esakal | RSS ची माफी मागेपर्यंत जावेद अख्तरांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही- भाजपा आमदार
sakal

बोलून बातमी शोधा

javed akhtar

RSS ची माफी मागेपर्यंत जावेद अख्तरांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही- भाजपा आमदार

sakal_logo
By
स्वाती वेमूल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS, विश्व हिंदू परिषद आण बजरंग दल हे तालिबानी मानसिकतेचे आहेत, असं वक्तव्य कवी आणि गीतकार जावेद अख्तर Javed Akhtar यांनी केल्यापासून नवा वाद निर्माण झाला आहे. त्यावरून भाजप नेते आक्रमक झाले आहेत. अख्तर यांनी हात जोडून आरएसएसची माफी मागावी अन्यथा त्यांचे चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम Ram Kadam यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

"जावेद अख्तर यांचं विधान केवळ लज्जास्पद नाही, तर संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांसाठी आणि त्यांच्या विचारसरणीचे पालन करणाऱ्या जगभरातील कोट्यवधी लोकांसाठी अपमानास्पद आहे. जर त्यांची विचारधारा तालिबानी असती, तर अख्तर अशा पद्धतीचं वक्तव्य करू शकले असते का? यातूनच हे स्पष्ट होतंय की त्यांनी केलेली विधानं किती पोकळ आहेत," असं राम कदम म्हणाले.

हेही वाचा: 'तुम्ही ठिकाण निवडा', नितेश राणेंचं जावेद अख्तर यांना ओपन चॅलेंज

राम कदम यांच्याविरोधात गुन्हा

जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागावी या मागणीसाठी आंदोलन करणारे राम कदम यांच्याविरोधात मुंबईतील पार्कसाइट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अख्तर यांनी माफी मागावी या मागणीसाठी राम कदम यांच्यासह भाजपाच्या सुमारे २० कार्यकर्त्यांनी घाटकोपर इथल्या आर सीटी मॉलच्या मागे आंदोलन केलं. कोरोना नियमांचं उल्लंघन करून आंदोलन सुरू असल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना रोखलं. कोरोना नियमांचं उल्लंघन करणं आणि सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली.

काय म्हणाले जावेद अख्तर?

भारतात तालिबानचे समर्थन करणाऱ्या मुस्लिमांची संख्या फार कमी असल्याचं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे. उजवी विचारसरणीसुद्धा दडपशाही करणारी असल्याचं त्यांचं मत आहे. तालिबान आणि ज्यांना तालिबानसारखं बनायचं आहे, त्यांच्यात भीतीदायक साम्य असल्याचं जावेद अख्तर यांनी सांगितलं.

loading image
go to top