सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 July 2019

मोबाईलने सासऱ्याच्या विकृत वर्तनाचे चित्रीकरण करून पोलिसांत तक्रार दाखल केली.

नालासोपारा: घरातील सर्व जण कामावर गेल्याची संधी साधून सासऱ्याने सुनेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. 29) विरारमध्ये घडली आहे. या प्रकाराबाबत संबंधित महिलेने पती, सासू आणि दीराला सांगितले; मात्र कोणीही विश्‍वास ठेवला नाही. त्यामुळे तिने मोबाईलने सासऱ्याच्या विकृत वर्तनाचे चित्रीकरण करून पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या सासऱ्याच्या विरोधात सुनेचा विनयभंग आणि ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंदवून त्याला बेड्या ठोकल्या. 

विरार पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारा हा 45 वर्षांचा आरोपी रिक्षाचालक आहे. मागील आठवड्यात त्याने सुनेशी लगट करण्याचा प्रयत्न केला; त्या वेळी तिने विरोध केला होता. तिने ही घटना पती, सासू आणि दीराला सांगितली; परंतु त्यांनी अविश्‍वासच दाखवला. नांदायचे नसल्यामुळे ती असा आरोप करत असल्याचे त्यांनी सुनावले होते. सासऱ्याचे विकृत वर्तन सुरूच राहिल्यामुळे सुनेने शक्कल लढवली. त्याचे पितळ उघडे पाडण्यासाठी तिने स्वयंपाकघरात लपवलेल्या मोबाईल कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले. 

त्यानंतर तिने हा प्रकार आपल्या आई-वडिलांसह पती, सासू आणि दीराला सांगितला. त्यामुळे वासनांध सासऱ्याचे बिंग फुटले. त्यानंतर तिने सासऱ्याच्या विरोधात विरार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी या सासऱ्याच्या विरोधात विनयभंग, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे, असे विरारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल दबडे यांनी सांगितले. 

महिनाभरापासून वाकडी नजर 
हा सासरा दररोज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास रिक्षा चालवण्यासाठी जाऊन सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घरी परत येत असे. त्या वेळी त्याची 22 वर्षांची सून एकटीच घरात असायची. हा सासरा महिनाभरापासून सुनेकडे वाकड्या नजरेने बघत होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women abuse by father in law