; तर उर्वरित ४२ किलोमीटर नाल्यांच्या सफाईचे काम सुरू आहे. साफसफाईची पहिली फेरी मे महिन्याच्या मध्यापर्यंत पूर्ण होईल. पावसाळ्यात १५ दिवसांच्या अंतराने आणखी दोन फेऱ्या केल्या जातील.
Web Title: Western Railway Mission Monsoon Review Works Officials Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..