रात्री दीड वाजता मंत्रालयात सापडली महिला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

मंत्रालयाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रात्री 1.30 वाजता एक अज्ञात महिला मंत्रालयात फिरताना आढळून आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
 

मुंबईः मंत्रालयाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रात्री 1.30 वाजता एक अज्ञात महिला मंत्रालयात फिरताना आढळून आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी पोलिस दलास तैनात करण्यात आले आहे. मात्र याच सजग पोलिसांच्या तैनातीतही काही दिवसांपूर्वी माहिती चोरी (डेटा चोरी) चे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्याचे प्रशासकिय मुख्यालय असलेल्या मंत्रालयात झालेला या प्रकाराने पुन्हा एकदा मंत्रालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती. या बैठकीच्या निमित्ताने जवळपास सर्वच मंत्री मंत्रालयात असतात. त्यामुळे राज्यातील हजारो लाखो नागरीक मंत्रालयात येत असतात. मात्र यावेळी एक महिला मंत्रालय बंद झाल्यानंतरही तशीच मंत्रालयात थांबून राहिली. तसेच ही महिला मंत्रालयाच्या ४ था, ५ वा आणि ७ व्या मजल्यावर फिरत राहीली असल्याची माहिती मिळाली आहे.

रात्री 1.30च्या सुमारास कर्तव्यावर असलेले पोलिस गस्त घालण्याच्या निमित्ताने फिरत असताना सदर महिला एकटीच फिरत असल्याचे आढळून आले. त्यावेळी पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात घेत मरिन्स लाईन्स पोलिस ठाण्याच्या हवाली करण्यात आल्याचे एका पोलिस कर्मचाऱ्याने सांगितले. सदर महिला ही मुंबई बाहेरील असून तीचे आडनाव शिंदे असे आहे.

मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी सदर महिला मंत्रालयात आली होती. मात्र मुख्यमंत्री काही भेटले नसल्याने सदर महिला मंत्रालयातच थांबली. रात्री गस्तीचे पोलिस मंत्रालयात फिरत असताना ती एकटीच सापडल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीही दोनवेळा असाच प्रकार घडला असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman was found in the Mantralaya at midnight