esakal | योग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...
sakal

बोलून बातमी शोधा

Yoga

आसनात काय करावं?
आसनात प्रयत्नशिथिलता असावी. यात तीन दृष्टिकोन आहेत. 

  • आपल्या शरीराची अनेकदा विनाकारण हालचाल होत असते. मी क्लासमध्ये पाहते, एका आसनातून दुसऱ्या आसनात जाताना, शवासन किंवा प्राणायाम-ध्यान करत असताना उगीचच हातपाय हलवणं, कपडे-केस नीट करणं, इकडं तिकडं पाहणं असं बऱ्याच जणांकडून होत असतं. याची त्या क्षणाला काहीच गरज नसते, याकडं आपण कटाक्षानं पाहावं. अशा हालचालींनी मनाची एकाग्रता भंग होते, कारण त्यात मन गुंतून राहतं. 
  • आपल्या शरीरातील स्नायू सैल सोडावेत. मी आसनांमध्ये करेक्शन करताना पाहते, अनेक जण त्यांचं शरीर इतकं कडक करतात की, करेक्शन करणं शक्यच होत नाही. तुम्हीही अधूनमधून शरीराचं निरीक्षण करा आणि कुठं ताण आहे का बघा. असल्यास तो मोकळा करा. 
  • जे आसन करत आहात त्यासाठी लागणाऱ्या अवयवांना आणि स्नायूंना सोडून इतर अवयवांना विश्रांती द्या.

या तीन गोष्टींकडं लक्ष दिल्यास शरीर योग्य प्रकारे आसनं करेल. आता प्रश्न आहे, आसनात मनाचं काय करायचं? आसनं करताना मन भरकटतं, विचार सुरू असतात आणि ते आसन सोडावसं वाटतं. यावर उपाय म्हणजे ''अनंतसमापत्ति''. महर्षी पातंजली म्हणतात, ‘‘तुमचं लक्ष शरीरावर न ठेवता ते ‘अनंत’ म्हणजे जाणिवेवर (consciousness) ठेवा. अशाने एकाग्रता वाढलेच, त्याचबरोबर अशा सरावानं अष्टांग योगाच्या पुढच्या मार्गावर जाण्याचा प्रवास सहजपणे सुरू होईल.

योग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...

sakal_logo
By
देवयानी एम., योगशिक्षक

आपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही याचे उदाहरण म्हणजे पातंजली १९५ सूत्रांपैकी फक्त तीनच सूत्रांत आसनांचं विवरण करतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आसन कसं असावं? 
कोठल्याही आसनामध्ये शरीर आणि मन हे स्थिर आणि आरामदायक (वेदना न होता) स्थितीत असणं, ते खरे आसन. पातंजल योगसूत्रात एकाही आसनाचा उल्लेख केलेला नाही. सर्व आसनांचा सविस्तर विचार हठयोगातील ग्रंथांमध्ये येतो. उदा- हठ प्रदीपिका, घेरंड संहिता आदी. हठयोगात आसनांचा शारीरिक उपयोग सांगितला आहे - जसे स्थैर्य, लवचिकता, आरोग्य, शरीराचा हलकेपणा, अवयवांचं रक्षण, मजबूतपणा आणि शुद्धी. परंतु या ग्रंथात असेदेखील म्हटले आहे की, हठयोग हा राजयोगाकडे जाण्याचा एक मार्ग आहे. याचाच अर्थ आसनं म्हणजे योग नाही, कारण फक्त शारीरिक आरोग्य हे मनुष्याच्या जीवनाचं अंतिम ध्येय असूच शकत नाही.

आसनं करून साधायचंय काय?
आत्तापर्यंत पाहिल्याप्रमाणे स्थिर, सुखकर, प्रयत्नशिथिलतेनं आणि जाणिवेवर लक्ष ठेवून आसन केल्यास द्वंद्वापासून होणारा त्रास कमी होऊ लागतो आणि हळूहळू तसा स्वभाव बनतो. सुख-दुःखासारख्या द्वंद्वांना सहन करण्याची क्षमता येते. आसनांचा अभ्यास करताना विकसित होणारी क्षमता इतर त्रासांना जिंकण्याच्या कामी येते.

अष्टांग योगात चित्ताची एकाग्रता, विचारशून्यता आणि पुढं धारणा-ध्यान यांच्या तयारीच्या उद्देशानं आसनांचा उपयोग सांगितला आहे. परंतु शरीर निरोगी नसेल आणि एका जागी दीर्घकाळ बसू शकण्याची तयारी नसणाऱ्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हठयोगातील आसनांचा अभ्यास करावा. ही तयारी होऊ लागली की, साधक पुढच्या अभ्यासासाठी म्हणजे प्राणायामासाठी तयार होतो. ते पुढील लेखात पाहू!

loading image