काय सांगता! मुंबईत 41 हजार कोटी लिटर पाणी गेले वाया; पाणी अडवण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष

समीर सुर्वे
Wednesday, 16 September 2020

वारंवार पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत आतापर्यंत 3 हजार मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई : वारंवार पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत आतापर्यंत 3 हजार मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. यातील निम्मा पाऊस अडवला असता तरी त्यातून वर्षभराच्या गरजेच्या साधारण 28 टक्के पाणीसाठा झाला असता. मात्र, रेन वॉटर हार्व्हेस्टिंग बंधनकारक होऊनही 10 वर्षात याकडे गांभिर्याने न पाहिल्याने. साधारण 41 हजार 505 कोटी लिटरहून अधिक पाणी वाहून गेले आहे. 

BMCतील समित्यांच्या निडणुकीत भाजपची भूमिका निर्णायक! विरोधकांची बार्गेनिंग पावर वाढणार

मुंबईत वर्षाला सरासरी 2 हजार मिलिमीटर पाऊस पडला   तरी शहराच्या क्षेत्रफळाचा विचार केला तरी 8 लाख 74 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होतो. हे सूत्र महापालिकेनेच मांडले आहे. तर, शहराच्या एकूण क्षेत्रफळापैकी 257.61 चौरस मीटरवर बांधकाम झाले आहे. यंदा सरासरी 3 हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाचा प्रत्येक थेंब अडवला असता तर 8 लाख 30 हजार 110 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला असता. मात्र, प्रत्येक थेंब अडवणे शक्‍य नसल्याने निम्मा पाऊस अडवणे शक्‍य झाले असते तरी 4 लाख 15 हजार 55 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा असता. तर, अप्पर वैतरणा तलावात 2 लाख 27 हजार दशलक्ष लिटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. म्हणजे जवळ जवळ अप्पर वैतरणाच्या दुप्पट पाठीसाठा मुंबईत जमा झाला असता. 

महापालिकेने 2007 मध्ये पहिल्यांदाच नव्या इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक केले. त्यात नंतर वेळोवेळी सुधार करण्यात आली आहे. मात्र, किती इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सुरु आहे याची माहिती आजही पालिकेकडे उपलब्ध नाही. 

मराठा आरक्षणाचे नेतृत्व खासदार संभाजीराजे भोसले यांनी करावे; शिवसेनेची लेखी मागणी

...तर पुरावरही नियंत्रण 
ब्रिटीशांनी मुंबईच्या नाल्याचा आराखडा तयार करताना पावसाचे निम्मे पाणी जमिनीत मुरुन निम्मे पाणी नाल्यातून वाहून जाईल, अशी रचना केली आहे. मात्र, आता जास्तीत जास्त पाणी नाल्यातून वाहून जात असल्याने दरवर्षीच पाणी तुंबण्याचे प्रकार घडत असतात. मात्र, जर इमारतींमध्येच हे पाणी अडवल्यास नाल्यांमध्ये येणारे पाणी कमी होऊन पूर नियंत्रणात मदत होऊ शकेल. 

धरणांचा खर्चही वाचला असता 
महापालिकेने काही वर्षांपुर्वीच मध्य वैतरणा धरण उभारले. या धरणाच्या उभारणीसाठी १ हजार ३०० कोटी रुपयांपर्यंतचा खर्च केला होता. या धरणाची साठवण क्षमता १ लाख ९३हजार ५३० दशलक्ष लिटर आहे.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What do you say 41000 crore liters of water wasted