महिन्याच्या अखेरीस कोरोनाबाधितांची संख्या वाढणार? 22 हजार खाटा तयार ठेवण्याच्या सूचना

bed
bed

मुंबई : कोव्हिड-19 विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 20 हजार रुग्णांना रुग्णालयांत दाखल करावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठवडाभरात 22 हजार खाटा तयार ठेवण्याची सूचना टास्क फोर्सने राज्य सरकारला केली असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर सरकारी आणि खासगी रुग्णालयांतही कोरोनाच्या रुग्णांसाठी खाटा तयार ठेवाव्या लागतील.

मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या रुग्णांसाठी 30 हजार खाटांची तयारी करण्यात आली आहे. परंतु, आठवडाभरात आणखी 20 हजार रुग्ण वाढण्याची शक्यता कृतिदलाने वर्तवली असून, 22 हजार खाटा तयार ठेवण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे. सरकारी रुग्णालयांतील क्षमता जवळजवळ संपत आल्याने खासगी रुग्णालयांचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी आपात्कालीन परिस्थिती नियंत्रण कायदा व साथरोग नियंत्रण अधिनियमांतर्गत निर्णय घेण्याच्या विचारात राज्य सरकार असल्याचे कळते. सरकारला पुढील दोन दिवसांत निर्णय घ्यावा लागणार आहे.

कोरोनाच्या रुग्णांसाठी आवश्यक 22 हजार खाटा कोणत्या रुग्णालयांत आणि कशा प्रकारे तयार करता येतील, यावर विचार सुरू आहे. मुंबईतील मोठ्या रुग्णालयांत या खाटांची व्यवस्था करण्याचा विचार असून, केवळ प्रसूती, डायलिसिस, कर्करोग, हृदयरोग आणि गंभीर अपघात हे विभाग सुरू ठेवण्याचा सरकारचा विचार आहे. इतर आजारांवरील उपचार तूर्तास थांबवण्याबात विचार होत असल्याचे सांगण्यात आले. कोरोना रुग्णांसाठी तयार केलेल्या खाटा पुढील सहा आठवडे कायम ठेवण्याचे टास्क फोर्सने सुचवले आहे.

राज्य सरकारने एप्रिलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची 9 सदस्यीय समिती नियुक्त केली. या समितीत सरकारी व खासगी डॉक्टरांचा समावेश आहे. कोरोनाच्या रुग्णांचा मृत्युदर कमी करणे व गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी सेवासुविधा पुरवण्याचे काम ही समिती करत आहे. डॉ. संजय ओक या समितीचे प्रमुख असून, केईएम रुग्णालयातील डॉ. प्रवीण बांगर सल्लागार आहेत. पी. डी. हिंदुजा रुग्णालयाचे डॉ. झरीर उदवाडिया, लीलावती रुग्णालयाच्या डॉ. संतोषी नागवेकर, वोक्हार्ट रुग्णालयाचे डॉ. केदार तोरसकर , फोर्टिस रुग्णालयाचे डॉ. राहुल पंडित, लोकमान्य टिळक रुग्णालयाचे डॉ. नितीन कर्णिक, प्रिन्स अली खान रुग्णालयाचे डॉ. झहीर विरानी व जसलोक रुग्णालयाचे डॉ. ओम श्रीवास्तव यांचा समितीत समावेश आहे. 

तज्ज्ञांच्या सूचना
कोरोना रुग्णांसाठी तयार केलेल्या खाटांवर राज्य सरकार किंवा महापालिकेचे नियंत्रण असावे, असे या तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने सुचवले आहे. आरक्षित ठवल्या जाणाऱ्या 22 हजार खाटांची माहिती सरकारच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी लागेल. त्यापैकी 20 टक्के खाटा गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवण्याची सूचनाही काही सदस्यांनी केली आहे. अहमदाबाद आणि गुडगाव या शहरांत सर्व खासगी रुग्णालये ताब्यात घेऊन कोरोनाबधितांवर उपचार करण्यात येत आहेत. मुंबईत मात्र केवळ छोटी रुग्णालये घेतली असल्याचे एका सदस्याने सांगितले. या छोट्या रुग्णालयांत आयसीयू किंवा एमआयसीयू अशा सुविधा उपलब्ध नसतात. त्यामुळे गंभीर रुग्णांसाठी त्यांचा फारसा उपयोग होत नाही. ही कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती एका सदस्याने दिली.

Will the number of corona positive increase by the end of the month? Instructions to keep 22 thousand beds ready

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com