कौतुकास्पद ! धकधकता वणवा विझवण्यासाठी दोन तरुणांचं धाडस, वाचा चित्तथरारक अनुभव

wanava
wanava

पाली : सुधागड तालुक्यातील सरसगड किल्ल्यावर शुक्रवारी (ता.24) रात्री वणवा लागला. वणवा अधिक पसरला असता तर कदाचित मानवी वस्तीत दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र ज्ञानेश्वर जगताप व अमित निंबाळकर या दोन तरुणांनी जीवाची बाजी लावत अतिशय तत्परतेने हा वणवा विझवला. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सरसगड किल्ल्याला लागलेली आग भास्कर दुर्गे व राजेश इंदुलकर यांनी विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र कालावधीनंतर आग पुन्हा भडकली. याबाबत अमित निंबाळकर यांनी चित्तथरारक अनुभवाबाबत सांगितले की, रात्री जेवण झाल्यानंतर ज्ञानाचा म्हणजे ज्ञानेश्वर जगतापचा फोन आला. त्याने किल्ल्यावरील वणवा विझवायला ये म्हणून सांगितले. मग बॅटरी घेऊन तडक किल्ल्याच्या दिशेने निघालो. वरच्या माळावर पोहचलो तर ज्ञाना एकटाच दिसला. म्हटलं अजून कोण आहे का? दोघा तिघांची त्याने नावे घेतली. तसेच आग वाढली तर जास्त वर जाता येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे पायाला खाज, घामाच्या धारा, मध्येच अंगावर येणारे निखारे झेलत दोघांनीच आग विझवली. पाली गाव लॉकडाऊनमुळे आराम करत असताना हे दोन मावळे जणूकाही त्यांच्यासाठीच लढत होते. 

पशु-पक्ष्यांना जीवदान
वणवा विझवल्यामुळे जंगलातील पशु-पक्ष्यांना जीवदान मिळाले. त्यामुळे पाली वनविभागाचे वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी तरुणांचे अभिनंदन केले. तसेच सुधागड वनक्षेत्रात वणवा नियंत्रणासाठी फायर ब्लोअर्स उपलब्ध असून भविष्यात वणवा लागल्यास वनरक्षक, वनपाल किंवा वनक्षेत्र कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले. 

वणव्यांमुळे सापांची संख्या व प्रजाती नष्ट होत आहेत. बहुतांश वणवे मानवनिर्मित आहेत. वणवे पेटविल्यामुळे पक्ष्यांची अंडी, पिल्लेही जळून जातात. या वणव्यामुळे होणाऱ्या उजाड डोंगरामुळे निसर्गसौंदर्याला हानी पोहोचून जंगलातील जैवविविधता, वन्यजीव, कीटक, पक्षी, सरपटणारे प्राणी आदी अनेकांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. औषधी वनस्पतीही नामशेष झाल्या आहेत.  

- अमित निंबाळकर, वणवा विझविणारा तरुण, पाली

The youngsters extinguished the fire on Sarasgad

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com