योग ‘ऊर्जा’ : योगप्रगतीमधील सहा साधक तत्त्वे

Devyani-M
Devyani-M

आपण मागील लेखात योग प्रगतीमधील बाधक तत्त्वे पाहिली. ही तत्त्वे म्हणजेच योगाभ्यास सत्कारणी लागावा यासाठी कोणत्या सूचना आवश्यक आहेत, हे समजून घेतले. थोडक्यात, योगाचा अभ्यास करणाऱ्यांनी कशापासून दूर राहावे ते पाहिले. या आठवड्यात आपण हठयोगात सांगितलेली सहा ‘साधक तत्त्वे’ पाहू. हे सहा नियम किंवा गुण योगाभ्यासातील प्रगतीसाठी आत्मसात करणे आवश्यक आहेत. मुळात हठयोगात साधक-बाधक तत्त्वे सांगायची गरजच काय असावी?

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हठयोग म्हटले, की पोट आत खेचून अवघड आसने करणारा हठयोगी आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. पण प्रत्येक योग ग्रंथात शेवटी ध्यान-समाधी हेच अंतिम ध्येय सांगितले आहे. तिथे पोचणे मात्र सोपे नाही. आसन-प्राणायामाचा सराव, सत्संग, ग्रंथ वाचन हे मार्गदर्शन करतात, परंतु नुसते वाचन करून, श्रवण करून योग साध्य होणार नाही. ते अमलात आणणे महत्त्वाचे. अनुभव प्रयत्नांच्या सातत्याने येतात. त्यामुळे योग आयुष्याचा भाग होण्यासाठी, आपल्या वागण्या-बोलण्यात-विचारात उतरण्यासाठी आवश्यक असलेल्या साधक तत्त्वांना समजून घेऊया.

1) उत्साह (Sustained Enthusiasm)
आपल्याला अनेकदा काही तरी करण्याचा ‘दांडगा उत्साह’ असतो. पण तो अनेकदा आरंभशूरपणा ठरतो. येथे ‘sustained’ हा शब्द महत्त्वाचा आहे. योग करणे म्हणजे खूप काहीतरी गंभीर विषय आहे असे काहींना वाटते. योगासाठी सकारात्मकता, रोज उमेदीने सरावास तयार असणे, स्फूर्ती, आंतरिक प्रेरणा हे व्यक्तिमत्त्वातील गुण पूरक ठरतात. 

2) साहस (Courage)
कुठलीही गोष्ट साध्य होणार की नाही, याचा विचार न करता नियमित सराव आणि साधना चालू ठेवणे, बाह्य किंवा आंतरिक अडचणींवर मात करून अभ्यासात खंड न पडू देणे म्हणजे साहस. बऱ्याचदा बाह्य परिस्थिती आपल्या हातात नसते. अशा वेळी आंतरिक बळ आणि साहस आपल्याला साथ देतात, पण त्यांना विकसित करावे लागते. आपण हे विसरतो की, आपली क्षमता नक्की किती उंचावू शकते, कारण रोज तेच ते आयुष्य जगून क्षमतेच्या विकासाला पुरेसा वाव मिळत नाही.

3) धैर्य (Perseverance)
पहिले तत्त्व ‘उत्साह’ हे आपण पाहिले, पण तो उत्साह दीर्घकाळ टिकवून योग मार्गावर चालत राहिले पाहिजे. झटपट यश मिळावे अशी अपेक्षा ठेवून, त्याला वेळ लागत असल्यास योगमार्गाप्रति औदासीन्य येऊ देऊ नये. कितीही काळ लागला तरी स्वामी विवेकानंद म्हणतात तसं ‘‘..ध्येयप्राप्ती होईपर्यंत थांबू नका,’’ म्हणजे धैर्य. प्रत्येकाच्या प्रगतीचा वेग आणि आलेख वेगळा असतो.

4) तत्त्वज्ञान (Discrimination)
योग्य-अयोग्य यामध्ये भेद करण्याची कुवत - मग तो आहारात, वागण्यात, संगतीत, गरजांमध्ये, संभाषणात, निर्णयांमध्ये, जीवनशैलीत म्हणजे ‘विवेकबुद्धी’ किंवा ‘तत्त्वज्ञान’. विवेकबुद्धी आपल्या आचरणात पावित्र्य आणते, अनावश्यकता दूर करते आणि विचारांना स्थिरता देते. हे सर्वांत महत्त्वाचे तत्त्व आहे कारण या मार्गात कोणत्याही कारणाने पाय घसरू नये, यासाठी विवेकशील असणे अत्यावश्यक आहे.

5) निश्चय (Determination)
एकदा हाती घेतलेले काम, ठरलेला नेम, साधनेची नियमितता यांच्या आड काहीही न येऊ देणे यासाठी निश्चय आणि गुरूंवर-योगावर निस्सीम श्रद्धा, हे फार महत्त्वाचे आहे.

6) जनसंग परित्याग (Avoid company of common people)
मागील लेखातही जनसंग हे बाधक तत्त्व म्हटले आहे. आज पुन्हा हाच मुद्दा साधक तत्त्वात आला आहे. दोनदा यावर भर देण्याइतका हा पैलू महत्त्वाचा नक्कीच आहे. अति बोलणं, लोकसंग्रह, निरुपयोगी विचारांची गर्दी, भाव-भावनांना उत्तेजन यांनी आपण स्वतः पासून लांब जातो. तुम्ही योगमार्गात असाल किंवा अजून प्रवेश केला नसेल, तरीही हे तत्त्व सर्वांसाठी उपयुक्त आहे. 

तुम्ही कुठेही असलात तरी या सहा साधक तत्त्वांना विकसित करू शकता. सहा बाधक आणि सहा साधक तत्त्वे योगाभ्यासाची तयारी कमकुवत किंवा सशक्त करू शकतात. शरीर-मनाचा समतोल हा प्रत्येक मनुष्याला हवा असतोच. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com