नायगाव खाडीवरील उड्डाणपुलाचे काम रखडले, प्रवाशांची ये-जा करताना गैरसोय

प्रसाद जोशी
Sunday, 4 October 2020

पूल जीर्णावस्थेत असल्याने नागरिकांच्या वारंवार होणाऱ्या मागणीनुसार खाडीवर उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले.

वसई : नायगाव खाडीवर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला काही वर्षांपासून ग्रहण लागले आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय होत असून, पूल पूर्ण कधी होणार, या प्रतीक्षेत येथील नागरिक आहेत. 

हे ही वाचा : नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ! एक्‍सपायरी डेट विना मिठाई विक्री - 

नायगाव पूर्वेला जूचंद्र, चंद्रपाडा, परेरा नगर, बापाणे व आजुबाजूच्या गावातील नागरिक व्यवसाय, नोकरी व अन्य कामाकरिता रेल्वेने प्रवास करतात. नायगाव स्टेशनकडे ये-जा करण्यासाठी नागरिक जुन्या लोखंडी पुलाचा वापर करत होते. पूल जीर्णावस्थेत असल्याने नागरिकांच्या वारंवार होणाऱ्या मागणीनुसार खाडीवर उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले. या पुलाच्या कामातही अनेक अडचणी आल्या होत्या. सद्यस्थितीत उड्डाणपूल तयार झाला असला तरी उतार मार्गाला खारभूमी विभागाचा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुलाचे काही काम अपूर्ण आहे. 

नक्की वाचा : कोरोनामुळे कर्करोगासारखे आजार बळावले; आरोग्याकडे दुर्लक्ष न करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला 

नायगाव उड्डाणपुलाच्या संदर्भात खारभूमी विभागाची हरकत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, तसेच महापालिका अधिकारी यांच्याकडून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ही समजते. सद्यस्थितीत या पुलाच्या एका बाजूच्या उतार मार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी दुसऱ्या भागातील उतार मार्गाचे काम सुरू करण्यात आले नाही. काम अपूर्ण असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

महत्वाची बातमी : एनसीबी भाजपच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करणार, काँग्रेसचा सवाल

नायगाव खाडीवर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या एका बाजूचे काम पूर्ण झाले आहे; तर दुसऱ्या बाजूचे काम देखील लवकरच पूर्ण केले जाईल. काही अडचणी आहेत, त्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
- प्रशांत ठाकरे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग. 

(संपादन : वैभव गाटे)

Work on the flyover at Naigaon Bay was stalled inconvenient for travelers


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Work on the flyover at Naigaon Bay was stalled inconvenient for travelers