esakal | ‘होम मिनिस्टर’च्या पाठीचे आरोग्य 
sakal

बोलून बातमी शोधा

‘होम मिनिस्टर’च्या पाठीचे आरोग्य 

घर चालवणं अजिबात सोपं काम नाही, हे लॉकडाऊनमध्ये कामं वाटून घेणाऱ्या अनेक संवेदनशील पुरुषांना व मुलांना आता समजलं असावं. घरपणाचा कणा असलेल्या स्त्रीनं तिच्या पाठीची काळजी कशी घ्यायची, हे पाहू.

‘होम मिनिस्टर’च्या पाठीचे आरोग्य 

sakal_logo
By
देवयानी एम., योग प्रशिक्षक

ऑफिसमधून अनेक जण थकून येतात, मुलं शाळेतून-ग्राउंडवरून दमून येतात. ही घराघराची कहाणी, पण त्यांचा थकवा दूर करणारी आई किंवा बायको हीसुद्धा दिवसभर राबून थकलेली असते हे फार कमी जणांच्या लक्षात येतं. कारण अनेक वर्षं आपण घरातील स्त्रीच्या वेळेला आणि कष्टाला गृहीत धरलेलं आहे. आता तर लॉकडाऊनच्या काळात रोज नवनवीन चटपटीत व गोड पदार्थ करताना ती माऊली अजून थकत आहे. वाईटात चांगले म्हणजे लॉकडाऊनमध्ये घरातील प्रत्येकाला या कष्टांची जाणीव झाली आहे (..असावी)! घर चालवणं अजिबात सोपं काम नाही, हे लॉकडाऊनमध्ये कामं वाटून घेणाऱ्या अनेक संवेदनशील पुरुषांना व मुलांना आता समजलं असावं. घराच्या घरपणाचा कणा असलेल्या स्त्रीनं तिच्या पाठीची काळजी कशी घ्यायची, हे पाहू. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाठीचा त्रास सुरू होण्याआधी... 
‘‘अगं दिवसभर काम आणि उठबस करून बराच व्यायाम मिळतो मला,’’ असं खूपदा ऐकण्यात येतं. पण घरकाम ‘exertion’ आहे ‘exercise’ नाही. खूप वेळ सलग उभं राहणं, वाकून काम करणं, बराच काळ बसून काम करणं, एकाच अवघड अवस्थेत तासंतास शरीर असणं, यामुळं पाठीचे स्नायू आखडतात. ही आखडलेली पाठ मोकळी न करता अशीच वर्षानुवर्षं वापरत राहिलो, तर मोकळे न केलेले स्नायू सुकायला लागतात आणि हळूहळू मणका सरकतो. पाठीची ठेवण बदलायला लागते आणि हे बदल कायमस्वरूपी होऊ लागतात. त्याचप्रमाणं ओट्यावर अनेक तास वाकून काम केल्यानं मानही आखडते. पाठीचा त्रास सुरू होण्याआधीच स्नायूंचं बळ वाढवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी ‘सूर्यनमस्कार’ व कपडे पिळतो तशी पाठीला पीळ देणारी आसनं रोज करा. मानेच्या आरोग्यासाठी ‘ब्रह्ममुद्रा’ जरुरी आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

स्पॉन्डीलोसिस – 
मुळात पाठीचे त्रास हे स्नायूंचा कमकुवतपणा आणि लवचिकतेच्या अभावामुळं निर्माण होतात. वर्षानुवर्षं झालेली झीज, जड वजन उचलणं, एकाच बाजूवर जास्त ताण पडणं यामुळं हळूहळू पाठीच्या मणक्यांमधलं अंतर कमी होऊ लागतं. ही एका दिवसात होणारी गोष्ट नाही. हे अंतर कमी होऊ लागतं, तसतसं मणके एकमेकांवर घासू लागतात. याला स्पॉन्डीलोसिस म्हणतात. असे वेदना देणारे रचनात्मक बदल कायमस्वरूपी होऊ नयेत, यासाठी पाठीच्या स्नायूंना मोकळं करणं, ताणणं अत्यावश्यक आहे. ते विविध योगासनांतून होतं. 

डिस्कचे आरोग्य – 
पाठीच्या कण्यामधली जी गादी - ‘डिस्क’ असते, तिचं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. ही डिस्क शॉकॲबसॉर्बर आहे. दिवसभराचा ताण, शारीरिक-मानसिक झीज यामुळं ही डिस्क डी-हायड्रेट होते, म्हणजे हवा कमी झालेल्या फुग्यासारखी. मणक्यातील डिस्क दोन प्रकारे री-हायड्रेट होते – 
१. रात्रीच्या झोपेत, 
२. विविध आसनांद्वारे त्यांचा रक्तपुरवठा वाढवून. 

अनेकदा झोपेतून उठताना अचानक पाठीत उसण भरते. त्यासाठी उठण्यापूर्वी पाठीवरच पडून पवनमुक्तासन (मान वर न उचलता) करा. यामुळे एक प्रकारचं नैसर्गिक ट्रॅक्शन मिळतं आणि पाठ रिलॅक्स होते. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खूप काळ बसून काम करताना 
चांगल्या आरोग्यासाठी जागरुकता महत्त्वाची आहे. वाचताना, जेवताना, टीव्ही-मोबाईल बघताना, काम करताना, उभं असताना आपण शरीर कसं वेडंवाकडं ठेवतो, याकडं प्रयत्नपूर्वक पाहा. खूप वेळ बसावं लागतं, त्यांनी तीन गोष्टी लक्षात ठेवाव्यात... 

१. ताठ बसा. ताठ बसण्यानं पाठीचेच नाही, तर संपूर्ण शरीराचं आरोग्य सुधारतं, श्वसनसंस्था निरोगी राहते. कार्यक्षमता (efficiency) वाढते. 

२. कॉम्प्युटरवर काम करताना माऊसचा वापर जास्त असेल, तर हाताची कोपरे अधांतरी नसावेत. 

३. दर दोन ते तीन तासांनी ‘पर्वतासन’ करा, त्यानं पाठीचे मणके सरळ रेषेत राहतील व ‘spine re-align’ होईल. 

लक्षात ठेवण्याचे मुद्दे – 

१. ताठ बसा 

२. बेड अतिकडक किंवा अतिमऊ नको. मध्यम स्वरूपाचा असावा. 

३. डोक्याखाली जाड उशी नसावी. 

४. अतिथंड पदार्थ किंवा पेये टाळावेत. त्यानं स्नायू व आतडी आखडतात. 

५. रोज संपूर्ण शरीर ताणणारे व पिळणारे व्यायाम आणि योगासने करणे अनिवार्य आहे. 

६. संधी मिळेल तेव्हा पाठ मोकळी करा 

पाठदुखी हे मुळात स्ट्रेसचे लक्षण आहे. स्ट्रेसमुळे स्नायूंमधील तणावही (मसल टेन्शन) वाढतं. प्राणीसुद्धा दिवसातून अनेकदा संपूर्ण शरीर छान स्ट्रेच करतात, आपणही ते शिकूया. 

पाठीच्या मणक्यासाठीची महत्त्वाची आसने 
पर्वतासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, अर्धशलभासन, उष्ट्रासन, मकरासन, मत्स्यक्रीडासन, मार्जारासन, सर्पासन, अर्धकटिचक्रासन, मर्कटासन, ताडासन, निरालंबासन, अर्धहलासन, वक्रासन, अर्धमत्स्येंद्रासन, उत्तानमण्डुकासन, त्रिकोणासन, ब्रह्ममुद्रा, सूर्यनमस्कार. 

loading image