योग ‘ऊर्जा’ - 'योग' पचनसंस्थेच्या आरोग्याचा

Yog
Yog

'Gut is the second brain' म्हणतात ते खरेच आहे. आपले आतडे दुसरा मेंदू असतो, असा याचा अर्थ. आपले एकूणच आरोग्य आणि प्रतिकार शक्तीचा ८० टक्के भाग पचनसंस्थेवर अवलंबून असतो. मागील लेखात आपण पचनक्रिया समजून घेतली आणि जेवताना दुर्लक्षित होणारे काही मुद्दे पाहिले. आपण आज पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी योगातील तत्त्वांचा आढावा घेऊ.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शुद्धिक्रिया 
हठयोगात षट्कर्म म्हणजे सहा शुद्धिक्रिया सांगितल्या आहेत. या शुद्धिक्रियांमध्ये आपल्या शरीराच्या विविध भागांत जो मल किंवा घाण साठलेली असते, त्यांना बाहेर काढण्याच्या प्रक्रिया आहेत. रोजच्या जगण्यात आपण शरीराची स्वच्छता करत असलो, तरी ती बाहेरूनच होत असते. परंतु आंतर इंद्रियांची जसे - नाक, घसा, अन्ननलिका, जठर, लहान व मोठे आतडे यांची आतून पूर्ण स्वच्छता होतच नाही. या क्रिया पोट रिकामे असताना, म्हणजे सकाळी कराव्यात. न पचलेले अन्न (undigested food), आम्ल (acid), जठरास चिकटलेले अन्नपदार्थ, पोट संपूर्णपणे साफ न झाल्याने मोठ्या आतड्यात (colon) साचलेली घाण हे सर्व बाहेर काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

आसने 
आकुंचन-प्रसरण करणाऱ्या, पीळ देणाऱ्या अशा विविध प्रकारच्या आसनांनी पोटाच्या स्नायूंना आणि आतड्यांना चालना मिळते, हलका मसाज मिळतो व रक्ताभिसरण सुधारते. पचन ग्रंथींची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. पचन व मलविसर्जन या दोन्ही महत्त्वाच्या प्रणालींना चालना मिळते. विशेषतः बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी आसनांचा सराव नियमित होणे आवश्यक आहे.

प्राणायाम 
दीर्घ श्वास घेताना डायफ्रॅम खालच्या बाजूला दाबला जातो, ज्यामुळे पोटातील अवयवांवर दाब निर्माण होतो. याने पचनसंस्थेच्या इंद्रियांना मसाज मिळतो. पोटाची व आतड्यांची हालचाल व पचन ग्रंथींचे कार्य सुधारते. हळू व दीर्घ श्वसनाने (slow, deep breathing) पॅरासिम्पथेटिक मज्जासंस्था सक्रिय होऊन पचन कार्य सुरळीत ठेवण्यास मदत होते.

शिथिलीकरण व ध्यान 
मौन, शवासन, योगनिद्रा, ध्यान हे पॅरासिम्पथेटिक मज्जासंस्था कार्यान्वित करतात. शारीरिक-मानसिक तणावांचा भार कमी जाणवू लागतो. नकारात्मकता, भावनिक उचंबळ, चिंता इ कमीकमी होत ग्रंथी मोकळ्या होऊ लागतात. मानसिक गाठी-गुंते पचनक्रियेस अडथळा निर्माण करतात. यासाठी शिथिलीकरण महत्त्वाचे आहे.

आहार 
वरील सर्वांचा सराव महत्त्वाचा आहेच, पण पचनाच्या आरोग्याचे मूळ आहारात आहे. पचायला हलके, पौष्टिक, प्रकृतीला अनुकूल, सात्त्विक, माफक, वेळेवर व शांततेत खाल्लेले अन्न आरोग्यास उत्तम. अधून-मधून लंघन किंवा उपवास करणे हा अपचनावरचा उपाय आहे. आहारासंबंधी मागील काही लेखात विस्तृतपणे उहापोह केलेलाच आहे.

महत्त्वाच्या शुद्धिक्रिया 
वमन, धौती, बस्ती, अग्निसार, नौली, कपालभाती, शंख प्रक्षालन.

महत्त्वाची आसने 
योगमुद्रा, पवनमुक्तासन, वक्रासन, मकरक्रीडासन, उत्कटासन, कागासन, शलभासन, धनुरासन, शशांकासन, त्रिकोणासन, उष्ट्रासन आदी.

पचनास उपयुक्त 
प्राणायाम-दीर्घश्वसन, भस्त्रिका, अनुलोम-विलोम, भ्रामरी इ.

योग्य पचनक्रिया अशी ओळखा
मनाची टवटवी, शरीरातील हलकेपणा, रोज वेळेवर पोट साफ होणे, व्यवस्थित वेळच्या वेळी भूक व तहान लागणे ही पचन कार्य सुरळीत सुरू असण्याची लक्षणे आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com