चित्रपटगृहांच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारचे प्राधान्य; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आश्‍वासन

संतोष भिंगार्डे
Saturday, 7 November 2020

दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटाबरोबर आज मराठी चित्रपट स्पर्धा करीत असतो. मराठी चित्रपटनिर्मिती, दिग्दर्शित करणारे खूप प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून अनेक संकटांना सामोरे जाऊन वेगळी कलाकृती तयार करण्याचे धाडस दाखवतात याचा आनंद वाटतो.

मुंबई : काही वर्षांपूर्वी मराठीत नवीन काही येत नाही असे म्हटले जात होते; पण आज मराठी चित्रपट पाहायलाच पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे मराठी चित्रपटांचे यश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठी चित्रपटांचे आणि महाराष्ट्रातील चित्रपटगृहांना पुनरुज्जीवित करण्याला सरकार प्राधान्य देईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथे स्पष्ट केले. 

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, हार्बर मार्गावर विशेष ट्रेन सुरू राहणार

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे 5 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत "पॅनोरमा इन्विशनिंग फिल्म मीडिया अँड एन्टरटेन्मेंट पॉलिसी फॉर महाराष्ट्र' या विषयावर तीन दिवसीय ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन केले होते. चर्चासत्राच्या समारोप सत्रात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा वर्मा, सहसंचालिका आंचल गोयल, अशोक राणे, नानूभाई जयसिंघानी, वर्षा उसगावकर, अमित भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते. 
मराठी चित्रपट, कला, नाट्य आणि साहित्य क्षेत्र प्रचंड समृद्ध आहे. दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटाबरोबर आज मराठी चित्रपट स्पर्धा करीत असतो. मराठी चित्रपटनिर्मिती, दिग्दर्शित करणारे खूप प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून अनेक संकटांना सामोरे जाऊन वेगळी कलाकृती तयार करण्याचे धाडस दाखवतात याचा आनंद वाटतो. येत्या काळातही आपल्या सगळ्यांनी वेगवेगळ्या कलाकृती निर्माण कराव्यात. याकरिता महाविकास आघाडीचे सरकार आपल्या पाठीशी आहे, असेही महसूलमंत्री थोरात यांनी सांगितले. 

कोरोनामुळे कला क्षेत्रात अनेक अडचणी निर्माण झाल्या तरी सांस्कृतिक कार्य विभाग या क्षेत्राला उभारी देण्यासाठी वेळोवेळी पुढाकार घेत आहे आणि यापुढेही घेत राहील. कला क्षेत्रातील सर्वच दिग्गजांना सरकार जलद गतीने सर्वतोपरी मदत करेल. 
- अमित देशमुख, 
सांस्कृतिक कार्यमंत्री

(संपादन- बापू सावंत)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will give priority to films and cinemas; Assurance of Revenue Minister Balasaheb Thorat