योग ‘ऊर्जा’ : मनाच्या प्रसन्नतेसाठी

देवयानी एम. योग प्रशिक्षक
Tuesday, 9 June 2020

योगाचा प्राथमिक निकष आहे, ''एकाग्रता''. मात्र, त्याच्याआड येतात ते रजोगुण, तमोगुण आणि मनाला विचलित करणारी अनेक आंतरिक व बाह्य कारणे. चित्ताला विचलित करणारी कुठलीही कारणं योगमार्गातील अडथळे आहेत. आपल्या दिवसातील त्या एका तासाच्या योगाभ्यासात आसन, प्राणायाम, मंत्र-पठण, ध्यान आदींनी आपण मनाची एकाग्रता मिळवितो. परंतु, इतर वेळी समाजात वावरताना अशी मनोभूमिका टिकत नाही. आपल्या संपर्कात आलेली प्रत्येक व्यक्ती सात्त्विक, शांत, निर्मळ असेल याची खात्री नाही.

योगाचा प्राथमिक निकष आहे, ''एकाग्रता''. मात्र, त्याच्याआड येतात ते रजोगुण, तमोगुण आणि मनाला विचलित करणारी अनेक आंतरिक व बाह्य कारणे. चित्ताला विचलित करणारी कुठलीही कारणं योगमार्गातील अडथळे आहेत. आपल्या दिवसातील त्या एका तासाच्या योगाभ्यासात आसन, प्राणायाम, मंत्र-पठण, ध्यान आदींनी आपण मनाची एकाग्रता मिळवितो. परंतु, इतर वेळी समाजात वावरताना अशी मनोभूमिका टिकत नाही. आपल्या संपर्कात आलेली प्रत्येक व्यक्ती सात्त्विक, शांत, निर्मळ असेल याची खात्री नाही. सर्वांचा स्वभाव, समज, दृष्टिकोन भिन्न असतो. अशा भिन्न प्रकृतीच्या लोकांमध्ये वावरताना मनात उमटणारे तरंग, आपल्या आतील शांती आणि आनंदाला प्रतिकूल ठरू शकतात. अशा वातावरणात मनाची एकाग्रता टिकविण्यासाठी योगशास्त्रात अतिशय व्यावहारिक उपाय पतंजली मुनींनी सांगितले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपल्या सर्वांना सुख हवं असतं, दुःख नसावं असं वाटतं. सुख-दुःख या भावना कुठल्याही विषयाच्या उपभोगातून निर्माण होणाऱ्या संवेदना आहेत. ‘सुख’ ही संवेदना आसक्ती निर्माण करते, म्हणजेच ती भावना हवीहवीशी वाटते. ‘दुःख’ ही संवेदना द्वेष निर्माण करते, म्हणजेच ती नकोशी असते. या हवे-नकोपणानं मनावर उमटणारे संस्कार एकाग्रतेच्या आड येतात. 

पतंजली मुनी म्हणतात, ‘‘या सुखदुःखाच्या अनुभवामागील कारण पूर्वी घडलेल्या पाप-पुण्याचं आचरण.’’ म्हणजे आपल्या हातून घडणाऱ्या चांगल्या-वाईट कर्मातून मिळणारं सुख-दुःख आपल्या आत आसक्ती-द्वेष निर्माण करतात. त्यामुळं पाप-पुण्य आणि सुख-दुःख यांचे आपल्या चित्तावर उत्पन्न होणारे भाव विशिष्ट भावनेनं बदलता आल्यास आसक्ती-द्वेष यांचं स्वरूप पालटू शकतं. अशानं चित्ताची प्रसन्नता मिळविता येते.

1) सुख-मैत्री
कोणतीही सुखी व्यक्ती संपर्कात आली किंवा दृष्टीस पडली, तर त्याच्याप्रति मैत्रीची भावना असावी. आपलं नेमकं उलटं होतं - सुखी व्यक्तीबद्दल आपल्या मनात ईर्षा-असूया उत्पन्न होते. एखाद्याचं बरं चाललंय याचा आपल्याला आनंद कमी आणि त्रासच जास्त होतो. यानं मन कलुषित होतं. आपल्या मित्राला सुख मिळालं, तर आपल्याला जसा आनंद होतो, त्याचप्रमाणं सुखी व्यक्तीविषयी मैत्रीभाव निर्माण केला, की मन प्रसन्न राहण्यास मदत होते.

2) दुःख-करुणा
आपल्या मित्राला कमी मार्क मिळाल्यावर आपण त्याच्या दुःखात सहभागी होतो, की आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त मिळाले म्हणून बरं वाटतं? एखाद्या व्यक्तीला दुःख झाल्यास त्याच्याप्रती आपल्या मनात करुणा (Compassion) निर्माण करावी. आपल्याला जमेल ती मदतही करावी. ते शक्य नसल्यास त्याचं दुःख कमी होवो, अशी सद्‌भावना ठेवावी. हा करुणाभाव बुद्धीची शुद्धी करतो आणि मनाची प्रसन्नता टिकविता येते.

3) पुण्य-मुदिता
चांगले गुण असणाऱ्या व्यक्तीमध्ये आपण खोट काढतो, की मनापासून त्याच्याप्रति आनंद व्यक्त करून दाद देतो? चांगलं वागणाऱ्या व्यक्तीबद्दल आपल्याला आनंद वाटण्याची सवय लावावी. अशानं मन प्रसन्न राहतं.

4) पाप-उपेक्षा
वाईट वागणाऱ्या व्यक्तीविषयी तिरस्कार, अनादर आणि द्वेष न ठेवता, त्या व्यक्तीप्रति उपेक्षा, तटस्थता (Indifference) निर्माण करावी. अशानं आपलं मन नकारात्मकतेनं ग्रासणार नाही आणि संयम निर्माण होईल. आपल्या आंतरिक शक्तीचा ऱ्हास होणार नाही आणि चित्ताची प्रसन्नता टिकविण्यास मदत होईल.

व्यवहारात वावरताना या चार भावना विकसित केल्या व तशी सवय झाली, तर आपलं स्वभाव परिवर्तन होऊ लागेल. मन प्रसन्न, शांत झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त स्वतःपुरता विचार न राहता मन विशाल-व्यापक होईल. या मनाच्या प्रसन्नतेतून झालेलं प्रत्येक काम, जोपासलेलं प्रत्येक नातं आणि नियमित केलेली योगसाधना अधिक परिणामकारक ठरेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article devyani m on yoga