अभिनेता अमोल कागणे सांगतोय वेलनेस आणि फिटनेसकडे लक्ष देणे गरजेचे

अमोल कागणे, अभिनेता, निर्माता 
Tuesday, 13 October 2020

आजच्या धकाधकीच्या जीवनात तंदुरुस्ती खूप गरजेची आहे. त्यामुळे सर्वांनीच आपल्या वेलनेस आणि फिटनेसकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ट्रेडमिलवर पंधरा ते वीस मिनिट पळतो. मी जवळपास अर्धातास नॉर्मल एक्सरसाइज करतो.

हेल्दी राहण्यासाठी आपण दररोज एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. त्यासाठी मी सकाळी सात वाजता उठतो. त्यानंतर अंधेरीतील लोखंडवाला बॅक रोडवर साडेसात ते आठदरम्यान वॉकिंग करतो. त्यानंतर ट्रेडमिलवर पंधरा ते वीस मिनिट पळतो. मी जवळपास अर्धातास नॉर्मल एक्सरसाइज करतो. त्यानंतर ट्रेडमिल करतो. दोन दिवस डंबेल्सवर व्यायाम करतो. साडेनऊ वाजता नाश्ता करतो. माझा कूक साउथ इंडियन असल्यानं तो इडली, उत्तप्पा, पोहे असे छान-छान पदार्थ बनवतो. ते खाल्ल्यानंतर मी अंधेरीतील मोरया हाउसमधील माझ्या स्टुडिओत जातो. तिथे दहा ते दीड-दोन वाजेपर्यंत काम करत असतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, ११ ते १२च्या दरम्यान मी हलकसं काहीतरी खातो. त्यानंतर दोनच्या दरम्यान भरपेट जेवण करतो. त्यामध्ये पनीर, मशरूम, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असतो. मी अभिनयासह निर्मितीक्षेत्रातही आहे. त्यामुळं चार ते पाच वाजेपर्यंत माझ्या मिटिंग्ज सुरू असतात. मी वर्षभरात पाच ते सहा चित्रपटांवर काम करतो. त्यामध्ये तीन ते चार चित्रपटांची निर्मिती, तर दोन ते तीन चित्रपटांमध्ये मी स्वतः अभिनय करतो. मी २०१९मध्ये तब्बल सात चित्रपटांवर काम केलं. कोरोनाच्या लॉकडाउनमुळं चित्रीकरण पूर्णपणे बंद झालं होतं. त्यानंतर स्टुडिओत नियम पाळून काम करण्यास परवानगी मिळाली, त्यावेळी मी ‘डॉक्टर-डॉक्टर’, ‘झोलझाल’ या दोन चित्रपटांचं चित्रीकरण पूर्ण केलं. तसेच ‘बेफान’ चित्रपटात पोस्ट-प्रॉडक्शन पूर्ण केलं. 

लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मी मेडिकलचा विद्यार्थी, कान-नाक-घसा तज्ज्ञ असल्यामुळं, सुरुवातीपासूनच आरोग्याबाबत जागरूक आहे. त्यामुळं आंघोळ केल्यानंतर तांब्याभर पाणी पितो. दिवसभरात तीन-चार लीटर पाणी पितो. सर्व प्रकारची सीझनल फळे खातो, तसेच, मँगो व मिल्क शेक पितो. रात्रीचं जेवण दहाच्यादरम्यान करतो. रात्रीच्या जेवणात पास्ता, हलकसं जेवण घेतो. भात आणि दही खात नाही. रात्री पुरेशी झोप घेतो. ‘बाबू’ चित्रपटाच्या वेळेस मला ४० ते ४५ दिवसांत सहा किलो वजन कमी करावं लागलं. ‘बाबू’नंतर ‘अहिल्या’मध्ये मी खलनायकाची भूमिका साकारली. त्यासाठी बॉडीला कट्स पाहिजे होते. त्यानुसार मी शारीरात बदल केला. त्यानंतर ‘मान्सून फुटबॉल’ चित्रपटामध्ये गुजराती आणि विवाहित माणसाची भूमिका साकारली. त्यामध्ये सहा ते सात किलो वजन वाढवावं लागलं. दरम्यान, ‘डॉक्टर-डॉक्टर’ या चित्रपटामध्ये प्रथमेश परब व पार्थ भालेराव यांच्याबरोबर काम करायचं होतं. त्यामुळं पुन्हा मला पाच ते सात किलो वजन कमी करावं लागलं. वजन कमी करण्यासाठी मी औषधांचं सेवन केलं नाही. ते जिमच्या साह्यानंच केलं. 

आजच्या धकाधकीच्या जीवनात तंदुरुस्ती खूप गरजेची आहे. त्यामुळे सर्वांनीच आपल्या वेलनेस आणि फिटनेसकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

(शब्दांकन : अरुण सुर्वे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Amol Kagane says tips weight change from the gym