
दक्षिण रायगडमध्ये गिधाडांना जगवण्यासाठी वणवण
महाड : गिधाड संवर्धनाच्या उपक्रमामुळे रायगड जिल्ह्यामध्ये गिधाडांची संख्या वाढली आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी आता या पक्ष्यांना पुरेसे खाद्य पुरवण्याचे आव्हान उपक्रमातील सदस्यांसमोर उभे ठाकलेले दिसते. सध्या हे सदस्य खाद्यासाठी अक्षरश: वणवण करतात.
गिधाडे मृत जनावरे खात असल्याने त्यांना निसर्गाचा स्वच्छतादूत असे म्हटले जाते. गेल्या काही वर्षांपूर्वी या पक्ष्यांची संख्या झपाट्याने घटली होती. यामुळे आजार वाढीस लागले. महाड येथील सिस्केप या संस्थेने २० वर्षांपासून गिधाडांचे संवर्धन करण्याची मोहीम हाती घेत त्यावर आवर घालण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे अत्यंत खडतर परिस्थितीत पदरमोड करत या संस्थेने रायगड जिल्ह्यात केवळ १८ ते २० असलेली गिधाडांची संख्या आता ३५० पेक्षा अधिक झाली आहे. यामुळे महाडमधील नानेमाची, शेवते; माणगावमधील मांजराणे, वडघर; म्हासळतील चांदोरे, पांगळोली आणि चिरेगव, पाली या परिसरामध्ये गिधाडांची संख्या वाढू लागली. वाढीस लागलेली गिधाडे व त्यांच्या पिल्लांना मोठ्या प्रमाणात खाद्य लागते. त्याची कमतरता आता या गिधाडांना जाणवू लागली आहे.
म्हणून खाद्यासाठी कसरत
मृत जनावरे हे गिधाडांचे मुख्य खाद्य. गावातील जनावरांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे गिधाडांचे मुख्य खाद्य असणारी मृत जनावरेदेखील कमी प्रमाणात मिळतात. त्यामुळे गिधाडांना खाद्यासाठी झटावे लागत आहे. गिधाडांचे प्रमुख खाद्य म्हणजे गाय, बैल, म्हैस, रेडा, शेळी, गाढव, उंट, हत्ती व जंगलातील इतर मृत प्राणी. गिधाडे कधीही कुत्रा-मांजर अथवा उंदीर खात नाहीत. त्यामुळे त्यांना खाद्य पुरवण्याची मोठी कसरत संस्था अनेक वर्षे करत आहे.
१६८ गावांमध्ये ढोरटाक्या
सिस्केप संस्थेकडून सध्या जिल्ह्यातील सात विविध ठिकाणी गिधाडांसाठी खाद्य मैदाने तयार करण्यात आली आहे. ही जागा म्हणजे पारंपरिक ढोरटाक्या आहेत. पूर्वी मृत जनावरे या ढोर टाकीत टाकण्यात येत होती. तेथून गिधाडे ती फस्त करत असतात. संस्थेकडून रायगड जिल्ह्यातील १६८ गावांमध्ये अशा प्रकारच्या ढोरटाक्या तयार करण्याचे प्रयोग करण्यात आले; परंतु गिधाडे पारंपरिक सहा-सात टाकी जवळच खाद्य खाण्यासाठी येत असल्याचे दिसून आले. एका बाजूला गिधाडांची संख्या वाढत असतानाच त्यांना लागणारे खाद्य पुरवणे यासाठी संस्थेचे कार्यकर्ते अक्षरशः मेहनत करताना दिसतात.
एका गिधाडाला किमान दोन किलो मांसाची गरज असते; परंतु इतर खाद्य मिळेपर्यंत गिधाडे चार-पाच दिवस चांगल्या प्रकारे तग धरू शकतात. आता खाद्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर खाद्य देण्यासाठी संपर्क साधावा.
- प्रेमसागर मिस्त्री,
अध्यक्ष, सिस्केप संस्था