World Cancer Day: वाढत्या प्रदूषणामुळे कर्करोग फैलावतोय

World Cancer Day: वाढत्या प्रदूषणामुळे कर्करोग फैलावतोय

मुंबई: मुंबईसह उपनगरीय परिसरात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर हळूहळू पुन्हा प्रदूषण वाढायला सुरुवात झाली आहे. याचा परिणाम कर्करोगाचे रुग्ण वाढण्यावर होत आहे. वाढलेल्या प्रदूषणामुळे कर्करोग बळावतो आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग वाढल्याचे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्टर मांडतात. त्यामुळे, कर्करोगासारखा भयानक आजार आटोक्यात येण्यासाठी प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. तंबाखू सेवन करणाऱ्यांपेक्षा हवा प्रदूषणामुळे अनेक लोक आजारी पडतात.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या मेडिकल रिसर्च करणाऱ्या सरकारी संस्थेने केलेल्या अभ्यासात दिलेल्या माहितीनुसार, हवा प्रदूषणामुळे लोकांच्या आयुर्मानावरही परिणाम होतो. हवा प्रदूषणाचा देशातील 77 टक्के लोकांना फटका बसत असून जर शुद्ध हवा मिळाल्यास लोकांचं आयुष्यमान सरासरी 7 महिन्याने वाढत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.  तंबाखूचं सेवन केल्यानंतरच त्याचा व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होतो. पण श्वास तर वारंवार घ्यावा लागतो. त्यात जर हवा प्रदूषित असेल तर त्याचा आरोग्यावर वारंवार परिणाम होत असतो असे फुप्फुसविकारज्ज्ञ डॉ. राजेंद्र ननावरे यांनी सांगितले.

हा वायू देखील आरोग्यास धोकादायक

रेडॉन नावाचा एक नैसर्गिक वायू आहे. या वायूची निर्मिती दगड आणि मातीमध्ये आढणाऱ्या युरेनियमपासून होते. रेडॉन वायूमुळेही फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. हा वायू आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असून तो डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही. डोंगराळ भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना या वायूमुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते.

वायू प्रदूषण

वायू प्रदूषणामध्ये सल्फेट एअरोसॉलचे (Sulfate aerosol) प्रमाण अधिक असते. वाहनांमधून उत्सर्जित होणाऱ्या धुरामध्येही याचा समावेश असतो. या धुरामुळे आपल्या फुफ्फुसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. वाहनांतील धुराव्यतिरिक्त जेवण तयार करण्यासाठी किंवा शेकोटीसाठी लाकडे, गोवऱ्या, गवत जाळल्यानंतर त्यातून येणाऱ्या धुरामुळेही फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो.

कर्करोग हे भारतातील मृत्यूंसाठी कारणीभूत असणारा एक प्रमुख घटक आहे. दरवर्षी 4 फेब्रुवारी या दिवशी जागतिक कर्करोग दिन पाळला जातो. कर्करोगावर आतापर्यंत अनेक उपचार सुरू करण्यात आले आहेत. पण, कर्करोगाबाबतीत भारत आजही जगात तिसऱ्या क्रमाकांवर आहे. त्यातही तोंडाच्या होणाऱ्या कर्करोगाचं प्रमाण 86 टक्के आहे. तर, 40 टक्के लोकांना तंबाखूमुळे तोंडाचा कर्करोग होत आहे.

तोंड आणि स्तनाचा कर्करोग 30 टक्के तरूणांमध्ये

एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार, 2017 या वर्षापासून आतापर्यंत मुंबईत 2504 कर्करूग्णांवर उपचार करण्यात आले आहे. यात 1424 जणांना केमोथेरपी देण्यात आली आहे. याशिवाय पुरूषांमध्ये साधारणतः तोंडाचा, अन्ननलिका, पोट, कोलोरेक्टल आणि फुफ्फुसाचा कर्करोग सर्वांधिक आढळून येतो. तर महिलांमध्ये स्तन, गर्भाशयाच्या मुखाचा, डोके आणि मानेचा कर्करोग अधिक प्रमाणात दिसून येत आहे. पुरूषांमध्ये कर्करोगाचे प्रमाण 60 टक्के तर महिलांमध्ये हे प्रमाण 40 टक्के इतके आहे. साधारणपणे 15-20 टक्के पुरूषांना तोंडाचा कर्करोग तर महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका सर्वाधिक असतो.

उतारवयात कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. यात स्तनाचा, तोंडाचा, रक्ताचा, यकृताचा आणि गर्भाशयाचा कर्करोग होऊ शकतो. 20 ते 30 टक्के तरुणांमध्ये स्तनाचा आणि तोंडाचा कर्करोग असल्याचे निदान झाले आहे. लहान वयात तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे तरुणवयात या मुलांना कर्करोगाचा सामना करावा लागतो. याशिवाय  स्त्रियांमध्ये कमी वयात स्तनाचा कर्करोग होण्यामागे अनुवांशिक घटक, हार्मोनल बदल, अल्कोहोलचे सेवन, लठ्ठपणा, चुकीची जीवनशैली आणि शारीरिक हालचालींचा अभाव ही यामागील मुख्य कारणे आहेत.

2018 मध्ये सर्वाधिक मृत्यू

गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी लॅन्सेट ग्लोबल हेल्थने केलेल्या अभ्यासानुसार, " 2018 मध्ये भारतात सर्वाधिक मृत्यू झाले कर्करोगामुळे झाले आहेत. कर्करोग लवकर ओळखून त्याच्यावर यशस्वी उपचार करण्यासाठी प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. रक्ताचा कर्करोग वगळता कर्करोग हा असा आजार आहे जो जेव्हा सामान्य पेशींचा समूह अनियंत्रित करतो. तेव्हा तो एक गाठ (ट्यूमर) मध्ये बदलतो. जर हा अनियंत्रित झाला तर रक्तप्रवाहात आणि इतर आजूबाजूच्या सामान्य ऊतींमध्ये किंवा शरीराच्या इतर भागात पसरतो आणि शरीराच्या कार्यावर परिणाम करणारे हार्मोन्स रिलीझ करू शकतात.

पश्चिम उपनगरातील नागरिकांना दिलासा

पश्चिम उपनगरात राहणाऱ्या कर्करूग्णांना वेळीच उपचार मिळावेत, यासाठी एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि अँपेक्स रुग्णालयाच्या सहयोगाने नवीन कर्करोग उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध असून सर्व प्रकाराच्या कर्करोगावर याठिकाणी उपचार दिले जाणार आहेत. यामुळे पश्चिम उपनगरात राहणाऱ्या  नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

वैद्यकीय तपासण्या आवश्यक

अपेक्स रुग्णालयाचे डॉ. धैर्याशील सावंत यांनी सांगितले की,  “ पूर्वी स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण 5 ते 10 टक्के होते. तर मागील पाच वर्षात यात 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या केंद्रात रूग्णाच्या स्थितीनुसार प्रत्येक वयोगटातील कर्करूग्णांसाठी इम्युनोथेरपी दिली जाणार आहे. डोके आणि मान, फुफ्फुस, मूत्रपिंड, मूत्राशय, यकृत किंवा स्तनाचा कर्करोग असलेल्या रूग्णांमध्ये इम्यूनोथेरपीचा वापर केला जाणार आहे. कर्करोगाचे वेळीच निदान व्हावे, यासाठी मॅमोग्राफी, अँन्टीजेन चाचणी, कोलोनोस्कोपी यांसारख्या कर्करोगावरील वैद्यकीय तपासणी करून घेण्यास नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाणार आहे."

दरम्यान, टाटा रुग्णालयात 2020 मध्ये 60,699 नवीन कर्करोगाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 1,364 रुग्णांवर इलेक्टिव्ह पद्धतीने उपचार दिले गेले. 250 आपातकालीन परिस्थितीत आलेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया केली गेली. तर, त्यातील 37 रुग्णांना आपला जीव गमावावा लागला आणि इलेक्टिव्ह सर्जरीमध्ये 1.7 टक्के मृत्यू दर आहे. मात्र, कोविड काळामुळे एप्रिल,मे आणि जूनमध्ये रुग्णांची संख्या कमी झालेली पाहायला मिळाली. पण, कोविड काळ असूनगी रुग्णालयाने बऱ्याच रुग्णांना उपचार दिले असल्याचे टाटा रुग्णालयाचे कर्करोग शल्यचिकित्सक प्रा. डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी सांगितले.

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

World Cancer Day 2021 Thursday 4 February Increasing pollution spreading cancer

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com