शोध स्वतःचा : इच्छा व कृतीतील अंतर...

शोध स्वतःचा : इच्छा व कृतीतील अंतर...
शोध स्वतःचा : इच्छा व कृतीतील अंतर...sakal

आजकाल हृदयविकाराने किंवा इतर कोणत्यातरी कारणाने तिशी-चाळिशीतील तरुण जीव गमवताना सर्वत्र ऐकू येत आहे. आपले आई-वडील आणि आजी-आजोबा साठ, सत्तर, ऐंशी वयापर्यंत जगतात हे पाहून, इतकी वर्षं जिवंत राहणं हीसुद्धा एक अचिव्हमेंट वाटू लागली आहे. असं काय होत आहे ज्यानं जीवनशैलीचे विकार आणि मृत्यू दोन्ही इतकी वर्षं अलीकडं येताना दिसतात? काही दशकांपूर्वी जीवन कसं होतं आणि आता कसं आहे? तर आज आयुष्याच्या सर्व पैलूंमध्ये Resistance दिसत आहे, म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रतिकार करत-झगडत जगत आहोत. कोणत्या गोष्टींचा प्रतिकार करत दिवस जगतो ते पाहू ...

1) अन्न

अन्न ही जगण्याची मूलभूत गरज आहे. ती गरजेपुरती ठेवली असती, तर खाण्यासंबंधीचे त्रास झालेच नसते. गरजेला जेव्हा आपण करमणुकीचे स्वरूप देतो म्हणजे खाणं वाटेल तेव्हा, वाटेल ते, वाटेल तसं, वाटतं तितकं अशी मर्यादा सोडून खाल्लं जातं तेव्हा ॲसिडिटी, स्थूलता, गॅसेस, अपचन इत्यादींसारखे त्रास शरीर भोगू लागतं. आज मीडियामुळं किंवा फुड इंडस्ट्रीच्या विविध मार्केटिंगच्या युक्त्यांमुळं आपल्यासमोर असंख्य पर्यायांचा भडिमार केला जातोय. दर काही महिन्यांनी नवीन फॅड आणि ट्रेंडच्या नादी लागून शास्त्रीय दृष्टिकोन बाजूला ठेवला जातो आणि मग पाईड पायपरच्या गोष्टीसारखं एक चालला, की इतर सगळे डोकं बाजूला ठेवून त्या फॅडच्या मागं चालू लागतात. आपण असंख्य गोडाचे प्रकार, पाश्चात्त्य खाण्याचे प्रकार खात आहोत. खऱ्या अर्थानं ग्लोबल होणं म्हणजे विविध देशांचे cuisine खाणे असं अजिबात नाही. जेव्हा क्रेविंगस् होतात तेव्हा वेगळं खाण्याची इच्छा होते. त्यामागं शास्त्रीय कारण असं आहे, की तुमच्या शरीराला पोषण कमी पडत आहे. तुमच्या रोजच्या आहारात असंतुलन असल्यानं तिसरीकडून ती भरून काढण्याचे सिग्नल मेंदू देत आहे. जर सकस, पौष्टिक, पारंपारीक पदार्थ रोज खाल्ले गेले, तर हे खावं ते खावं असं अजिबात वाटणार नाही. त्यात भर म्हणजे पटकन ॲपवरून घरपोच इतके प्रकार येऊ शकतात की इच्छा आणि कृती यातील अंतर कमी होत आहे. मग विचार करायला वेळ आहेच कुठे!

2) झोप

झोप हीसुद्धा एक अत्यंत महत्त्वाची गरज आहे. अपुऱ्या झोपेमुळं शरीराला व मेंदूला कमालीचा त्रास होतो. ही मूलभूत गरज आज टीव्ही, स्मार्टफोन, इंटरनेट, वेब सिरीज, सोशल मीडिया, चॅटिंगसारख्या आधुनिक व्यत्ययांमुळं पुढे ढकलली जात आहे. रोज उशिरा झोपणं व सकाळी फ्रेश न वाटणं असं दीर्घकाळ चालू राहिलं तर कणाकणानं शरीर व विविध आंतरेंद्रिये कमकुवत होतात. याचा परिणाम हृदयावरही होतो. काहींना टीव्ही किंवा मोबाईलशिवाय झोप येत नाही, तर काहींना मद्य घेतल्याशिवाय झोप येत नाही. हे आरोग्यास हानिकारक आहे. रात्रीच्या पार्ट्या असो किंवा करमणूक, कामाचा स्ट्रेस असो किंवा मनातील विचार थांबत नाहीत अशी तुमची तक्रार असो... तुम्हाला मदतीची गरज आहे हे नक्की! झोप येत नाही ही पहिली अडचण असते, मग ती तक्रार होते आणि मग त्याचं इतकं टेन्शन घेऊ लागतं की झोप येणार नाही या चिंतेनेच माणूस टक्क जागा राहतो. विषारी चक्र! स्ट्रेसनं झोप येत नसेल, तर तुम्हाला झेपेल त्यापेक्षा जास्त भार तुमच्यावर आहे हे समजून घ्या. आर्थिक ताण जाणवतो कारण जरा पगार वाढला की नवीन खर्चाचे पर्याय मनात येऊ लागतात. आपल्या गरजेपेक्षा जास्त पसारा केला तर तो आवरायलाही आपल्यालाच लागतो. आणि तो आवरता आवरता आपली दमछाक होते. हे कुठवर चालणार!

3) सवयी

आज आपण खूप वेळ बसून असतो, हालचाली कमी झाल्या आहेत, व्यायाम करत नाही. आपल्याला परिवर्तन हवं तर असतं पण त्यासाठी कष्ट करायची तयारी खूप कमी लोकांमध्ये असते. माझ्याकडं मार्गदर्शनासाठी अनेक जण येतात पण त्यांना ते सगळं आपोआप व्हावं असं वाटतं. आज माहिती सर्वत्र उपलब्ध आहे. पण त्या माहितीचं ज्ञानात रूपांतर होण्यासाठी शास्त्रशुद्धपणानं जगण्याची इच्छा आणि त्यासाठी लागणारी शिस्त ही हवीच. इकडून-तिकडून माहिती मिळवून ती साठवून तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकणार नाही. इतरांचं ऐकण्यात, गुगलचं ऐकण्यात आपण मास्टर असतो, पण स्वतःचे शरीर काय बोलते हे ऐकण्याची कला समाज विसरत चालला आहे. व्यायाम न करता वजन कमी करून देऊ अशा जाहिरातींसारखा आपल्याला कायम शॉर्टकट हवा असतो. आरोग्य कमावणे, व्यक्तिमत्त्व विकास यासाठी अखंड व अथक प्रयत्न करावे लागतात-ती एक प्रकारची तपश्चर्याच आहे!

कधी कशाला प्राधान्य द्यावं, कधी कोणती गोष्ट करावी, किती प्रमाणात करावी, अशास्त्रीय न वागता रसिकतेच्या नावाखाली अनावश्यक सवयी आणि पसारे मांडले नाहीत तर आपल्या आजूबाजूला कितीही घाण असली, तरी आपलं अंगण आपल्याला साफ ठेवता येऊच शकतं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com