esakal | 29 सप्टेंबर जागतिक हृदयरोग दिन विशेष: पुरुषांपेक्षा महिलांना हृदय विकाराचा धोका अधिक
sakal

बोलून बातमी शोधा

29 सप्टेंबर जागतिक हृदयरोग दिन विशेष: पुरुषांपेक्षा महिलांना हृदय विकाराचा धोका अधिक

25 ते 35 वयोगटातील 15 टक्के महिलांना हृदयविकाराचा त्रास जाणवत असून केवळ 46 टक्के महिलांना हृदयविकाराच्या आजाराचे गांभीर्य असून स्त्रियांमध्ये हृदयविकाराने मृत्यू येण्याचा धोका हा स्तनांच्या कर्करोगामुळे येणाऱ्या मृत्यूच्या धोक्याहूनही अधिक असल्याचे अभ्यासात समोर आले आहे.

29 सप्टेंबर जागतिक हृदयरोग दिन विशेष: पुरुषांपेक्षा महिलांना हृदय विकाराचा धोका अधिक

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई: हृदयविकार हा पुरुषांचा आजार असल्याचा एक सार्वत्रिक समज आहे. मात्र पुरुषांपेक्षा महिलांना हृदय विकाराचा धोका अधिक असून बऱ्याचदा पुरूषांपेक्षा महिलांमधील लक्षणे वेगळी असल्याचे दिसते. 25 ते 35 वयोगटातील 15 टक्के महिलांना हृदयविकाराचा त्रास जाणवत असून केवळ 46 टक्के महिलांना हृदयविकाराच्या आजाराचे गांभीर्य असून स्त्रियांमध्ये हृदयविकाराने मृत्यू येण्याचा धोका हा स्तनांच्या कर्करोगामुळे येणाऱ्या मृत्यूच्या धोक्याहूनही अधिक असल्याचे अभ्यासात समोर आले आहे. 

हृदयविकाराची स्त्रियांना जाणवणारी लक्षणे ही बरेचदा पुरुषांपेक्षा वेगळी असतात; आणि हृदयविकाराचा झटका आल्यानंतर एका वर्षाच्या आत मृत्यूमुखी पडण्याची शक्यता पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये अधिक असते. 

अँटिकॉग्युलन्ट्सचा म्हणजेच रक्तात गुठळ्या होऊ नयेत म्हणून दिली जाणारी औषधे किंवा अगदी हृदयाशी संबंधित काही विशिष्ट वैद्यकीय प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्यांचाही स्त्रियांवर होणारा परिणामही पुरुषांपेक्षा वेगळा असतो. स्त्रियांच्या शरीरातील एस्ट्रोजेन त्यांचे हृदयविकारापासून संरक्षण करते असे सरसकट मानले जाते, मात्र त्यातही आता तथ्य उरलेले नाही असे कल्याण येथील फोर्टीस हॉस्पिटलच्या इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीस्ट,सीनिअर कन्सल्टंट  डॉ. झाकिया खान यांनी सांगितले. 

रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रियांच्या शरीरात असणाऱ्या एस्ट्रोजेन या संप्रेरकामुळे शरीरातील एचडीएल (चांगल्या)कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढत असल्याने आणि एलडीएल (वाईट) कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. रजोनिवृत्तीनंतर पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या शरीरामध्ये कॉलेस्ट्रॉल साठण्याचे प्रमाण जास्त असते. ट्रायग्लिसराइड्सची पातळी वाढल्यानेही स्त्रियांमधील कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांचा धोका वाढतो. एचडीएलची खालावलेली पातळी आणि ट्रायग्लिसराइट्सची वाढलेली पातळी यांमुळे 65 वर्षांच्या पुढील वयातील स्त्रियांना हृदयविकारामुळे मृत्यू येण्याचा धोका अधिक असतो असे ही डॉ झाकीया खान यांनी सांगितले.

मधुमेही स्त्रियांना बरेचदा स्थूलत्व, कॉलेस्ट्रोलची वाढलेली पातळी आणि उच्च रक्तदाब या समस्याही असतात आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका अधिकच वाढतो. हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या स्त्रियांना मधुमेहाचा त्रासही असल्याचे आढळून आले आहे, आणि असे असल्याने त्यांना दुस-यांदा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका दुपटीने वाढतो, तसेच हृदय निकामी होण्याचा धोकाही असतो असा इशारा ही डॉ झाकीया खान यांनी दिला. 

हृदयविकाराची समस्या असलेल्या स्त्रियांमध्ये हा आजार हृदयाच्या आकाराने लहान रक्तवाहिन्यांमध्ये आढळून येतो. याला मायक्रोव्हॅस्क्युलर आजार असेही म्हटले जाते. पुरुषांमध्ये छातीवर असह्य भार येऊन वेदना होण्यासारखे लक्षण हृदयविकाराशी ठळकपणे जोडले गेलेले दिसून येते. स्त्रियांना मात्र धाप लागणे , थकवा, अपचन किंवा मळमळणे, पाठ, खांदे किंवा मानदुखी यांसह हृदयविकार असलेल्या स्त्रियांमध्ये छातीमध्ये थोड्या प्रमाणात जाणवणा-या अस्वस्थतेच्या रूपात ही लक्षणे दिसून येतात.

मायक्रोव्हॅस्क्युलर आजारांचे निदान करण्यासाठी अँजिओग्राम्स तितकेसे परिणामकारक ठरत नाहीत. स्त्रियांमध्ये स्ट्रेस टेस्ट चुकून पॉझिटिव्ह येण्याचा प्रकारही अधिकवेळा घडताना दिसतो. स्त्रियांमध्ये स्ट्रेस कार्डिओमायोपॅथी शक्यताही अधिक असते आणि त्यांच्या कोरोनरी आणि रेडिअल आर्टरीजचा आकार तुलनेने लहान असतो. त्यामुळे हृदयावर रेडिअल आर्टरीजमार्गे उपचार प्रक्रिया पार पाडल्यानंतर केलेल्या रेडिअल आर्टरींना आकडी येण्याची शक्यता स्त्रियांच्या बाबतीत अधिक असते. प्रिझर्व्हड लेफ्ट व्हेन्ट्रिकल इजेक्शन फ्रॅक्शनमुळे हृदयाचा डाव्या बाजूच्या खालच्या कप्प्यामध्ये रक्त पूर्णपणे भरले जात नाही. परिणामी हृदयाकडून शरीराकडे प्रवाहित होणा-या रक्ताचे प्रमाण कमी असते,यामुळे हृदय निकामी होण्याचा प्रकार स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो त्यामुळे स्त्रियांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे ही डॉ झाकीया खान म्हणतात. 
 
स्त्रियांमध्ये ह्रदयविकार वाढण्याची कारणे

बैठ्या जीवनशैलीचा अंगिकार 
कुटुंबामध्ये हृदयाशी संबंधित आजारांचा पूर्वेतिहास असणे हे आजही पहिल्या क्रमांकाचे कारण आहे 
ताणतणाव 
धूम्रपान 
घरात आणि बाहेरही आढळणारे वायू प्रदूषण

 
हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी उपाय

  • अधिक सक्रिय रहा: दिवसभरातून किमान अर्ध्या तासासाठी मध्यम स्वरूपाचा व्यायाम करा. 
  • सकस आहार घ्या: हृदयाच्या दृष्टीने चांगल्या आहारामध्ये फळे आणि भाज्या, अखंड धान्ये आणि सुकामेवा यांचा समावेश असतो. त्याचबरोबर सोडियमचे सेवन कमी करा आणि ज्यांच्यामुळे ट्रान्स फॅट्स शरीरात जातील असे पदार्थ खाणे टाळा. 
  • धूम्रपान टाळा: स्त्रियांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता धूम्रपानामुळे दुपटीने वाढते, तेव्हा सिगारेटला तुमच्या आयुष्यातून हद्दपार करा!
  • मनावरील ताण कमी करा: दीर्घकाळापासून मनावर असलेला ताण तसेच नैराश्य यांच्यामुळे हृदयविकाराचा झटका वाढू शकतो. हे टाळण्यासाठी मानसिक आरोग्यतज्ज्ञांशी बोला. ध्यानधारणा आणि योगासनांचा वापर करा, पुरेशी झोप घ्या आणि प्रियजनांशी बोला.

------------------------

(संपादनः पूजा विचारे)

World Heart Day Special Women higher risk heart disease than men