esakal | व्हेल माशांच्या उलटीच्या तस्करीप्रकरणी दोघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

whale fish

व्हेल माशांच्या उलटीच्या तस्करीप्रकरणी दोघांना अटक

sakal_logo
By
राजू परुळेकर

मुंबई : शासनाने बंदी घातलेल्या व्हेल माशांच्या उलटीच्या (whale ambergris) तस्करीप्रकरणी दोघांना घाटकोपर (Ghatkopar) युनिटच्या गुन्हे शाखेच्या (crime branch) अधिकार्‍यांनी अटक (Arrested) केली. योगेश रमेश चव्हाण आणि सुरेंद्र छोटो साव अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी सुमारे सहा कोटी रुपयांची ५ किलो ९१० ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने (court) पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा: जोगेश्‍वरी येथे मूकबधीर महिलेवर लैगिंक अत्याचार; गुन्हा दाखल

व्हेल माश्याची उलटी समुद्रात तरंगते सोने असून हा पदार्थ स्पर्म व्हेल माशांच्या पोटात तयार होतो, त्याचा वापर अतिउच्च प्रतीचे परफ्युम, औषधांसह सिगारेट, मद्य आणि पदार्थांमध्ये स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. शासनाने व्हेल माशांच्या उलटीची तस्करीवर बंदी घातली आहे. असे असताना काहीजण या उलटीची विक्रीसाठी भांडुप परिसरात येणार असल्याची माहिती घाटकोपर युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक मनिष श्रीधनकर यांच्यासह सुधीर जाधव, आनंद बागडे व अन्य पोलीस पथकाने भांडुप येथील कांजूरमार्ग-भांडुप सर्व्हिस रोड, पूर्व दुतग्रती महामार्गावरील भांडुप पादचारी पुलाजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती.

बुधवारी सायंकाळी सव्वासहा वाजता तिथे दोन तरुण आले होते. या दोघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील काळ्या रंगाच्या सॅकची तपासणी केल्यानंतर त्यात पोलिसांना ५ किलो ९१० ग्रॅम वजनाचे व्हेल माशांची उलटी सापडली. या उलटीची किंमत सुमारे सहा कोटी रुपये इतकी आहे. ही उलटी जप्त केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.

चौकशीत त्यांची नावे योगेश चव्हाण आणि सुरेंद्र साव असल्याचे उघडकीस आले. ते दोघेही मुलुंड आणि मालाडचे रहिवाशी आहेत. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांनी व्हेल माशांची उलटी कोठून आणली, ती उलटी ते कोणाला विकणार होते. या गुन्ह्यांत त्यांचे इतर काही सहकारी आहेत का, यापूर्वीही त्यांनी व्हेल माशांची उलटीची तस्करी केली आहे का याचा आता पोलीस तपास करीत आहेत.

loading image
go to top