मुंबईत ९५० किलोंचा राष्ट्रध्वज उभारण्यामागे संकल्पना काय होती? वाचा सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत ९५० किलोंचा राष्ट्रध्वज उभारण्यामागे संकल्पना काय होती?
मुंबईत ९५० किलोंचा राष्ट्रध्वज उभारण्यामागे संकल्पना काय होती?

मुंबईत ९५० किलोंचा राष्ट्रध्वज उभारण्यामागे संकल्पना काय होती?

भारतीय नौदलाने मुंबईत ‘गेट वे ऑफ इंडिया’जवळ नौदल गोदीच्या टोकावर उभारलेला भव्य राष्ट्रध्वज मुंबईकर तसेच पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. किनाऱ्यावर धडकणाऱ्या लाटा, वाऱ्यांना तोंड देत भव्य झेंडा उभारणे हे मोठे आव्हान होते. त्यावर मात करत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी जगात प्रथमच केबल नेट स्ट्रक्चरचा वापर करण्यात आला. या स्ट्रक्चरचे डिझाईन बनवणाऱ्या पुण्यातील अतुल राजवाडे यांच्याशी अनिल जमधडे यांनी साधलेला संवाद..

भव्य राष्ट्रध्वज उभारण्यामागे नेमकी संकल्पना काय होती?

केंद्र सरकारच्या खादी ग्रामोद्योग विभागाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तब्बल ९५० किलो वजनाचा आणि २२५ फूट रुंद व १५० फूट उंचीचा हा ध्वज तयार केला. त्याचा भव्य आकार आणि सौंदर्य खुलून दिसण्यासाठी तो पारंपरिक पद्धतीने न उभारता मॉन्युमेंटल फ्लॅग म्हणजेच स्मारक पद्धतीने उभारण्याच्या सूचना करण्यात आली होती. नौदल दिनानिमित्त मुंबईच्या ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे राष्ट्रध्वज उभारण्यात आला.

हेही वाचा: भीमा-कोरेगाव हिंसाचार; सुधा भारद्वाजांची जामिनावर मुक्तता

राष्ट्रध्वज उभारताना कोणती आव्हाने होती?

आम्हाला एका महिन्यामध्ये हा भव्य राष्‍ट्रध्वज उभारायचा होतो. तो कोठे उभारायचा, हे सर्वात मोठे आव्हान होते. कारण यापूर्वी लष्कराने लेह लडाखमध्ये आणि हवाई दलाने दिल्लीत अशा प्रकारचा झेंडा उभारला, तेव्हा त्यांना राष्ट्रध्वज ठेवण्यासाठी पृष्ठभाग उपलब्ध होता; मात्र मुंबईत एकीकडे समुद्र आणि दुसरीकडे नौदलाच्या गोदीची केवळ आठ मीटर रुंद रस्त्याची जागा उपलब्ध होती. त्यामुळे राष्ट्रध्वज ठेवण्यासाठी एखादे स्ट्रक्चर तयार करणे गरजेचे होते. त्यातही लाटा, वारे हे आव्हान होतेच. ते पेलण्यासाठी आम्ही केबल नेट स्ट्रक्चर तयार करण्याचे ठरवले.

केबल नेट स्ट्रक्चर तंत्रज्ञान काय आहे?

केबल नेट स्ट्रक्चर म्हणजेच स्टील वायर, नायलॉन दोरी आणि मच्छीमारांच्या जाळ्या वापरून नौदल गोदीच्या काठावर आम्ही एक पृष्ठभाग तयार केला. त्यावर हा ९५० किलो वजनाचा राष्ट्रध्वज ठेवला आहे. खरंतर हे तंत्रज्ञान जुने आहे; मात्र राष्ट्रध्वज उभारण्यासाठी जगात प्रथमच हे तंत्रज्ञान वापरले गेले.

हेही वाचा: वानखेडे प्रकरणातील मोहित कंबोज राज ठाकरेंसोबत,भेटीचे फोटो व्हायरल

नौदलासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?

एवढा मोठा राष्ट्रध्वज समुद्रकिनारी उभारल्यानंतर तो वाऱ्यामुळे पतंगासारखा उडून जाण्याची भीती असते; झेंडा ठेवण्यासाठी आम्ही उभारलेले केबल नेट स्ट्रक्चर केवळ २५ टन वजनाचे आहे; मात्र राष्ट्रध्वज उडून जाऊ नये, म्हणून राष्ट्रध्वजाच्या खालीच त्याला धरून ठेवणारे १९५ टन वजन वापरले. नौदलाने आम्हाला ते उपलब्ध करून दिले. जवळपास ५० पूर्ण लसीकरण झालेले कामगार व नौदल कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे काम पूर्ण झाले.

गुरुवारी राष्‍ट्रध्वज काढण्यात येणार

नौदल दिनानिमित्त ४ डिसेंबरपासून नौदल गोदीच्या टोकाला उभारलेला राष्ट्रध्वज पाहण्यासाठी मुंबईकरांसह अनेक पर्यटक गर्दी करत आहेत. बुधवारी (ता. ८) राष्ट्रपती रामनाथ कोविंद या राष्ट्रध्वजाला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर गुरुवारी (ता. ९) हा राष्ट्रध्वज काढून लष्कराकडे सुपूर्द केला जाईल.

Web Title: What Concept Behind Hoisting 950 Kg National Flag In Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai NewsNational Flag