स्त्री बिचारी ‘इथली‘ काय आणि ‘तिथली‘ काय...

स्त्री बिचारी ‘इथली‘ काय आणि ‘तिथली‘ काय...
taliban
talibansakal

एका वर्षापुर्वी एक कादंबरी वाचली होती. 'ए थाऊजंड स्प्लेन्डीड सन्स'... लेखक खालिद हुसैनी...जगातील सगळ्यात शोकांतिका असलेल्या कादंबर्‍यापैकी ही एक कादंबरी आहे. एव्हाना सगळ्यात शोकांतिक म्हटली तरी चालेल...

अफगाणिस्तान मधील महिलांची विदारक परिस्तिथी या कादंबरीत लेखकाने मांडली आहे. काय असते अफगाणी महिलांचे रोजचे जीवन? कशा रोजचा दिवस ढकलत असतील त्या? त्यांच्याबद्दल वाचले तरी अंगावर काटा येतो...

अफगाणिस्तान मधील सकाळ ही, मशिदीमधून येणारी बांग आणि त्याचसोबत आकाशातून येणार्‍या रॉकेट्सच्या आवाज कुठलाही फरक जाणवत नाही. एकीकडे नमाज पढणे आणि एकीकडे रॉकेट्सचे येणारे आवाज, यातच अफगाणिस्तानच्या कित्येक सकाळ गेल्यात. लोकांची रडारड तर वेगळीच. जिकडे पहावे तिकडे आपल्याला फक्त धुराचे लोट दिसतील. हाताला जे काही लागेल त्याने, मातीचे ढिगारे उखरायचे, आणि आपले आई - वडील, भाऊ - बहीण, आजी - आजोबा, नात - नातू, मैत्रिणी - मित्र यांच्या शरीराचे भाग सापडतात का ते शोधायचे.

अफगाणी लोकांसाठी, सगळ्यात सुंदर आणि हृदयस्पर्शी गोष्ट हीच की, आपण आज वाचलो, आपल्याला आजचा दिवस पाहायला भेटला. सकाळ पासून भितीदायक सुरू झालेला प्रवास, रात्री भितीदायक पडणार्‍या स्वप्नांसोबतच समाप्त होतो.

स्त्रियांचे आयुष्य म्हणजे, काळ्या अंधारात, डोळ्याला काळी पट्टी बांधुन, काळी मांजर शोधण्यासारखे आहे. तालिबान आता तिथले सरकार चालविणार यात काही शंका नाही, आणि तेही शरिया कायद्यानुसारच. शरियाचा अर्थ, 'स्वच्छ, आखून दिलेला रस्ता' असा होतो. हा, कायदा काही फक्त अफगाणिस्तान मध्येच आहे असे नाही तर, अनेक मुस्लिम देशांमध्ये या कायद्याचे पालन होते. फरक, इतकाच की, ज्या प्रमाणे तालिबान हा कायदा जबरदस्तीने इतरांना पालन करायला लावतो, तसे इतर देश जबरदस्ती करत नाही.

मुस्लिम धर्मातील अनेक लोकांवर या कायद्याचा जोरदार पगडा आहे. काही लोक एकदम टोकाचा कायदा पाळतात, तर काही लोक या कायद्याचा विरोध करतात. शरिया कायद्यामध्ये असणारे नियम हे फार जुने आहेत. काळानुसार त्यात कुठलेही बदल आतापर्यंत करण्यात आलेले नाहीत. कठोरातली कठोर शिक्षा या कायद्यांतर्गत गुन्हा करणार्‍यांना देण्यात येते.

मुस्लिमांचा शरिया कायदा पाळणे मुस्लिमांनाच जाचक वाटतो तर, मुस्लिमच का मुस्लिमांवर सक्ती करतात? हा मोठा प्रश्न आहे.

धर्मांध बनलेले तालिबानी, वाईट प्रवृत्तीचा मुस्लिम धर्म जगासमोर आणत आहेत. दहशतवादाला आणि आतंकवादाला कुठलाही धर्म नसला तरी, प्रत्येक दहशतवादी आणि आतंकवादी एकाच धर्माचा का असतो? हा प्रश्न येणारी पिढी विचारू शकते.

पारंपरिक मुस्लिम वेष परिधान करणे, पुरुषांनी दाढी ठेवणे आणि यापेक्षाही जास्त अवघड मुस्लिम स्त्रियांचे, स्त्रीने बुरखा घातला पाहिजे, स्त्रियांनी घराबाहेर पडतांना वडील, नवरा किंवा मुलगा सोबत असलाच पाहिजे नाहीतर घराबाहेर पडायचे नाही, वयाच्या तेरा वर्षांनंतर शिक्षण बंद, चित्रपट पाहणे, पब्लिक प्लेस मध्ये हसायचे नाही, हाताला नेलपेंट लावायचे नाही आणि पुरुषांच्या नजरेला नजर देऊन बोलायचे सुद्धा नाही.

कुठलीही स्त्री यास विरोध करू शकत नाही, विरोध केला तरी, प्रत्येक स्त्रियांना मलाला सारखी थोडीच वागणूक मिळणार आहे. अफगाणिस्तान मध्ये 52% मुलींचे लग्न हे वयाच्या 20 वर्षापर्यंत झालेली असतात.

तालिबानची ही परिस्तिथी पाहिल्यावर, वाचल्यावर मनात कुठेतरी विचार आला, आपल्या इकडची पुरुषी मानसिकता सुद्धा यापेक्षा काही वेगळी आहे का? आपल्या भारतातही महिलांवर अत्याचार होतोच की... घरगुती, बाहेर, नवऱ्याच्या वर्चस्वाखाली राहणे, महिलांना बाहेर काम करू न देणे, बालविवाह करून देणे...

आपल्याकडेही असे आहेच की, फक्त फरक इतकाच की, तालिबानने स्त्रियांनी कसे वागावे यासाठी सक्तीचे कायदे बनविले आणि आपल्याकडे तसे सक्तीचे कायदे नाही आहेत. स्त्रियांना बंड करण्याचे स्वातंत्र आहे. पण, मुळात पुन्हा प्रश्न निर्माण होतो, बंड करण्याचे स्वातंत्र असले तरी, अशा किती स्त्रिया आहेत? ज्यानी या विरोधात बंड केले आहे. बंड केले तर, खैरलांजी सारखे प्रकरण घडते. भारतात आजही स्त्रिया तालिबान सारख्या, फक्त कधीही कुणाला न दिसणार्‍या गुलामगिरीत जगतात.

तालिबानने शरिया कायद्याचे पालन केले नाहीतर, त्यासाठी भयंकर अशा शिक्षा ठेवल्या. धर्माच्या नियमानुसार वागले नाहीतर, अमली पदार्थाची तस्करी किंवा सेवन केले तर, चोरी, अपहरण केले, यासारख्या गोष्टीत गुन्हेगार म्हणून सापडले तर, अवयवांचे छाटने, भर वस्तीत चाबकाचे फटके देणे, दगडाने ठेचून मारणे, जाहीर मृत्युदंड देणे. अशा प्रकारच्या शिक्षा देणे हे तालिबानी अगदी सर्रासपणे देतात.

या शिक्षांमधील, दगडाने ठेचून मारण्याच्या शिक्षेवर UN ने आक्षेप नोंदविला होता. परंतु, तालिबानने या शिक्षा, पूर्ण पुरावे तपासून, आणि गरज असेल तरच आम्ही ती देतो. असे, मत तालिबानने मांडले. शरिया कायदा पाळणार्‍या देशात, त्याचे स्वतंत्र न्यायालय सुद्धा अस्तित्वात आहे.

अफगाणिस्तान मधील स्त्रियांची ही परिस्तिथी, आणि भारतातील स्त्रियांमध्ये जमीन - अस्मानाचा फरक असला तरी, खेडेगावात आजही स्त्री तालिबानी गुलामगिरीचा रोज सामना करते. स्त्री ही जगाची निर्माणकर्ती असली तरी, स्वतंत्रपणे किती ती निर्माण होते, हे तिच्या स्वतःच्या मनाएवढे कुणालाही ठावूक नसते. तालिबान्यांची विचारसरणी धर्मांध असली तरी, आपल्या भारतावर धर्माचा काय कमी पगडा नव्हता.

आता जरी आपण लोकशाही मध्ये जगत असलो तरी, अनेक धर्मांच्या धार्मिक संघटना आजही अस्तित्वात आहेत. धार्मिक संघटना अस्तित्वात असणे, हे कशाचे लक्षण आहे ? तालिबानी प्रवृत्तीचेच ना? धार्मिक संघटना अस्तित्वात असणे, हे सुद्धा धर्मांध असण्याचेच लक्षण आहे. समाजातील शोषित, वंचित घटक आजही तालिबान विचारसरणीचा गुलाम हे नाकारून चालणार नाही.

धार्मिक भावना घेऊन लोकांच्या मनाशी खेळून, राजकारण करायचे. कट्टर असणारे हिंदुत्ववादी, कट्टर असणारे मुस्लिम, दोन्ही तीव्र धार्मिकता बाळगणारे कुठल्याही तालिबान्यापेक्षा कमी नाही. मानवतेचा धर्म सोडून, आपला धर्म कसा सर्वश्रेष्ठ आहे, हे सांगत फिरणारे सुद्धा माझ्या मते धर्मांधच आहे.

तालिबानी उघड बंदूक घेवून फिरतात, पण आपल्याकडे हातात बंदूक नसली तरी, मनात धार्मिकतेची बंदूक घेऊन फिरणारे तालिबानी आहेतच. तालिबानी काय आणि आपण काय, विचारांची प्रवृत्ती एकच झाली ना.

गांधीजींना मारणारे, इंदिरा गांधीना मारणारे, राजीव गांधीना मारणारे, मृत्यूनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे विटंबना करणारे, नरेंद्र दाभोळकरांना मारणारे गोविंद पानसरेना मारणारे, डॉ. कलबुर्गीना मारणारे, गौरी लंकेशला मारणारे, रोहित वेमूलाचा बळी घेणारे हे सगळे तालिबानींच्याच प्रवृत्तीचे आहेत...

धर्माची संस्कृती मग ती तालिबानमध्ये असो का भारतामधील असो, की महाराष्ट्रातील सारखीच असते. धर्माच्या नावावर चालणारे काळे धंदे बाबा, बुवा, यांच्या माध्यमातून करण्यात येणारे सोहळे, नाटके हे सगळीकडेच समान असतात. खरंतर, यांना ठोकून काढले पाहिजे, की जे धर्माच्या नावावर वेगवेगळया पद्धतीने लुबाडण्याचे काम करतात, लुटण्याचे काम करतात, अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करतात, आणि त्या अंधश्रद्धेच्या माध्यमातुन वेगवेगळ्या घटकांना त्रास देण्याचे काम करतात. असे सगळे उपद्व्यापी धंदे बंद झाले पाहिजेत.

तालिबानी संस्कृती, तिथल्या स्त्रियांवरील अत्याचार या अनुषंगाने आपण चर्चा करतोय, बोलतोय पण आपल्या भारतामध्ये काय मुस्लिम स्त्रियांवर अत्याचार होत नाही आहेत का? म्हणजे, हिंदू आणि मुस्लिम स्त्रियांची जेंव्हा आपण तुलना करतो तेंव्हा हिंदू स्त्रियांवर अन्याय जास्त आहे की मुस्लिम स्त्रियांवर अन्याय जास्त आहे हे दोन्ही वेगवेगळ्या, स्वतंत्र पद्धतीने चर्चा करण्याचे विषय होऊ शकतात. पण, इथेही मुस्लिम स्त्रियांना समजून घेतले जाते का? हा प्रश्न सुद्धा अनुत्तरीत आहे.

त्या बुरख्याआड किती दुःख लपलेले आहे, दोन डोळे फक्त दिसतात आणि त्या दोन डोळ्यामध्ये आपण ते दुःख वाचायचे कारण चेहर्‍यावरचे दुःख वाचण्याची आपल्याकडे पद्धत आहे. मानसशास्त्र दृष्टिकोनातून माणसाचा चेहरा बघितला तर, लक्षात येते की माणसाचे दुःख काय आहे, पण इथे तर मुस्लिम स्त्रियांचा चेहराही पाहता येत नाही, तर तिचे दुःख कसे जाणून घ्यायचे?

प्रसिद्ध कवी, कादंबरीकार, प्राध्यापक मनोज बोरगावकर यांची एक कविता आहे, त्या कवितेमधील काही ओळी आहेत, ज्या स्त्रियांच्या विषयावर, त्या ओळी विषयाला थेट हात घालतात.

माणसाच्या देहाच्या आकारावरून

लाकडाच्या क्विंटलाचे हिशोब सांगायचो मी परफेक्ट...

मजबूत हाडापेराचे माणूस

साडे चार क्विन्टल लाकडात आटोपत...

लहान चणीच्या माणसाला

राख रांगोळी व्हायला अडीच

क्विन्टल लाकड पूरतात तर...

बाई माणसाला जळायला फारशी

लाकड लागतं नाहीत..

आयुष्यभर जळत राहील्यामूळे

शेवटीं जळण्यासाठी तीच्या कडे

देहा शिवाय फारसे काही

शिल्लक उरत नाही...

लोकशाहीची थट्टा करणारे, संविधान जाळणारे, इतर धर्मांचा द्वेष करणारे, स्त्रियांना मारणारे, अत्याचार, बलात्कार करणारे, हे सगळे तालिबान विचारसरणी बाळगणारेच तर लोक आहेत...

गोदी मीडिया कितीही तालिबान विरोधात न्यूज दाखवत असला तरीही, भारतात लपून बसलेले तालिबानी सुद्धा शोधावे लागतील. उघड असणार्‍या तालिबान्यांपेक्षा लपून तालिबानी विचार बाळगणाऱ्यांपासून जास्त धोका या भारताला आहे.

हिंदू राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पाहणारे, आणि इथल्या स्त्रियांना तुच्छतेची वागणूक देणारे एक प्रकारचे तालिबानीच...

-संदीप काळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com