
नौटंकी थांबवा आणि मुंबईत जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करा
कोणाला मूर्ख बनवतोय? मुंबईत कमी रुग्ण संख्येवरुन नितेश राणेंचं सूचक टि्वट
मुंबई: मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत काल मोठी घट दिसून आली. दोन महिन्यांनंतर नवीन रुग्णांचा आकडा 3876 पर्यंत खाली आला. कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर हे लॉकडाउनचे यश असल्याची चर्चा सुरु झालीय. याच मुद्यावरुन कोकणातील देवगडचे आमदार आणि नारायण राणे यांचे सुपूत्र नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर बोचरी टीका केली आहे.
"महापालिका आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमा संवर्धनासाठी हे लॉकडाउनचं यश असल्याचं सांगितलं जात आहे. प्रत्यक्षात टेस्टिंग कमी करुन २८ हजार करण्यात आली आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे कोविडमधून आपण सावरतोय, या आंनदात आहोत. आपण कोणाला मूर्ख बनवतोय? हा सर्व प्रतिमा संवर्धानाचा प्रकार आहे. मानवी आयुष्याची त्यांना काही पडलेली नाही" अशी टीका नितेश राणे यांनी केलीय.
"प्रत्येक दिवशी ५० हजार कोरोना चाचण्या व्हायच्या. आता मुंबईत फक्त २८ हजार चाचण्या होत आहेत. मुंबईतून गुडन्यूज आली म्हणून, जे कोणी साजरे करतायत, त्यांनी ही नौटंकी थांबवावी आणि जास्तीत जास्त कोरोना चाचण्या कराव्यात. ही हेडलाईन मॅनेजमेंट नसून लोकांचे जीव वाचवावेत. जे मूर्ख बनवतायत, त्यांच्यावर कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करा, गोलमाल गँग" अशा शब्दात नितेश राणे यांनी टीका केलीय.
मुंबईत कोरोनाची काल काय स्थिती होती?
काल नव्या रुग्णांपेक्षा तिप्पट रुग्ण कोरोनातून बरे झाले. आज दोन महिन्यांनंतर नवीन रुग्णांचा आकडा 3876 पर्यंत खाली आला. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 6,31,527 इतका झाला आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 70,373 हजारांवर आला आहे. रुग्णवाढीचा दर 1.17 वरून कमी होत 1.09 टक्के इतका झाला आहे.
मुंबईत रुग्णवाढ नियंत्रणात असली तरी मृतांचा आकडा अद्याप कमी झालेला नाही. सोमवारी देखील दिवसभरात 70 रुग्णांचा मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 12 हजार 853 वर पोहोचला आहे. आज मृत झालेल्यापैकी 42 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 41 पुरुष तर 29 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 3 रुग्णांचे वय 40 वयोगटाच्या खालील होते. 24 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 43 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते.