esakal | आजारी असतानाही मुंबईत कर्तव्यावर, सोलापूरच्या ST कर्मचाऱ्याचा उपचार न मिळाल्याने मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

आजारी असतानाही मुंबईत कर्तव्यावर, सोलापूरच्या ST कर्मचाऱ्याचा उपचार न मिळाल्याने मृत्यू

मुंबईत बेस्टच्या मदतीला आलेल्या सोलापूर विभागातील मंगळवेढा आगराचे वाहक भगवान गावडे (वय 48) यांचा वेळेवर उपचार न मिळाल्याने कुर्ला येथील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला. मूळव्याधीचा त्रास असलेल्या गावडे यांची गेल्या तीन दिवसांपासून प्रकृती खालावली होती.

आजारी असतानाही मुंबईत कर्तव्यावर, सोलापूरच्या ST कर्मचाऱ्याचा उपचार न मिळाल्याने मृत्यू

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई: मुंबईत बेस्टच्या मदतीला आलेल्या सोलापूर विभागातील मंगळवेढा आगराचे वाहक भगवान गावडे (वय 48) यांचा वेळेवर उपचार न मिळाल्याने कुर्ला येथील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला. मूळव्याधीचा त्रास असलेल्या गावडे यांची गेल्या तीन दिवसांपासून प्रकृती खालावली होती. एसटीचे वाहतूक नियंत्रक एन. के. जाधव आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे उपचार मिळावा म्हणून तक्रार केली. मात्र वेळेवर दखल न घेतल्याने परिणामी उपचाराविनाच जीव गमवावा लागला आहे. मात्र, अद्याप गावडे यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.

मुंबईतील रस्त्यावरील प्रवाशांची कोंडी फोडण्यासाठी बेस्ट उपक्रमामध्ये एसटीचे 1000 गाड्या सेवेत आल्या आहेत. त्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय व्हावी, यासाठी ओयो हॉटेल कंपनीला कंत्राट दिले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांकडून जेवणाचा दर्जा नसल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जात होत्या. तरी सुद्धा एसटीने त्याची दखल घेतली नाही.

अधिक वाचाः  खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना कोरोना लसीकरणातून वगळले; इंडियन मेडिकल असोसिएशनचा आरोप

सोलापूर विभागातील 48 कर्मचारी मुंबईत बेस्ट उपक्रमात प्रवासी सेवा देण्यासाठी 26 ऑक्टोबर रोजी दाखल झाले होते. त्यामध्ये मंगळवेढा डेपोच्या भगवान गावडे यांना समावेश होता. गावडे यांना पूर्वीपासून मुळव्याधीचा त्रास असतानाही मंगळवेढा आगार व्यवस्थापकाने त्यांना जबरदस्तीने मुंबईत कर्तव्यावर पाठवले होते. दरम्यान प्रतीक्षा नगर ते बोरिवली कर्तव्यावर कामगिरी बजावत असताना गेल्या तीन दिवसांपासून गावडे यांचा आजार वाढत गेला.  संबंधित एसटीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या आजाराची कोणतीही दखल घेतली नसल्याने अखेर गावडेना आपला जीव गमवावा लागला आहे.

अधिक वाचाः  मुंबई, ठाण्यातून 88 वन्यजीवांची तस्करी, दोन जणांना वनविभागाकडून अटक

गावडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवाला कुर्ला येथील भाभा हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले आहे. तर या घटनेची कुर्ला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरू केला आहे.

कर्मचारी आजारी असले तरी सुद्धा एसटी महामंडळाच्या आगार व्यवस्थापकाकडून जबरदस्तीने मुंबई पाठवल्या जात आहे. यामध्ये जर कर्मचाऱ्यांना कोणत्या आजाराच्या व्याधी असेल त्याची सुद्धा दखल घेतल्या जात नाही. उलट आगार व्यवस्थापक निलंबनाची कारवाई करण्याची धमकी दिली जात असल्याने नाईलाजास्तव मुंबई मध्ये यावे लागले.
मृतक कर्मचाऱ्याचे सहकारी

मृत कर्मचाऱ्यांनी आपण आजारी असल्याचे मंगळवेढा आगार व्यवस्थापकांना सांगितले होते. तरी सुद्धा त्यांनी जबरदस्तीने गावडे यांना मुंबई पाठवले, त्यांना आधीच मूळव्याधीचा आजार होता. त्यामध्ये मुंबईतील जेवणाची गैरसोय होत होती. त्यामुळे गावडे यांना त्रास होत होता. दरम्यान मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला.
मृतक कर्मचाऱ्याचे सहकारी

एसटी कर्मचा-यांचा मृत्यू केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झालेला असून मुंबईमध्ये बेस्ट सेवेसाठी आलेल्या कर्मचा-यांची सुरक्षिततेची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली जात नाही, जेवणाची व्यवस्था निकृष्ठ दर्जाची असल्याने अनेक कर्मचा-यांना अपचनाचा त्रास होतोय याबाबत प्रशासनाशी वारंवार पाठपुरावा करून सुध्दा कारवाई होत नाही, त्यातच आता एक बळी गेला आहे, आणखी किती बळी घेणार? दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा कर्मचा-यांचा तीव्र असंतोष उफाळून येईल 
मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)

बेस्टच्या मदतीला इतर विभागातून कर्मचारी बोलावले खरे पण त्यांना अक्षरश: वाऱ्यावर सोडून दिले आहे. जेवण माणसांसाठी की जनावरांसाठी हेच कळत नाही. तीन दिवस या कर्मचाऱ्याचं ब्लीडिंग होत होतं. त्याने वरिष्ठांना ही कल्पना दिली होती. मग त्याला वैद्यकीय मदत का दिली नाही याची चौकशी झाली पाहिजे आणि संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे. कामगारांच्या भावना खूप तीव्र  झाल्यात त्याचा कधीही उद्रेक होऊ शकतो.
संदीप शिंदे, अद्यक्ष, राज्य एसटी कामगार संघटना

---------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

without treatment three days ST employee of Solapur division dies Mumbai