तुला खूप चरबी आलीये काय? थांब तुला बघतो...अन्‌ गेला आयुष्यभरासाठी तुरूंगात!

दिपक शेलार
Monday, 24 August 2020

खेळताना झालेल्या भांडणाचा राग मनात धरून धारदार शस्त्राने अल्पवयीन मुलाला भोसकल्याप्रकरणी दोषी ठरवत ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने 19 वर्षीय युवकाला तीन वर्षे तुरुंगवास आणि पाच हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

ठाणे : खेळताना झालेल्या भांडणाचा राग मनात धरून धारदार शस्त्राने अल्पवयीन मुलाला भोसकल्याप्रकरणी दोषी ठरवत ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने 19 वर्षीय युवकाला तीन वर्षे तुरुंगवास आणि पाच हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. राजा मलखान सिंग असे शिक्षा ठोठावलेल्या युवकाचे नाव आहे. हा निकाल ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेश एस. गुप्ता यांनी नुकताच दिला; तर सरकारी वकील म्हणून ऍड. रेखा हिवराळे यांनी काम पाहिले. 

ही बातमी वाचली का? भीषण ! महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळली; ७० ते ८० रहिवासी ढिगाऱ्यात अडकल्याची भीती

नवी मुंबई कोपरखैरणे परिसरात 10 फेब्रुवारी 2018 रोजी ही घटना घडली होती. यातील पीडित रोशन सिंग हा सेक्‍टर-19 कोपरखैरणे येथे राहण्यास होता. आसपास त्याची मावशी राहत होती. घटनेच्या दिवशी संध्याकाळी रोशन मावशीच्या घरून अंडी आणि भाजी आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी आरोपी राजा मलखान सिंग याने रोशनला अडवून तुला खूप चरबी आली आहे काय? थांब तुला बघतो म्हणत हातातील धारदार शस्त्राने रोशनला भोसकून जखमी केले. याप्रकरणी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी राजाला अटक केली. 

ही बातमी वाचली का? आरतीच्या वेळी गर्दी टाळण्यासाठी भन्नाट आयडिया; सोसायटीच्या मजल्यांमध्ये लावले लाऊड स्पीकर

या प्रकरणाची अंतिम सुनावणी न्या. गुप्ता यांच्या न्यायालयात होऊन विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी न्यायालयात घटनेची सविस्तर माहिती आणि साक्षीपुरावे सादर केले. आरोपीच्या वतीने वकील पाटणकर यांनीही युक्तिवाद केला. मात्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून तीन वर्षांचा तुरुंगवास आणि पाच हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली; तर दंडाच्या रकमेतील 4 हजार रुपये पीडित रोशन याला देण्याचे निर्देश दिले. 
-------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth jailed for stabbing Minor child in thane