योग ‘ऊर्जा’ : ध्यान आणि समाधी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

ध्यानात मग्न होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी पाहू 

  • ध्यानाची वेळ
  • ध्यानाची शांत जागा
  • शरीराची अवस्था (पाठ, मान, डोके सरळ)
  • पोट हलके असणे महत्त्वाचे आहे
  • शरीराला कष्ट होणार नाहीत अशी बैठक
  • झोप पूर्ण झालेली असावी. (थकवा, आळस नसावा.)

आपण महर्षी पतंजली यांच्या योग सूत्रातील अष्टांग योगातील शेवटची दोन अंगे ‘ध्यान’ आणि ‘समाधी’ आज पाहू. ध्यानावर बोलणं सोपं वाटलं, तरी ते साध्य करणं सोपं नाही. आसनातून आलेली शरीराची स्थिरता, प्राणायामातून नियंत्रित केलेलं मन, प्रत्याहारानं आलेली अंतर्मुखता आणि धारणेमध्ये आपलं चित्त एकाच ठिकाणी बांधून ठेवल्यासारखं स्थिर ठेवणं ही सर्व ध्यानापर्यंत पोचण्याची पूर्वतयारी आहे. मागील लेखात ‘धारणा’ या अंगाचा अभ्यास करताना ज्या ठिकाणी (उदा. भ्रूमध्य किंवा आज्ञाचक्र) आपले अवधान स्थित केलं आहे, त्या स्थितीत जो अनुभव (प्रत्यय) येतो, त्या अनुभवाची ‘एकतानता’ म्हणजे ‘ध्यान’. एकतानता याचा अर्थ ती अवस्था अखंडपणे टिकवणं.

त्यातील एक भाग म्हणजे त्या अवस्थेतून बाहेर न येणं आणि दुसरा म्हणजे त्या अनुभवाला खेचून दीर्घकाळ टिकवणं. धारणा आणि ध्यान यांच्यामध्ये सलगता आहे. म्हणूनच, ध्यान ही एक प्रक्रिया आहे. शरीराच्या हालचाली, मनातील विचार व भावना नाहीशा झाल्या, की त्या स्थितीला लय म्हणतात. या शब्द-स्पर्श-दृश्यरहित स्थितीत शरीर, मन, बुद्धीच्या पलीकडील अशी फक्त अस्तित्वाची जाणीव असते. अनेक योग ग्रंथांमध्ये ध्यानासंबंधी मार्गदर्शन केले आहे. भगवद्‌गीतेतील ‘आत्मसंयमयोग’ या सहाव्या अध्यायात ध्यानयोगाचे सविस्तर वर्णन आले आहे. अर्जुनसुद्धा भगवान श्रीकृष्णांना म्हणतो, ‘हे चंचल मन स्थिर करणे म्हणजे वाऱ्याला अडवण्यासारखे अत्यंत कठीण आहे.’ त्यावर श्रीकृष्ण म्हणतात, ‘‘हे खरं असलं, तरी अभ्यास आणि वैराग्यानं ते ताब्यात येतं.’’ इथं श्रीकृष्ण अजून एक महत्त्वाचा शब्द वापरतात, ते म्हणजे ‘प्रयत्नशील’.

अशी तयारी करून डोळे मिटून बसा. श्‍वासावर लक्ष द्या. थोडे दीर्घ श्वास आणि ॐकार करा. मग तोही हळूहळू विलीन झाल्यावर त्याच्या शब्दाच्या पलीकडील अर्थावर लक्ष द्या. मग, ॐकाराच्या उच्चारानं आपल्या चित्तात उमटलेल्या भावाची एकतानता अनुभवत राहा. काही वेळात विचारशून्य-शांत अशी अवस्था येईल, त्यात अखंड स्थित राहा. ही प्रक्रिया पुन:पुन्हा करत राहावी लागते. आपलं वागणं, दिनचर्या, जीवनशैली हे सर्व ध्यान लागायला पूरक असावे लागतात.

समाधी : ध्यानाची पक्वावस्था
‘ध्यान’ ही प्रक्रिया तर ‘समाधी’ ही स्थिती आहे. समाधी ही ध्यानाची पक्वावस्था आहे. धारणा आणि ध्यान या दोन्हीमध्ये ध्यान करणारा (ध्याता) आणि ज्याचे ध्यान करत आहोत, ते (ध्येय) या दोन्हीची जाणीव असते. परंतु  समाधीमध्ये ‘मी ध्यान करत आहे,’ आणि ‘ज्याचे ध्यान करत आहे,’ हे दोन्ही गळून जातात आणि फक्त शुद्ध जाणीव राहते. 

मी शरीर नसून त्यातील चैतन्य (Pure Consciousness) हे माझे स्वरूप आहे, हे अनुभवता येतं.

एखाद्या मोकळ्या घड्याच्या आत आणि बाहेरही आकाश असतं, त्याप्रमाणं वैयक्तिक चेतना (Individual Consciousness) आणि वैश्विक चेतना (Universal Consciousness) एकरूप होतात. ज्याप्रमाणं, अग्नीमध्ये कापूर आणि पाण्यात मिठाचं अस्तित्व नाहीसं होतं, त्याप्रमाणं शरीर, मन, बुद्धी, अहंकार चैतन्यतत्त्वात विलीन होऊन जातात. हेच तत्त्व सर्वत्र (प्राणी, पक्षी, झाडे, वेली, गवत, पाणी, पर्वत इ.) आहे, अशी समबुद्धी विकसित होते. सर्व द्वंद्वांमध्येही अंतःकरणाची समतोल राखण्याची क्षमता साध्य होऊ लागते.

आज अनेक प्रकारचे योग जगभरात प्रचलित आहेत. परंतु  राजयोगाकडं जाणारा योग समजून घेतला नाही आणि हठयोग म्हणून फक्त आसन-प्राणायाम करत राहिलात, तर तो हठयोग नाही; केवळ हठकर्म होत राहते. मानसिक व आत्मिक प्रगती म्हणजे राजयोग. आध्यात्मिक अनुभवांना महत्त्व न देता योग होऊच शकत नाही. असे नुसते शब्दांनी हे समजून घेणे अवघड वाटू शकते. हा काही एक दिवसाचा नाही, तर संपूर्ण आयुष्यभराचा अभ्यास आणि प्रयत्न आहे. सुरू करा, करत राहा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article on Meditation and entrancement