चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

चारित्र्याच्या संशयावरून वारंवार होणाऱ्या कौटुंबिक वादातून एका पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्‍यात दगडी पाटा मारून तिची हत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.६) पहाटे खांदा कॉलनी सेक्‍टर-९ मधील सौरभ सोसायटीत घडली. 

नवी मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून वारंवार होणाऱ्या कौटुंबिक वादातून एका पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्‍यात दगडी पाटा मारून तिची हत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.६) पहाटे खांदा कॉलनी सेक्‍टर-९ मधील सौरभ सोसायटीत घडली. 

नानासाहेब लांडगे (३५) असे या पतीचे नाव असून, खांदेश्वर पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी पती लांडगे हा पत्नी कल्पना (३०) व दोन मुलींसह खांदा कॉलनी सेक्‍टर-९ मधील सौरभ सोसायटीत राहण्यास होता. महिनाभरापूर्वीच नानासाहेब या ठिकाणी राहण्यास आला होता. नानासाहेब याला पत्नी कल्पना हिच्या चारित्र्यावर संशय होता. याच कारणावरून त्यांच्यामध्ये नेहमी भांडण होत होते. गुरुवारी (ता.४) रात्रीदेखील या पती-पत्नींमध्ये याच कारणावरून भांडण झाले होते. त्यानंतर रात्री उशिरा घरातील सगळे झोपी गेले असताना, पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास नानासाहेब याने गाढ झोपेत असलेल्या आपल्या पत्नीच्या डोक्‍यात दोन वेळा दगडी पाटा टाकून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने जवळच राहणाऱ्या आपल्या वडिलांना याबाबतची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच खांदेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कल्पनाचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी नानासाहेब याला पत्नीच्या हत्येप्रकरणी अटक केली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife murdered by husband on suspicion of affair