पूरस्थितीत दिल्लीश्‍वर कुठे होते : सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

महाराष्ट्रामध्ये विरोधक उरले नाहीत, अशी टीका भाजपवाले करतात. मग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याबाहेरून भाजप नेते का येतात? जेव्हा कोल्हापूर, सांगलीमध्ये महापूर आला तेव्हा हे दिल्लीश्‍वर नेते कुठे होते, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश तरे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता. १५) सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खासदार सुळे यांनी भाजप सरकारचा समाचार घेतला. 

कल्याण : महाराष्ट्रामध्ये विरोधक उरले नाहीत, अशी टीका भाजपवाले करतात. मग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याबाहेरून भाजप नेते का येतात? जेव्हा कोल्हापूर, सांगलीमध्ये महापूर आला तेव्हा हे दिल्लीश्‍वर नेते कुठे होते, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश तरे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता. १५) सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खासदार सुळे यांनी भाजप सरकारचा समाचार घेतला. 

खड्डे आणि खराब रस्ते यावरून लोकप्रतिनिधी आणि पालिकेवर टीका करत सुळे पुढे म्हणाल्या, की महिलांच्या डोक्‍यावरील हंडा उतरला पाहिजे, ही माफक अपेक्षा आहे. डोंबिवली आणि कल्याणला गेलो तर खड्ड्यांनी नकोसे वाटते. आघाडी सरकारने कल्याण-डोंबिवलीच्या विकास कामांसाठी १८०० कोटी रुपये दिले होते. मात्र, तेव्हा आम्ही जाहिराती केल्या नाही. भाजप सरकार आल्यावर पाच वर्षांत विकासकामे झाली का? असा सवाल सुळे यांनी या वेळी केला.

१० रुपयात थाळी देऊ असे मी सांगणार नाही. पण आम्ही बचत गटाच्या माध्यमातून ‘ताईज किचन’ ही योजना पाच वर्षांपूर्वी सुरू केली असून तिथे २० रुपयांत पोटभर जेवण मिळत असल्याचे सांगत सुळे यांनी नाव न घेता शिवसेनेवर टीका केली. या वेळी आमदार जगन्नाथ शिंदे, रमेश हनुमंते, उमेदवार प्रकाश तरे उपस्थित होते. 

...हा गाजरांचा पाऊस
भाजपचा संकल्पनामा म्हणजे गाजराचा पाऊस आहे. तेल लावून पैलवान निवडणूक रिंगणात उतरले असताना यांना ‘ट्युशन, टीचरची काय गरज’, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. सावरकर आणि महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देणाची मागणी मी केली होती. आता निवडणुकीमध्ये कसा काय विषय आठवला? असा सवालही सुळे यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Where was Polition from Delhi during flood in Maharashtra : Supriya Sule