उषा मंगेशकर यांचा 'सकाळ'ला फोन, म्हणाल्यात..

उषा मंगेशकर यांचा 'सकाळ'ला फोन, म्हणाल्यात..

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना काही अफवा पसरल्या होत्या; परंतु दीदींच्या चाहत्यांनी त्यावर विश्‍वास ठेवला नाही. मंगेशकर कुटुंबीयांना फोन करून त्रासही दिला नाही. दीदींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, याकरिता अनेकांनी प्रार्थना, होमहवन आणि पूजापाठ केला. त्या सगळ्या चाहत्यांचे आणि विशेष करून दीदींवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांचे मंगेशकर कुटुंबीयांतर्फे उषा मंगेशकर यांनी आभार मानले आहे. 

लतादीदींना न्यूमोनिया झाला होता. त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या वेळी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणारे अनेक फोन वृत्तपत्र व दूरचित्र वाहिन्यांच्या कार्यालयात खणखणत होते. समाजमाध्यमांवरही अनेक संदेश प्रसारित झाले होते. दीदी लवकरच बऱ्या व्हाव्यात, याकरिता अनेकांनी प्रार्थना केली.

तब्बल 28 दिवसांच्या उपचारानंतर दीदी आपल्या घरी परतल्या आहेत. उषा मंगेशकर यांनी शनिवारी (ता. 14) 'सकाळ'ला खास फोन करून दीदींच्या प्रकृतीची माहिती दिली आणि चाहत्यांचे आभार मानले.

विश्‍वातील मोठी व्यक्ती 

लतादीदींवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी अथक परिश्रम घेतले. कोणत्याही डॉक्‍टराने एक पैसाही घेतला नाही. दीदींनी खूप मोठे काम केले आहे. ही विश्‍वातील मोठी व्यक्ती आहे. अशा थोर व्यक्तीकडून आम्ही एकही पैसा घेणार नाही, असे डॉक्‍टरांनी सांगितल्याची माहिती उषा मंगेशकर यांनी दिली. 
 

उषा मंगेशकर म्हणाल्या, की दीदींवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांचे पथक खूप चांगले होते. त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. काही जण सेलिब्रिटींचे तर काही राजकीय व्यक्तींचे फॅन असतात; परंतु आता मी त्या डॉक्‍टरांची फॅन झाली आहे. डॉक्‍टर देवासारखे आहेत. दीदींवर उपचार करणारे डॉ. प्रतीक समधानी, डॉ. अश्‍विनी मेहता, डॉ. झरीर उदवाडिया, डॉ. निशित शाह, डॉ. जनार्दन निंबोळकर, डॉ. राजीव शर्मा यांचे आणि तेथील कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानते. 

दीदींना न्यूमोनिया झाला होता. आता त्यांची प्रकृती ठिकठाक आहे. दीदी टीव्हीवरील बातम्या आणि चित्रपट पाहत आहेत. आमच्याशी गप्पाही मारतात. तरीही आम्ही त्यांची काळजी घेत आहोत. आठ-दहा दिवसांत नेहमीप्रमाणे त्यांची दिनचर्या सुरू होईल, अशी माहितीही उषा मंगेशकर यांनी दिली. 

Webtitle : what usha mangeshkar said after sister lata mangeshkars treatment in the hospital

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com