टक्कल पडलंय का? होय, त्यावर उपाय आहे!

टक्कल पडलंय का? होय, त्यावर उपाय आहे!

घनदाट केशसंभार हे सौंदर्याचे लक्षण मानले जाते. यात बाधा आल्यास व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो व अशा लोकांमध्ये स्वतःवरचा विश्‍वास कमी झाल्याचे आढळते. रुग्णांच्या या मानसिकतेचा काही वेळा गैरफायदा घेतला जातो व अत्यंत खर्चिक उपचार सुचवले जातात, त्यामुळे याविषयी शास्त्रीय माहिती करून घेऊन उपलब्ध उपचारांच्या मर्यादा लक्षात घ्यायला हव्यात. केसांचे गळणे, आनुवंशिकतेमुळे पडणारे टक्कल व चाई यावर वैद्यकीय सल्ला घेणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. केसांचे आरोग्य हे आपल्या दैनंदिन सवयींशी संबंधित असते. केसांच्या समस्येने जेवढा मानसिक तणाव स्त्रियांना होतो, तितकाच पुरुषांनाही असतो. लग्नाच्या बाजारात टक्कल असलेल्यांना काही वेळा नाकारले जाते.

चाई पडणे
यात डोक्‍याप्रमाणे काही वेळा शरीराच्या इतर भागांतील (उदा. भुवई, दाढी, मिशा, अंगावरचे केस) केस गोलाकार आकारात गळतात. यात आपल्याच पेशींच्या विरुद्ध काम करणाऱ्या पेशी शरीरात तयार होतात व त्या केसांच्या मुळांवर हल्ला करतात. याला ऑटोइम्युन आजार असे संबोधले जाते. एक ते दोन टक्के रुग्णांमध्ये ही लक्षणे जाणवतात. डोक्‍याच्या केसांत एखादाच चट्टा असेल तर ३४ ते ३५ टक्के लोकांमध्ये तो आपोआप बरा होतो. याला साधारणपणे ९ महिने ते वर्षाचा कालावधी लागतो.

केस गळणे : प्रत्येकाच्या केसांच्या वाढीचे एक चक्र असते. केसांची वाढ ॲनाजेन, फॅटाजेन व टेलोजेन या तीन टप्प्यांत होते.

ॲनाजेन : या टप्प्यात केसांची वाढ होत असते व यावर आपल्या केसांची लांबी अवलंबून असते. शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी याचा कालावधी वेगवेगळा असतो. डोक्‍यावर हा टप्पा दोन ते सहा वर्षांचा असतो व साधारणपणे ८० ते ९० टक्के केस वाढीच्या टप्प्यात असतात. फक्त ५ ते १० टक्के केस हे गळतात व पुन्हा वाढीला लागतात. केसांचे गळणे हे ऋतुमानानुसार बदलत असते व १००पर्यंत केस गळणे नॉर्मल समजले जाते. जोपर्यंत गळलेले केस पुन्हा वाढतात, तोपर्यंत विरळपणा जाणवत नाही.

टेलोजेन : गळणाऱ्या केसांचे प्रमाण वाढते व या बदलामुळे केस विरळ होतात. याला टेलोजेन एफ्लुवियम असे नाव आहे. स्त्रियांमध्ये हे जास्त प्रमाणात आढळते.

बाळंतपणानंतर गळणारे केस
आपल्या देशात स्त्रिया स्वतःच्या आहाराकडे लक्ष देत नाहीत. कुटुंबाकडे लक्ष देताना स्वतःच्या खाण्यावर फारसा भर देत नाहीत, त्यामुळे विविध अन्नघटकांची कमतरता स्त्रियांमध्ये आढळते. पाळीच्या समस्या, रक्तस्राव होणे यातून शरीरातील लोहाची कमतरता निर्माण होते.

कीटकजन्य आजारांचा दुष्परिणाम
डेंग्यू, चिकनगुनिया अशा कीटकजन्य आजारांची साथ पसरलेली आहे. अशा आजारातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये दोन ते तीन महिन्यांनंतर प्रचंड केस गळतात. टायफॉईड, काविळीसारखे आजार, तसेच दीर्घ मुदतीचे इतर आजार यांतूनही केस गळतात. पोटात घेण्याची काही औषधे - स्टिरॉईडस, प्रतिकारशक्ती कमी करण्याची औषधे, गर्भनिरोधक गोळ्या यानंतर केस विरळ होतात. इतर कारणांमध्ये केसांवरील सौंदर्य उपचार - केसांच्या रचनेत बदल करणारे उपचार, प्रसाधनांचा अतिरेकी वापर, कॅन्सरवर वापरण्यात येणारी केमोथेरपी यांचा समावेश होतो.

टक्कल पडणे
पुरुषांप्रमाणे स्त्रियांमध्येसुद्धा डोक्‍याला टक्कल पडू शकते. यात आनुवंशिकतेचा भाग आढळतो. ज्या व्यक्तींच्या घरी आईच्या अथवा वडिलांच्या बाजूच्या सदस्यांमध्ये टक्कल असते, त्यांना हा त्रास उद्‌भवू शकतो. शरीरात तयार होणारे अँड्रोजेन हे संप्रेरक यास कारणीभूत असते. या संप्रेरकाचा प्रभाव केसांच्या मुळांवर पडतो व अशी मुळे हळूहळू बारीक होतात. केसांच्या जाडीवरदेखील याचा परिणाम होतो, त्यामुळे केस विरळ होतात व भांग फाकायला लागतो. या प्रकारात केस प्रत्यक्ष गळून पडत नाहीत; परंतु केसांमध्ये फटी पडून आतील त्वचा दिसायला लागते. स्त्रियांमध्ये जर पॉलिसिस्टीम ओव्हरीज असतील तर ही लक्षणे आढळून येतात. तसेच, रजोनिवृत्तीनंतर शरीरातील इस्ट्रोजन हार्मोन कमी झाल्याने टक्कल पडू शकते.

टकलावर आधुनिक उपचार
टक्कल पडलेल्यावर आधुनिक उपचार करून घेण्याकडे कल वाढलेला आढळतो. यात औषधे व इतर जोड देणाऱ्या उपचारांचा समावेश होतो. औषधांमध्ये मुख्यत्वे मिनॉक्‍सीडिल हे त्वचेवर लावायचे औषध व फिनास्टेराईड हे पोटातून घ्यायचे औषध वापरले जाते. स्त्रियांमध्ये ही औषधे वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते. विशेषतः गरोदर व्हायच्याआधी या गोळ्या टाळणे हितावह आहे. गरज असल्यास योग्य मार्गदर्शनाखाली हे उपचार घ्यावेत. ज्यांना या उपचारांचा विशेष फायदा जाणवत नाही त्या रुग्णांसाठी इतर उपचार केले जातात. यात उर्मारोलर, 'एलएलएलटी', 'पीआरपी', केशारोपण शस्त्रक्रिया यांचा समावेश होतो.

कोणते तेल, शॅम्पू वापरावा?
केसांच्या तक्रारी सुरू झाल्यावर कोणते तेल वापरावे, कोणता शॅम्पू वापरावा, असे प्रश्‍न मनात डोकावतात. तेलाचा उपयोग कंडिशनर म्हणून होतो. कोणतेही तेल वापरायला हरकत नाही. फक्त ते लावताना मुळाशी जास्त चोळू नये. केसांच्या लांबीवर, वाढीवर अथवा रंगावर तेलाचा काहीही परिणाम होत नाही, त्यामुळे वापरायचे झाल्यास ते बाहेरच्या केसांवर पसरावे. शॅम्पू निवडताना आपल्या केसांच्या पोताला अनुकूल शॅम्पू निवडावा. कोरडे व राठ केस असल्यास कंडिशनर वापरावा. काही विशिष्ट प्रकारचे औषधी शॅम्पू केस फुलवण्यासाठी वापरता येतात, त्यामुळे विरळपणा कमी असल्याचा भास निर्माण होतो. तेलाप्रमाणे शॅम्पूचादेखील केसांच्या जाडीवर अथवा वाढीवर कोणताही परिणाम होत नाही.

नवीन संशोधन
बायॉलॉजिक नावाची औषधे व त्यांचे परिणाम यावर शास्त्रज्ञ काम करत आहेत.
अनेक चट्टे असणाऱ्या, इतर भागांतील केसही गळालेल्या रुग्णांसाठी आशादायी.
लेझर थेरपी (३०८ एक्‍साईमर) देखील यासाठी उपयुक्त ठरू शकेल.
लेझर व लाइट थेरपीचे उपचार त्वचारोगतज्ज्ञांकडे, तसेच काही निवडक रुग्णांमध्ये उपलब्ध आहेत.

उपचाराबरोबर हे करा
योग्य व समतोल आहार
ऋतुमानानुसार मिळणारी फळे, हिरव्या पालेभाज्या खाव्यात
कोवळ्या उन्हात 'ड' जीवनसत्त्व
पी.सी.ओ.डी. असलेल्या स्त्रियांमध्ये अंतःस्रावातील असंतुलनासाठी व्यायामाची जोड द्यावी.

- डॉ. धनश्री भिडे, त्वचारोगतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com