
चालू शैक्षणिक वर्षातील अकरावी प्रवेश प्रक्रिया अद्यापही पूर्ण का झाली नाही, याबाबत खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला दिले.
मुंबई : चालू शैक्षणिक वर्षातील अकरावी प्रवेश प्रक्रिया अद्यापही पूर्ण का झाली नाही, याबाबत खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला दिले.
हेही वाचा - "कसाबची साक्ष दिली तेव्हाच हे ठरवलं होतं", कसाबला ओळखणाऱ्या देविकाला व्हायचंय पोलिस
अर्धे शैक्षणिक वर्ष संपत आले असून अकरावीची प्रवेश प्रक्रिया अजून पूर्ण झाली नाही. आणखी काही महिन्यांत हे वर्षही संपेल, अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. उद्यापर्यंत याबाबत लेखी खुलासा दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. वकील विशाल सक्सेना यांनी केलेल्या याचिकेवर मंगळवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सक्सेना यांच्या मुलीने अकरावीला प्रवेश घ्यायचा आहे; मात्र अद्यापही प्रक्रिया सुरू झालेले नाही. मराठा आरक्षण मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया थांबल्याने अनिश्चित विलंब होत आहे, असे याचिकादाराचे म्हणणे आहे. यामुळे मुंबई क्षेत्रातील सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी टांगले आहे.
हेही वाचा - ग्रामीण यात्रांच्या 25 कोटींच्या उलाढालीला ब्रेक; रायगड जिल्ह्यात कोरोनाचा परिणाम
राज्य सरकार यावर निर्णय घेणार आहे, असे सरकारी वकील गीता शास्त्री यांनी खंडपीठाला सांगितले. प्रवेश प्रक्रिया अपूर्ण असली, तरी ऑनलाईन वर्ग सुरू आहेत, असा दावा त्यांनी केला; मात्र याचिकादारांनी या दाव्याचे खंडन केले. राज्य सरकारने तातडीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून अभ्यासक्रम सुरळीत करावा, अशी मागणी याचिकेत केली आहे.
Why is the 11th admission process not completed yet Court questions state government
--------------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )