चेतना तरंग : ध्यान : मनासाठी वातानुकूलित यंत्र

Ravishankar
Ravishankar

ध्यान म्हणजे मनासाठी असलेले वातानुकूलित यंत्र आहे; अगदी सुखकारक. सुख सर्वांनाच हवे असते, पण पूर्णपणे सुखात कसे राहायचे हे माहीत नसते. मी ध्यानाच्या फायद्यांबद्दल बोलणार नाही. ते तुम्ही गुगलवर शोधू शकता. काही श्रेष्ठ लोकांनी ध्यानावर बरेच संशोधन केले आहे. ते तिथे उपलब्ध आहे. आपण यशस्वी ध्यानाच्या पाच पद्धतींचा विचार करूया.

1) योग आणि व्यायाम -
आपण एका विशिष्ट लयीमध्ये काही आसने करतो, तेव्हा काहीसा थकवा येतो आणि मन ध्यानात उतरते. तुम्ही खूप काम केले असेल किंवा खूप जास्त विश्रांती घेतली असेल, तर तुमचे ध्यान लागणार नाही. पण शरीर योग्य प्रमाणात थकलेल्या स्थितीत आहे, खूप जास्त थकलेले नाही, असा समतोल साधला तर संपूर्ण शरीरसंस्था ध्यानात उतरते. 

2) प्राण किंवा श्वास -
प्राणायामाच्या तंत्रामुळे मन शांत आणि स्थिर होते. अगदी सहज ध्यान लागू शकते.

3) ज्ञानेंद्रिये -
दृष्टी, श्रवण, चव, वास आणि स्पर्श. हे जग पंचमहाभूतांच्या निरनिराळ्या मिश्रणातून बनलेय. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. डोळे हे अग्नी तत्त्वाशी जोडलेले असतात. वास हा पृथ्वी तत्त्वाशी, चव ही जल तत्त्वाशी, ध्वनी आकाश तत्त्वाशी आणि स्पर्श वायू तत्त्वाशी जोडलेले असतात. तुम्ही यांपैकी कोणत्याही एका ज्ञानेंद्रियाच्या मार्गे त्याच्या पलीकडे जाऊन अतिशय गहिऱ्या ध्यानस्थ स्थितीशी एकरूप होऊ शकता. कोणतेही एक ज्ञानेंद्रिय वापरून त्यात १०० टक्के एकाग्र झालात, तर तुम्हाला ध्यानस्थ स्थिती प्राप्त होऊ शकते. एखाद्या दिवशी आडवे पडून आकाशाकडे बघत राहा किंवा तुम्ही पूर्णपणे एकाग्र होऊन संगीत ऐकत असाल, तर एक क्षण असा येतो की तुम्ही अगदी स्थिर होऊन जाता. मनात काहीही विचार नसतात. तुम्ही कुठे आहात ते तुम्हाला कळत नसते, पण तुम्ही आहात याची तुम्हाला जाणीव असते आणि तुम्हाला कोणत्याही सीमा नसतात. सगळीकडे केंद्रबिंदू आणि परीघ कुठेच नसल्याचा अनुभव. एखादी आश्चर्यचकित करणारी गोष्ट किंवा नवल याने अशा स्थितीत पोचता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

4) भावना -
तुम्ही सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या भावनांद्वारे ध्यानात जाऊ शकता. तुम्हाला खूपच वाईट वाटत असेल किंवा खूप राग आला असेल, तेव्हा तुमच्या तोंडून उद्‌गार निघतो, ‘मी हरलो, बस, आता आणखी सहन नाही होत...’ त्या क्षणांमध्ये तुम्ही हताश, हिंसक किंवा निराश झाला नाहीत, तर तुमच्या असे लक्षात येईल की; त्या क्षणी मनाचा काही संबंध नसतो. मन अगदी स्थिर असते. 

5) बुद्धी, ज्ञान, सजगता -
या तिन्हीला म्हणतात ‘ज्ञान योग’. तुम्हाला बसल्या बसल्या कळते की, हे शरीर करोडो पेशींपासून बनलेले आहे. तुमच्यात काहीतरी होते. काही तरी चेतवले जाते. कुणी एखाद्या अंतराळासंबंधीच्या वस्तुसंग्रहालयात जाते किंवा विश्वाबद्दलचा एखादा चित्रपट बघते. त्या वेळी खोलवर आत काहीतरी होते. ठिणगी पडते. अशा अनुभवातून बाहेर येऊन तुम्हाला पटकन कुणावरही ओरडता येत नाही. ते जवळजवळ अशक्य होते कारण, विश्वाची भव्यता लक्षात येते, तेव्हा सगळा संदर्भच बदलतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com