भिवंडी-कल्याण मेट्रोच्या मार्गात बदल होण्याची शक्‍यता? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020


ठाणे-भिवंडी-कल्याण व कल्याण-तळोजा मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण 

कल्याण : ठाणे-कल्याण व कल्याण-तळोजा मेट्रो 5 मार्गांचे आरेखन बदलण्यासंदर्भात नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते, या धर्तीवर एम. एम. आर. डी. ए. च्या अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी यांनी मंगळवारी (ता. 28) मेट्रो 5 च्या आराखड्यातील मार्गाची पाहणी केली असून भिवंडी ते कल्याण मेट्रो मार्गात बदल होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 

हेही वाचा - गुजरातमधून येणारा 'हा' पदार्थ तुम्हाला आजारी पडू शकतो.

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग क्र. 5 मधील भिवंडी ते कल्याण टप्प्यामधील तसेच कल्याण-तळोजा मार्ग क्र. 12 चे आरेखन बदलण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवक रवी पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांच्यासह अनेकांनी केली होती. भिवंडी ते कल्याण टप्प्यात सध्याच्या आरेखनामुळे विस्थापितांचीही संख्या मोठी आहे. कल्याणमधून जाणारा मेट्रो मार्गही दुर्गाडीहून बिर्ला कॉलेजमार्गे नेण्याची मागणी होत आहे.

महत्त्वाची बातमी - सावधान! फटका गँग पुन्हा सक्रिय

कल्याण-तळोजा मार्गात गर्दीच्या परिसराचा समावेश नसल्याच्या तक्रारीदेखील प्राप्त झाल्या होत्या. त्यांची दखल घेऊन ठाणे-कल्याण व कल्याण-तळोजा मेट्रो मार्गांचे आरेखन बदलण्यासंदर्भात नव्याने सर्वेक्षण करावे, असे आदेश 25 जानेवारी रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. 

यानुसार एम. एम. आर. डी. ए. च्या अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी यांनी मंगळवारी (ता. 28) पाहणी दौरा केला. या वेळी पालिका आयुक्त गोविंद बोडके आणि अन्य अधिकारीदेखील उपस्थित होते. त्यांनी लोकसंख्या, रस्ते, बाधित होणारी जागा, बाधित होणारे नागरिक, तांत्रिक अडचणी लक्षात आणून दिल्या. कल्याणमधील नवीन मार्ग दुर्गाडी ते बिर्ला कॉलेजमार्गे पौर्णिमा चौक व्हाया मुरबाड रोड येथून स्टेशनला न जाता महात्मा फुले चौक ते शिवाजी चौकवरून कृषी उपन्न बाजार समिती मार्केटकडे दाखवण्यात आल्याचे समजते. यात स्मार्ट सिटीमार्फत स्टेशन परिसर कसा विकसित होणार आणि मेट्रोच्या मार्गात अडचणी नको तसेच नागरिकांनादेखील हा मार्ग सोयीस्कर कसा होईल, याबाबत चर्चा झाली. या सर्व कारणांमुळे मेट्रो 5 च्या मार्गात बदल होण्याची शक्‍यता आहे. 

ठाणे-भिवंडी-कल्याण व कल्याण-तळोजा या मेट्रो मार्गाचे संपूर्ण तपासणी नुकतीच करण्यात आली आहे. दरम्यान यासंबंधीचा अहवाल आम्ही तयार करून लवकरच वरिष्ठांसमोर सादर करणार आहोत. 
- सोनिया सेठी, अतिरिक्त महानगर आयुक्त, एम. एम. आर. डी. ए. 

web title : will Bhiwandi-Kalyan Metro way will transformed


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: will Bhiwandi-Kalyan Metro way will transformed